Features
देश अस्वस्थ आहे …..
आपण आपल्या मुलांसमोर काय वाढवून ठेवले आहे याचा विचार पालकांनी करायला हवा
प्रकाश भागवत
(चित्रपट संवाद लेखक)
आज तो प्रत्येक माणूस अस्वस्थ आहे ज्याच्या घरात मुलगी आहे… आज तो माणूस अस्वस्थ आहे ज्याची बायको, सून, मुलगी , रोज कामासाठी घाराबाहेर जाते.. आज अस्वस्थ आहे ती आई जिची तरूण मुलगी शाळा-कॉलेजला गेलेली आहे आणि बराच वेळ झाला तरी अजून घरी आलेली नाही, आज अस्वस्थ आहे तो बाप ज्याला एक मुलगी असताना तो दुसऱ्या मुलीचा बाप झाला आहे.
हैद्राबाद येथे घडलेल्या मागच्या आठवड्यात काम संपवून घरी जाणाऱ्या एका पशु चिकीत्सक महिला डॉक्टरचा सामुहीक बलात्कार करुन तीला जाळून टाकले. निर्भया नंतर आपल्या देशात अजून नराधम आणि त्यांचा क्रुरपणा शिल्लक आहे. निर्भया प्रकरणातील नराधमांना आता पर्यंत शिक्षा झाली असती तर कदाचित या राक्षसांची हि हिम्मत झाली नसती. अशा घटनांमुळे कदाचित आपल्या पोटी मुलगी नको असे बापाला वाटत असावे. ती जन्मली की लक्ष्मीच्या पावलांनी आली असं म्हटलं जातं. पण या लक्ष्मीचा जेव्हा एखादा नरकासूर असा असूरी अंत करतो तेव्हा तेव्हा केवळ प्रश्नांचा काहूर मनात माजताे आणि मन सुन्न व्हायला होतं.
एवढी विकोपाची विकृती का? मुलीचा जीव एवढा स्वस्त झालायं का? की मुलांमधलं माणुसपण संपत चाललंय? प्रत्येक जीवाप्रती देखील आता केवळ युज अॅण्ड थ्राे एवढीच भावना राहीली आहे का? की एक पालक म्हणून अापणच कुठेतरी कमी पडतो आहे? असे असंख्य ‘का’? आज काळीजात गर्दी करत आहेत. आणि आपल्याच विश्वाभोवती मन घीरट्या घालत आहे.
आजच्या घडीला मुलींनी प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे. जी क्षेत्रे केवळ पुरूषांसाठीच ओळखली जायची ती पण क्षेत्रे आज मुली गाजवतांना दिसत आहेत. सावित्रीबाई फुले आणि जोतिबा फुले यांनी त्यावेळी चाकोरी बाहेर जाऊन विचार केला म्हणून आज मुली गगन भरारी घेत आहेत. परंतु त्यांच्या गगन भरारीला कोणीतरी अशा प्रकारचा पूर्णविराम द्यावा हे दूर्दैवच. ज्या मुलांना पालक म्हणून आपण शिकवून सुशिक्षित करतो त्या सुशिक्षितपणाची व्याख्याच बदलतांना दिसते आहे. मुलं शिक्षित तर होत आहेत पण त्यातल्या सुशिक्षिताचा अभाव वाढत चालला आहे.
जगाच्या पाठीवर आज सर्वश्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या भारताच्या संस्कृतीला ? पुन्हा तोच अनुत्तरीत प्रश्न मनाला भेडसावतो हे मुळात झालेच कसे ? जरा सुद्धा त्या नराधमांना तीची कीव येवू नये का ? त्या आवेगा नंतर तीला जाळतांना त्यांच्यातले माणूसपण एकदाही जागे होऊ नये का? त्यांच्यातला माणूस जागा होऊन तिला जिवंत जाळण्याइतकी त्याना पाप पुण्याची समज देऊ नये का ? आज काळजात आग पेटून माणूस अस्वस्थ का आहे. कारण तीच्यावर झालेल्या अत्याचारामुळे नाही तर तीच्यावर अमानुष अत्याचार करणारे ते अजून जीवंत आहे त्याच्यामुळे .
त्या पकडल्या गेलेल्या चार आरोपी पैकी दोन आरोपी असे आहेत कि ज्यांना अजून मिसरुड सुद्धा फुब्ले नाही. कदाचित त्यांना आपण काय करत आहोत या पेक्षा आपण काय करून बसलो हे आज कळत असेल. त्यातल्या मुख्य आरोपीला पोलिसांचा खाक्या दाखवतांनाचा व्हिडिओ पाहून अजून अस्वस्थ वाटलं आणि तिथे जाऊन त्या पोलिसांना सांगाव वाटल कि बाबानो अस आम्ही गर्दीत भुरटा चोर पकडल्यावर सुद्धा मारत नाही. पण पुन्हा त्याला बसणाऱ्या फटक्यापेक्षा त्याच्या मुखातून बाहेर पडणारी ‘अम्मा’ आईच जास्त अस्वस्थ करत होती. काय गम्मत आहे पहा, ‘आवेगात त्याला बाई आठवली,आणि यातनेत आई’. आवेग आणि यातना आतला फरक किती मोठा होता पण त्याला काय ठाऊक की आता जीव देऊन सुद्धा तिच्या यातनेची किमंत त्याला चुकवता येणार नाही.
पण मग हे धाडस त्याच्यात आले कुठून एवढा आत्मविश्वास त्याला मिळाला कसा. हा ही एक अनुत्तरीत प्रश्न जो पुन्हा मनाला अस्वस्थ करतो. कारण त्याच्या आवेगाला प्रोत्साहन देणारं असंख्य भांडवल घेऊन तो आला. जगाचा आणि कायद्याचा धाक तो पायदळी तुडवून आला एक नव्हे दोन नव्हे तर चार पाच गुन्हे पचवले रिचवले आणि मग तो एक नवा गुन्हा करण्यासाठी तयार होऊन आला. आता सावध होण्याची गरज आहे आपल्या आजू बाजूला परिसरात किवा घरात तर आपण असा गुन्हेगार घडवत नाहीयेना हे डोळसपने तपासून पाहण्याची खरी गरज आहे.
वयात नसतांना वयात आणणारं माध्यम ‘मोबाईल’
घाबरू नका., घरात या साठी म्हंटल कारण ज्या उद्देशान गुन्हा केला गेला तो आवेग हाच एकमेव उद्देश होता असच एखाद वादळ आपल्याही घरी सैराट करू पाहतय का ? हे तपासण्याची खरी गरज आहे. त्याला खरी दिशा देण्याच काम सर्वस्वी आपल आहे. आपल्या मुलांना सगळ्या सुविधा पुरवण्याच्या नादात आपण सहज विसरलो त्याची शारीरिक गरज आज सगळ्या गरजांपेक्षा मोठी होऊ लागली आहे , आणि कळत नकळत तस पोषक वातावरण आपणच त्याला तयार करून दिले आहे. वयात नसताना वयात आणण्याचं सुरेख माध्यम आपणच त्याच्या खिशात आणून ठेवले आहे. निसर्गाच्या विरोधात जाऊन त्याची जडण घडण करण्याच सरळसोपे साधन म्हणजे ‘मोबाईल’
केवळ स्वल्पविराम देऊन पुढे जायचं,
आज ट्रेनच्या गर्दीत चौदा-पंधरा वर्षाचा मुलगा खिडकीच्या कोपऱ्यात बसून कानात हेडफोन घालून ‘पॉर्न’ व्हिडीओ पहात होता. ‘वयात न आलेले प्रेमी युगल समोरच्या आपल्या आई – वडिलांपेक्षा मोठ्या माणसांसमोर अश्लील चाळे करत बसलं होत’. बऱ्याच वेळा यांना बोलावे वाटले पण भावनांना आवर घातला कारण मी विसरलो आपण मेट्रोने प्रवास करतो आहोत आणि मेट्रोसिटीत जगत आहोत आणि मेट्रोसिटीत अशा गोष्टींना स्वल्पविराम देत पुढं जायचं असतं. त्याशिवाय पर्याय नसतो. नाहीतर आपण एकतर अतिशहाणे किंवा अतिमुर्ख ठरतो. म्हणूनच की काय तासाभरापासून समोर अगदीच शॉर्ट घालून मोबाईलच्या नादात बसलेल्या त्या कॉलेजच्या माउलीला ही मी सांगू शकलो नाही की, ‘ताई नीट बस, समोरची माणसं तुझ्याकडे नको त्या नजरेने पाहत आहेत आणि एक असुरी आनंद घेत आहेत’. बर त्यात तीच्या बाजूला बसलेल्या तिच्या आईच्या वयाच्या त्या बाईला लक्षात येऊन ही वाटल नाही कि तिच्या लक्षात ही गोष्ट आणून द्यावी किवां ‘तीची उघडी मांडी आपल्या ओढणीने झाकावी’. कारण ती स्वतःच आपला ‘कमी पडलेला कुर्ता (शर्ट) खाली खेचण्यात व्यस्त होती’. असो असे किती तरी अनुत्तरीत प्रश्न घेऊन रोज प्रवासाला सुरुवात होत असते.
‘TikTok’ चं भूत
अगदी चांगल्या घरातल्या शाळकरी मुली नको तसे हावभाव करून कुणाची तमा न बाळगता ‘TikTok’ करत आहे. तर गर्दीत एक दहावीतला तरुण आपल्या आठवीतल्या गर्लफ्रेंडला कुणी धक्का लावू नये म्हणून अगदी मिठीत कवटाळून कव्हर करत कोपऱ्यातल्या जागेकडे जाण्याची केविलवाणी मजेशीर धडपड करत आहे, तर त्यांच्या आजोबाच्या वयाचा माणूस त्या गर्दीचा निर्लज्जपणे फायदा घेत आहे, पुढच्या डब्यात नित्य भजनी मंडळी आपल्या भजनात तल्लीन आहे. असे चित्र पाहिले की पुन्हा तेच अनुत्तरीत प्रश्न अस्वस्थ करतात.
स्वमर्जीचा अत्याचार…
काही दिवसापूर्वी अजब प्रकरण घडले एका पिझा डीलेव्हरी करणाऱ्या मुलाला काही माणसांनी बेदम चोप दिला आमच्या शेजारच्या बिल्डिंगच्या सातव्या माळ्यावर तो रोज जायचा आणि तासाभराने परत यायचा तिथे एक शाळकरी मुलगी त्याला आपले आई वडील गेले की बोलवायची. कारण आई तिला सांगायची आज डबा नाही बनवला ऑनलाइन काहीतरी मागवून खाऊन घे. हा प्रकार चार दिवस चालला आणि आज नेमकी . आई आपली वस्तू विसरली आणि अर्ध्या रस्त्यामधून परत घरी आली तर आपली लाडकी लेक एका पिझा डीलेव्हरी करणाऱ्या मुलासोबत नको त्या अवस्थेत सापडली. मग काय तिने त्याला तसेच मारत मारत खाली आणले आणि एरियातली सगळीच मुल त्याच्यावर तुटून पडली .. खर प्रकरण काय ते पूर्ण न सांगता आईने ते सगळे बालट स्वतःवर पेलून नेले. आजची हिरकणीच ती …
असो हा तर फक्त एकाच बिल्डींग मधला प्रकार जो उघडकीस आला अशा किती शहरात कितीतरी बिल्डींग असतील जिथं हा स्वमर्जीचा अत्याचार चार भिंतीत राजरोस सुरु असावा. पण त्या आई बापाचे काय जे एका मोठ्या विश्वासाने बिनघोर आपल्या मुलांच्या भाविष्यासाठी कामाला गेले असतांना घरी आल्यावर या विचाराने मन अस्वस्थ होईल.
“रोजचा दोन जीबी चा मोबाईलचा डाटा..”
आज सोशल नेट्वर्किंगचा चांगला उपयोग करणारी पिढी आहे. असे विधान काही विद्वान मोठ्या गर्वाने करतात. याबाबत दुमत नाही. करतही असतील पण बोटावर मोजण्या इतके एवढे नक्की. एक ओळ वर्तमानपत्रात खूप चांगली वाचण्यात आली “रोजचा दोन जीबी चा मोबाईलचा डाटा आज बेरोजगार मुलाना बेरोजगार असल्याची जाणीव होऊ देत नाही”.. आज अंबानी बंधूनी जिओ आणून जवळ जवळ तीन वर्ष झाली खेड्या पाड्यातल्या शहरातल्या मुलांना हे मनोरंजनाचे चांगले मध्यम मिळाले आहे हेच खरे , आज ज्या ज्या वयातील माणस त्याचा तसा तसा उपयोग करून घेत आहे गृहिणी रेसिपी डाउनलोड करण्यात व्यस्त, मुली ‘TikTok’ करण्यात तर म्हातारे भजन कीर्तन आणि आजचा तरूण त्याला हवे ते मैथूनास योग्य भांडार मिळविण्यात व्यस्त . याच तीन वर्षात सायबर क्राइमचे गुन्हे सर्वात जास्त घडले . याचा अभ्यास करून ही मन अस्वस्थ झाले हेच खर …
बाप-आई हरवत चालले…
काही वर्षापूर्वी शाळेत मुलाना मोबाईलवर बंदी आणली होती ज्यावर आपल्या लाडक्या मुलांसाठी पालकांनी बंड पुकारला की आमच्या मुलांशी आमचा संपर्क हवाच म्हणून त्यांनी ही बंदी सक्तीची न करता वापरण्यावरच अधिक भर दिला आणि आज बापाजवळ साधा तर मुलाजवळ आयफोन आला.. मुलीच्या वाढदिवसाला तिला आय फोन घेऊन देणारा पप्पा आहे पण चार पुस्तक घेऊन चांगले विचार देणारा बाप हरवत चालला आहे. मुलीला मॉल मधून महागडी जीन्स घेऊन देणारी ममी आहे पण छातीवरची ओढणी सावरून सावध संस्कार देणारी आई मात्र हरवत चालली आहे .. म्हणूनच कि काय मन अस्वस्थ आहे …
तो काळ वेगळा होता..
एक वेळा विचारावे वाटते या सुसंकृत आई बापांना की बाबानो तुम्ही शाळेत जायचा तेव्हा होते का तुमच्या जवळ मोबाईल फोन. पण विसरलोच त्यांच्याकडे याचे उत्तर अगदी शून्य मिनटात तयार आहे ‘तो काळ वेगळा होता ‘ अगदी खर आहे तो काळ खरच वेगळा होता कारण माणूस तेव्हा माणूस होता. आज चाळीशीच्या सर्वच पालकांना विचारा त्याचं लग्न वयाच्या कितव्या वर्षी झालं ? म्हणून माझा उशिरा लग्न करण्याबद्दल विरोध आहे असे नाही पण लग्न आणि करीयर याची तुम्ही घातलेली सांगड ही कुठेतरी निसर्गाच्या नियमाविरुद्ध आहे एवढे मात्र खरे…म्हणून निसर्गसुद्धा कुठेतरी अस्वस्थ आहे….
—