Happenings
सार्वजनिक बांधकाम विभागाने भरली दहा लाख पाणीपट्टी
२००९ पासून कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनातून पाणीपट्टी ची रक्कम कपात करूनही सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांनी महानगर पालिकेचे तब्बल ७४ लाख ३७ हजार ३९० रुपयाची पाणी पट्टी आजवर थकवल्याने कोटला कॉलनीतील महिलांनी आक्रमक होत सार्वजनिक बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता एस एस भागत यांचे कार्यालय गाठले. यावेळी महिलांनी आम्हाला पाणी द्या अशी मागणी लावून धरल्याने अखेर कार्यकारी अभियंता यांनी १० लाख रुपयांची पाणी पट्टी चा भरणा करत महापालिकेला नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची विनंती केली.
गेल्या २००९ या वर्षापासून पाणीपट्टी भरूनही पाणी मिळत नसल्याचा फटका मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सदनिकेत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसत आहे. अधिकाऱ्यांनी या पाणीपट्टीत खाबुगिरी केली असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला असून याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करण्यात येत आहे.
मोंढा नाका प्रभाग कार्यालय २ अंतर्गत येणाऱ्या उप अभियंता, बांधकाम विभाग, कोटला कॉलनी येथील सदनिकाना नियमित पाणीपुरवठा करण्यात येतो. सार्वजनिक बांधकाम विभागा काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून पाणीपट्टी कपात केली जाते. मात्र एप्रिल २००९ पासून महानगर पालिकेने उप अभियंता, बांधकाम विभाग, कोटला कॉलनी यांना वारंवार पत्र व्यवहार करूनही अद्याप पाणीपट्टी चा भरणा केला नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या सदनिकेतील पाणीपुरवठ्यावर होत असून येथील कर्मचाऱ्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. मात्र शनिवारी या कॉलनीत राहणाऱ्या महिलांनी आक्रमक पवित्रा घेऊन कार्यकारी अभियंता एस एस भागत यांचे कार्यालय गाठले व तातडीने पाणी देण्याची मागणी केली. वरिष्ठ पातळीवर असणाऱ्या अधिकाऱ्यांनी, अभियंत्यांनी ही पाणीपट्टी अद्याप का भरली नाही? याची सखोल चौकशी करण्यात यावी. अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू असे स्पष्ट केले आहे. कुणाल नितीन मराठे ,राहुल मोरे,वैभव बनसोडे, यशोदीप सोनकांबळे, रोहन निकम, अजिंक्य राजूरकर, वैभव निकाळजे, धीरज सोनवणे, वर्षा गाढे, चव्हाण,व सर्व कोटला कॉलनीतील रहिवासी उपस्थित होते