In Short

‘मराठवाड्याचा युवावक्ता’ वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

आ.सतीश चव्हाण यांचा उपक्रम

महाराष्ट्राचे प्रभावी नेतृत्व खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने ‘मराठवाड्याचा युवावक्ता’ या आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे नववे वर्ष असून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात 6 जानेवारी रोजी स्पर्धेच्या जिल्हानिहाय फेऱ्या होणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यातून प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या स्पर्धकांची महाअंतिम फेरी औरंगाबादेत होणार असल्याची माहिती भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष आ.सतीश चव्हाण यांनी आज दिली.
यावर्षीच्या जिल्हानिहाय फेरीसाठी 1.भय इथले संपत नाही, 2.ब्रेकिंगच्या गदारोळात पत्रकारितेची हत्या, 3.मराठवाड्याचा अनुशेष विकासाचा की नेतृत्वाचा?, 4.‘ऑनलाईन’ सुखाच्या शोधात माणूसच ‘ऑफलाईन’ हे चार विषय ठेवण्यात आले आहे. जिल्हानिहाय स्पर्धा 6 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेपासून पुढील ठिकाणी घेण्यात येणार आहेत. औरंगाबाद- देवगिरी महाविद्यालय, जालना- जेईएस महाविद्यालय, परभणी- श्री.शिवाजी महाविद्यालय, हिंगोली- शिवाजी महाविद्यालय, नांदेड- सायन्स कॉलेज, लातूर- राजर्षी शाहू महाविद्यालय, उस्मानाबाद- आर.पी.कॉलेज बीड- बलभीम महाविद्यालय. प्रत्येक जिल्ह्यातील विजेत्या पहिल्या तीन स्पर्धकांना अनुक्रमे तीन, दोन व एक हजार रूपयांचे रोख पारितोषिक दिले जाणार आहे.
आठही जिल्ह्यातील एकूण 24 विजेत्या स्पर्धकांची महाअंतिम फेरी 13 जानेवारी रोजी औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालय येथे होणार आहे. महाअंतिम फेरीसाठी 1.खा.शरद पवार: असामान्य कर्तृत्वाची लोकगाथा..!, 2.अस्मानी, सुलतानीला भेदू कसे?, 3.मेक इन इंडिया : व्हाया मंदिर ते मंदी, 4.ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही.  हे विषय ठेवण्यात आले आहेत. महाअंतिम फेरीतील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे एकवीस, पंधरा व अकरा हजारांचे रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाईल. ही स्पर्धा मराठवाड्यातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी असून एका महाविद्यालयातून फक्त तीन विद्यार्थ्यांनाच या स्पर्धेत सहभागी होता येईल. स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क राहणार नाही. इच्छुक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे ओळखपत्र, प्राचार्यांचे संमतीपत्र व पासपोर्ट फोटोसह स्पर्धेच्या दिवशी एक तास अगोदर स्पर्धा ठिकाणी नाव नोंदणी करावी, असे आवाहन आ.सतीश चव्हाण यांनी केले आहे.

Related Articles

Close