विधानसभा निवडणूक प्रचारात देवेंद्र फडणवीस यांचे ‘मी पुन्हा येईल.. मी पुन्हा येईल’ हे वाक्य सोशल मिडियावर चांगले गाजले. या वाक्याच्या माध्यमातून भाजपची टर उडविण्यात आली; लहाण्यासाहित मोठ्यापर्यंत विनोदाचा भाग झालेलं हे वाक्य जादूची कांडी फिरावी तसं खरं ठरलं. सकाळी वृत्तपत्र वाचता वाचता अनपेक्षित निकाल टीव्हीवर पाहायला मिळाला. या निकालानंतर शहरात अनेक ठिकाणी भाजप सरकारचे स्वागत, जल्लोष साजरा करण्यात आला.
‘आलो रे आलो मी पुन्हा आलो…’
शनिवारी (ता. 23) सकाळी फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर शहरातील गुलमंडी परिसरात ‘आलो रे आलो मी पुन्हा आलो’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी देत भाजप सरकारचे स्वागत केले. दरम्यान, लाडू वाटून जल्लोष
करण्यात आला. यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, गजानन बारवाल, दिलीप थोरात, विकास कुलकर्णी, दयाराम बसैय्ये, मंगलमूर्ती शास्त्री, सचिन झव्हेरी
उपस्थित होते. फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर गुलमंडीवर महिला मोर्चातर्फे वाहनधारक आणि व्यापाऱ्यांना लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला
भाजप महिला मोर्चाच्यातर्फे गुलमंडीवर मोठ्या उत्साह दिसून आला. महिला मोर्चातर्फे फडणवीस यांच्या विजयानंतर फटाके फोडून व गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यात आला. यासह गुलमंडीवर ‘मी पुन्हा येईल’, ‘मी आलोच’, अशा घोषणा
महिलांनी दिल्या. यात महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष ऍड. माधुरी अदवंत यांच्यासह इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
ढोल-ताशांच्या गजरात नृत्य
दुसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर माजी राज्यमंत्री अतुल सावे यांच्या संपर्क कार्यालयासमोर भाजप पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. यासह ढोल-ताशाच्या गजरात नृत्यही केले. सिडको एन- सात येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भाजपच्या राजाबाजार मित्रमंडळातर्फे फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.