हॅप्पी दिवाळी म्हटल्याने झालेल्या वादात एका तरूणाची चौघांनी तलवारीने वार करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रविवारी रात्री न्यायनगरात ही घटना घडल्याची माहिती समाेर आली आहे. सचिन विष्णू वाघ या तरूणाची तलवारीने हत्या करण्यात आली आहे. पोलिस उपायुक्त राहुल खाडे, सहायक आयुक्त आणि सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे हे घटनास्थळी दाखल झाले आणि पाहणी केली. पोलिसांनी याप्रकरणी संशयित चार जणांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
साईनाथ आदिनाथ येढणे, पवन अनिल दिवेकर, निलेश नारायण रांजणे उर्फ सुऱ्या आणि रोहीत दिलीप नरवडे अशी संशयीत आरोपींची नावे आहे. प्राप्त माहितीनुसार, सचिनचा भाऊ आणि संशयीत आरोपींमध्ये रविवारी हॅप्पी दिवाळीवरून वाद झाला. वादानंतर त्यांच्यामध्ये झटापट सुरू झाली ही बाब समजल्यावर सचिन भांडण सोडविण्याासठी धावला असता, आरोपीने त्याच्यावर तलवारीने हल्ला केला व तो पसार झाला. यामध्ये सचिन गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सकाळी १०.३० वाजे दरम्यान त्याचा मृत्यु झाला. या घटनेपासून न्यायनगरात तणाव निर्माण आहे. याबाबत पुडलिकनगर पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोदं करण्यात आला. पाेलिस उपनिरीक्षक विकास खटके आणि कर्मचाऱ्यांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.