Breaking News
औरंगाबादेतून उड्डान घेणार झूम एअरलाईन्सचे विमान
दिल्ली-नागपूर-औरंगाबाद-पुणे मार्गावर उड्डान
औरंगाबादच्या हवाई वाहतूकीत लवकरच आणखी एका विमानाची भर पडणार असून झूम एअरलाईन्स किमान ४ शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू करणार आहे. झूमचे विमान दिल्ली-नागपूर-औरंगाबाद-पुणे आणि परतीच्या मार्गावर उड्डान करेल. तर नाईट पार्किंगसाठीही परवानगी मागण्यात आली आहे. या सेवेमुळे नागपूर आणि पुणे ही नविन शहरे औरंगाबादला विमानसेवेशी जोडली जातील.
झेक्सस एअर सर्विसेस कंपनी ही झूम एअर या ब्रँड नावाने हवाई सेवा देते. सुरेंद्र कुमार कौशिक यांनी एप्रिल २०१३ मध्ये स्थापन केलेल्या कंपनीला डिसेंबर २०१४ मध्ये नागरी विमान वाहतूक मंत्रालयाची एनओसी मिळाली. फेब्रुवारी २०१७ पासून झूमने २ विमानांवर सेवा सुरू केली. आता कंपनीच्या ताफ्यात तिसरे विमान दाखल झाल्यामुळे दिल्ली-आगरा-बिकानेर या मार्गावर उडान सेवेअंतर्गत ३१ ऑक्टोबरपासून एक विमान सुरू झाले आहे. डिसंेबरपासून औरंगाबादेत सेवा सुरू करण्याचा मानस कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक काैस्तव धर यांनी व्यक्त केला.
चार शहरांना जोडणारी सेवा
झूमचे मुख्यालय गुडगाव येथे असून नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि कोलकात्यात कंपनीचे हब आहेत. झूम एअरच्या पहिल्या यादीतच औरंगाबादचे नाव होते. मात्र, दिल्ली किंवा कोलकात्याहून आैरंगाबादला येण्यासाठी सकाळचा स्लॉट न मिळाल्याने ते लांबत गेले. आता स्लॉट मिळाला आहे. यामुळे डिसेंबरपासून दिल्ली-नागपूर-औरंगाबाद-पुणे आणि परतीच्या मार्गावर सेवा सुरू होणार असल्याची माहिती कंपनीचे उपाध्यक्ष (मार्केटिंग अॅण्ड सेल्स) संजय वेल्लोर म्हणाले यांनी दिली.
नाईट पार्किंगसाठी प्रस्ताव
दिल्लीत स्लॉटची नेहमीची अडचण दूर करण्यासाठी औरंगाबादेतच नाईट पार्किंग मिळावी कंपनीने यासाठी औरंगाबाद विमानतळ प्राधिकरणाकडे प्रस्ताव दाखल केल्याचे धर यांनी सांगीतले. कंपनीच्या वेबसाईटच्या फ्रंट पेजवर अजिंठ्यातील लेणीचे चित्र आहे. यावरूनच औरंगाबाद हे आमच्या प्राध्यान्यक्रमावर असल्याचे स्पष्ट होते, असे ते म्हणाले.