Breaking News
माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरूद्दीनसह तिघांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल
२० लाख ९६ हजार रूपयांची फसवणूक प्रकरण
भारतीय संघाचा माजी कर्णधार तथा क्रिकेटपटू मोहम्मद अझरूद्दीन याच्यासह तीन जणावर ट्रॅव्हल्स कंपनीची २० लाख ९६ हजार ३११ रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद शहाब मोहम्मद याकूब (रा.उमर मेंन्शन, व्हीआयपी रोड, लेबर कॉलनी) असे फिर्यादीचे नाव असल्याची माहिती सिटीचौक पोलिस ठाण्याच्या सुत्रांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदेश अव्वेकल (रा.कनोर, केरळ), मोहम्मद अझरूद्दीन (रा.हैदराबाद, विजयवाडा, आंध्रप्रदेश) यांच्या नावाने मुजीब खान (रा.जयसिंगपुरा, छोटी मस्जीदजवळ) यांनी दानिश टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीकडून मुंबई-दुबई-पॅरिस व पॅरिस-दुबई-दिल्ली अशी विमानाची तिकीटे बुक केली होती. बुक केलेल्या तिकीटाचे पैसे नंतर देतो असे सांगून मुजीब खान यांनी दिलेला धनादेश वटला नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
मोहम्मद शहाब मोहम्मद याकूब यांनी दिलेल्या तक्रारीवरून सुदेश अव्वेकल, मोहम्मद अझरूद्दीन व अझरूद्दीनचा खासगी सचिव मुजीब खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक अमरनाथ नागरे करत आहेत.