Features

राजकीय जाहिरात प्रसारणाला एमसीएमसीची परवानगी आवश्यक

जिल्हाधिकारी उदय चौधरी

राजकीय पक्ष, उमेदवारांना इलेक्ट्रॉनिक, मुद्रित, केबल वाहिन्या, समाज माध्यमे आणि नभोवाणींवरील जाहिरातींचा मजकूर प्रमाणन करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी अर्जदारांनी विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह तीन, सात दिवस अगोदर माध्यम सनियंत्रण आणि माध्यम प्रमाणिकरण समितीकडे (मीडिया मॉनिटरिंग आणि मीडिया सर्टिफिकेशन) अर्ज सादर करणे आवश्यक असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज सांगितले.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय एमसीएमसीची स्थापना झालेली आहे. विधानसभा निवडणूक निर्भय, मुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी, यासाठी एमसीएमसीचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. जाहिरात प्रमाणिकरणाबरोबरच समितीकडून निवडणूक क्षेत्रात प्रकाशित, प्रसारित होणार्याा सर्व प्रकारच्या माध्यमांवरही एमसीएमसी देखरेख ठेवते. जाहिरातीच्या मजकुरांचे प्रमाणनानंतर समितीच्यावतीने अर्जदारांना जाहिरात प्रसारणासाठी प्रमाणपत्र देण्यात येते. प्रत्येक जाहिरात प्रसारणासाठी स्वतंत्रपणे प्रमाणपत्राची आवश्यकता असते. इलेक्ट्रॉनिक, मुद्रित, केबल वाहिन्या, समाज माध्यमे आणि नभोवाणींवरील जाहिरातींचा मजकूर प्रमाणन करून घेणे उमेदवार, पक्ष व अन्य व्यक्तीला आवश्यक आहे.

समितीच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी, सदस्य म्हणून उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षाराणी भोसले, समाज माध्यम तज्ज्ञ म्हणून प्रशांत पाठक, आकाशवाणीचे सहायक संचालक रमेश जायभाये, सायबर तज्ञ राहुल खटावकर, पोलिस निरीक्षक अशोक घुगे, संपादक शेख सईद शेख अकबर, जकी शेख यांचा समावेश आहे. एमसीएमसी समितीचे सदस्य सचिव जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुसर्याध मजल्यावर माध्यम कक्षातून समितीचे कामकाज सुरू आहे. या कक्षात समितीमार्फत देण्यात येणारे जाहिरात प्रमाणन, प्रकाशित, प्रसारीत प्रचार साहित्य मजकुरांची तपासणी, मजकुरांवर देखरेख ठेवण्यात येते. या कक्षात मजकुरावर देखरेखीसाठी पूरक साधने, सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये दूरचित्रवाणी संच, जिल्ह्यातील प्रसिद्ध होणारे वृत्तपत्रे, दूरचित्रवाहिन्या, एफएम, सोशल मीडिया यांवर अधिकारी, कर्मचारी देखरेख ठेवताहेत. माध्यम कक्षामार्फत निवडणुकीशी संबंधित वृत्तांचे प्रसारण, माध्यम व प्रशासनात संवाद व्हावा, यादृष्टीने दररोज माध्यमांशी प्रशासनाचा संवाद घडवून आणण्यात येतो, या माध्यम कक्षाचा संपर्क क्रमांक (०२४०-२३३४३४४,०२४०-२३३१०४४ ) आहे. तर इमेल आयडी [email protected] आहे, असे श्री. चिलवंत यांनी सांगितले आहे.

Related Articles

Close