Special Story

अरूण गवळीच्या दगडीचाळीत ठरणार भायखळ्याच्या आमदार !

मुलगी गीता अजय गवळी दुसऱ्यांदा निवडणूकीच्या रिंगणात

विधानसभेच्या निवडणूकीसाठी मुंबईतील अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांच्या दगडीचाळीत लगबग सुरू झाली आहे. २०१४ च्या निवडणूकीत “डॅडी’ची कन्या गीतादीदी थोडक्यात पराभूत झाल्या होत्या. प्रतिस्पर्धी उमेदवारांनी धर्माच्या नावावर मते मागीतल्याने पराभव झाल्याचा त्यांचा आरोप आहे. पण डॅडीच्या राज्यात “चूकीला माफी नाही’. यामुळेच मागील चूका सुधारत गीता गवळी जोरदार प्रचाराला लागल्या आहेत. तुरूंगात असलेलेे डॅडी बाहेर आले तर प्रचाराचीही गरज पडणार नाही, असा विश्वास गीता यांना वाटतोय. राज्यातील १० ते १२ ठिकाणी उमेदवार उभे करण्याचा त्यांच्या आखिल भारतीय सेनेचा विचार आहे.

सलग २ निवडणूकीत पराभव चाखावा लागणाऱ्या आखिल भारतीय सेनेच्या दगडीचाळीतील मध्यवर्ती कार्यालयात सद्या पाय ठेवायलाही जागा नाही. मुंबईतील महालक्ष्मी, मंुबादेवी, जोगेश्वरी, शीतलादेवी देवीसोबत दगडीचाळीतील आई माऊलीलाही महत्त्व आले आहे. भायखळा दगडीचाळ नवरात्र उत्सव मंडळाचे हे ४६ वे वर्ष आहे. निवडणूकीच्या तोंडावरच सण आल्याने येथे नवरात्रीतून निवडणूकीच्या जागराची तयारी सुरू आहे. प्रतिनिधीने शुक्रवारी कार्यालय गाठले त्यावेळी डॅडी आणि दीदीचे सर्व धर्मीय नेते आणि कार्यकर्ते निवडणूकीची रणणिती आखण्यासाठी जमलेे होते. यात महिला आणि तरूणांची संख्या लक्षणीय होती. टेरेसवर एक कार्यकर्ता मेळावाही झाला. टाळ्या आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला. तरूणांच्या टीमने पथनाट्य, गाणी सादर करत प्रचाराचा नारळ फोडला. दीदी, मम्मी आणि प्रमुख नेत्यांनी यात काही बदल सुचवले. मतदानापर्यंत हे नाट्य मतदारसंघात सादर केले जाणार आहे.

विकासाच्या नावावर मत
कार्यकर्त्यांच्या घबडग्यातून केबीनपर्यंत पोहचण्यात गीता यांना दोन तास लागले. त्या वॉर्ड क्रमांक २१२ च्या नगरसेविका असल्याने केबीनमध्येही चर्चमधील दोन सिस्टरसह काही लोक काम घेऊन आलेले होते. गीता गवळी म्हणाल्या, कार्यकर्त्यांची ही गर्दी, प्रेमच आमचे बळ आहे. डॅडींनी ३० वर्षे भरपूर काम केले आहे. जनतेचा आमच्यावर प्रचंड विश्वास आहे. आमच्याकडे काम घेऊन आले तर ते होणारच, याची खात्री असते. यामुळे विधानसभेत आम्ही केवळ विकास आणि भयमुक्त समाजाच्या नावावर मत मागणार आहोत. डॅडीच्या स्वप्नातले भायखळा उभे करायचे आहे. प्रचारासाठी वडील आले तर आमचा विजय पक्का आहे. प्रचाराचीही गरज भासणार नाही. पण निवडणूकीच्या तोंडावर सरकार त्यांना पॅरोलवर सोडणार नाही, असे गीता म्हणाल्या.

धर्माच्या नावावर फाटाफूट
२०१४ च्या निवडणूकीत एमआयएमचे वारीस पठाण अवघ्या १३८२ मतांनी निवडून आले. एमआयएम, भाजप, काँग्रेस, मनसे आणि अाखिल भारतीय सेनेत मत विभागणी झाली. पठाण यांनी थेट धर्माच्या नावावर मते मागीतली. यामुळे आमचा पारंपारीक मुस्लिम मतदार तुटला आणि पराभव झाला. ते धर्माच्या नावावर मत मागत असतांना आम्ही गाफील राहिलो. हा डॅडीचा बांधलेला मतदार असल्याची खात्री आम्हाला होती. हीच चूक झाली. यंदा अशी चूक होणार नाही. पठाण यांनी ५ वर्षात काहीच काम न केल्याने लोकांच्या मनात प्रचंड राग आहे. जनतेला त्यांची चूक लक्षात आली आहे. यंदा त्यांचे अस्तित्वही राहणार नाही, असा विश्वास गीता यांना वाटतो. भायखळ्याचा आमदार दगडीचाळीतून होणार, असा दावा त्यांनी केला.

भाजपकडूनही विचारणा
नगरसेविका म्हणून निवडून आल्यावर त्यांनी सुरूवातीला शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला होता. पण रात्रीतून अचानक त्यांनी भाजपला पाठींबा दर्शवला. त्यांना स्थायी समितीचे सदस्यपद आणि आरोग्य समितीचे अध्यक्षपद मिळाले. गीता गवळी म्हणाल्या, विधानसभेसाठी भाजपकडून दोन वेळा फाेन आला होता. पण आम्हाला आमच्या चिन्हावर निवडणूक लढवायची असल्याने त्यांना परत कॉलही नाही केला.

तुरूंगात आहे अरूण गवळी
अरुण गवळीसाठी मुंबई बॉम्ब स्फोट मालिकेनंतर गवळी शिवसेनेच्या जवळ आला. नंंतर मात्र विविध कारणांमुळे शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी त्याचे खटके उडत राहिले. त्याने स्वत:चा आखिल भारतीय सेना पक्ष स्थापन केला. यामुळे गवळी शिवसेनेचा कट्टर विरोधक झाला. गवळी २००४ च्या निवडणूकीत आमदार म्हणून निवडून आला. मात्र, शिवसेनेचे घाटकोपरचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या हत्याप्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. २० मे २००८ रोजी अटक झाली. सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे.

फर्लाेवर सुटका अशक्य
अरुण गवळी याची ९ मे २०१९ रोजी फर्लो म्हणजेच संचित रजेवर नागपूरच्या केंद्रीय कारागृहातुन सुटका करण्यात आली होती. कुटुंबीयांना भेटण्यासाठी गवळीने संचित रजेकरिता अर्ज केला होता. परंतु, कारागृह प्रशासनाने मुंबईत लोकसभा निवडणुका असल्याने तो फेटाळून लावला. त्या निर्णयाला गवळीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने निवडणूक झाल्यानंतर रजेवर सोडण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ९ मे रोजी गवळीला २८ दिवसांच्या संचित रजेवर सोडण्यात आले होते. यामुळे आता परत फर्लाे मिळणे अशक्य असल्याचे सूत्र सांगतात.

डॅडीवर ३ चित्रपट
गवळीचर आतापर्यंत २ चित्रपट आले आहेत. २०१५ मध्ये आलेल्या दगडी चाळ या मराठी चित्रपटात मकरंद देशपांडेनी गवळीची भूमिका साकारली. २०१७ मध्ये डॅडी या हिंदी चित्रपटात अर्जून रामपाल याने गवळीची भूमिका केली. आता डॅडीच्या सिक्वेलचे काम सुरू झाले आहे. ‘डॅडीं’ची मुलगी योगिता गवळी सहनिर्मितीची आहे.

गांधी परीक्षेत टॉपर
ऑगस्ट २०१८ मध्ये नागपूर मध्यवर्ती कारागृहात घेण्यात आलेल्या गांधी विचार परीक्षेत अरुण गवळीने गांधीच्या अहिंसेच्या विचाराचा अभ्यास करत ८० पैकी ७४ गुण मिळवले. ही परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केली.

अशी होती निवडणूकीची गणिते

२०१४- मतदारसंघ क्रमांक १८४- भायखळा
एकूण २२७१४३ पैकी १२४५४७ जणांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ५४.८३ एवढी होती.

उमेदवार                 पक्ष                       मते                    मतांची टक्केवारी
वारीस पठाण           एमआयएम            २५३१४                २०.३३
मधू चव्हाण             भाजप                   २३९४२                १९.२४
मधू चव्हाण             काँग्रेस                   २२००५                १७.६८
गीता गवळी            आखिल भा सेना       २०८९५               १६.७८
संजय नाईक           मनसे                      १९७६२              १५.८७
मधूकर लोखंडे       अपक्ष                       ७८६५               ६.३२

२००९- मतदारसंघ क्रमांक १८४- भायखळा
एकूण २७१५०७ पैकी ११६२७२ जणांनी मतदान केले. टक्केवारी ४२.८२ एवढी होती.

उमेदवार              पक्ष                         मते                मतांची टक्केवारी
मधू चव्हाण           काँग्रेस                     ३६३०२            ३१.२२
संजय नाईक         मनसे                       २७१७९           २३.३९
अरूण गवळी      अखिल भा सेना          २५७०३            २२.११
यशवंत जाधव       शिवसेना                  २०६९२            १७.८२

२००४- चिंचपोकळी मतदारसंघ
एकूण १२३५०७ पैकी ६२३८७ जणांनी मतदान केले. गवळीला ३१९६४ तर काँग्रेसचे मधू चव्हाण यांना २०१४६ मते पडली. गवळी ११८१८ मतांनी म्हणजेच १८.९४ टक्के मतांनी निवडून आला.

उमेदवार                  पक्ष                        मते
अरूण गवळी            अखिल भा सेना       ३१९६४
मधू चव्हाण               काँग्रेस                   २०१४६
अन्सारी अय्युब          सपा                       ५५८१
रामनाथ त्रिपाठी         भाजप                    ३५२१
हयात अन्सारी           जदयू                      ५०४
रामकुबेर चव्हाण       बसप                      ४१५
दिपक डोंगरे            अपक्ष                      २५६
एकूण —-                                            ६२३८७

Related Articles

Close