Special Story

बालविवाहाविरूद्ध विद्यार्थीनीचा लढा, स्वत:सोबत दोन मुलींचे विवाह थांबवले

मनिषा घोरपडेने थांबवले तीन बालविवाह

घरात अठरा विश्वे दारिद्र्य. गाळपाच्या हंगामात ऊस तोडणीसाठी जाणारे अख्खे कुटूंब. अशावेळी मुली घरातील सदस्य नव्हे तर ओझे वाटू लागतात. त्यांची जबाबदारी टाळण्यासाठी लवकरात लवकर लग्न लावून देण्याची पालकांची मानसिकता असते. मात्र, अशाही परिस्थितीत मनिषा गोविंद घोरपडे या महाविद्यालयीन तरूणीने आधी स्वत:चा बालविवाह थांबवला. नंतर पुढाकार घेत पालकांचे समुपदेशन करत आणखी दोन बालविवाह रोखले. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या चांदेटेपली गावातील ही कथा इतरांसाठीही प्रेरणादायी आहे.

जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि परतूर तालुक्यात ऊसतोडीसाठी स्थलांतर करणाऱ्यांचे मोठे प्रमाण आहे. चांदेटेपली येथील घोरपडे कुटूंबिय त्यापैकीच एक. शेती नसल्याने कुटूंबातील सर्व सदस्य इतरांच्या शेतात मजूरी करतात. वर्षातील सहा महिने ऊस तोडणीसाठी जातात. यामुळे घरातील मुलगी जड वाटते. लवकरात लवकर तिचे लग्न लावून देण्याकडे कुटंूबियांचा कल असतो. मनिषाच्या बाबतीत असेच घडणार होते. पण तीने हिमतीने ते टाळले.

पालकांचेच केले समुपदेशन
गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत आठवीत असतांना कुटूंबियांनी तिच्या लग्नाचा निर्णय घेतला. आपल्याला पहायला पाहूणे येत आहेत, हे समजताच मनिषाला धक्का बसला. तिच्यासाठी हे सगळे अनाकलनीय होते. मनिषाला शिकण्याची इच्छा होती. शिक्षण अर्धवट सोडून लग्न करण्याच्या निर्णयाने ती गोंधळून गेली. मग मन घट्ट केले. काहीही झाले तरी लग्न करायचे नाही, हे पालकांना स्पष्ट शब्दात सांगीतले. बालविवाहामुळे मुलगी आणि तिच्या होणाऱ्या बाळाला आरोग्याच्या परिणामांची कल्पना दिली. पालकांनाही ते पटले आणि मनिषाचा विवाह न करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

शिक्षण, स्वावलंबन, मग विवाह
चांगले शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आहे. बालविवाहामुळे त्यावर गदा येते. बालमातृत्वाचे ओझे पेलावे लागते. याचा मुलगी आणि तिच्या होणाऱ्या बाळाच्या आरोग्यावर परिणाम पडताे. कुटूंबातील स्वास्थ खराब होते. हे माहिती झाल्यानेच मी माझा आणि दोघींचे बालविवाह थांबवले. आता याविरोधात प्रबोधन करत आहे.- मनिषा घोरपडे

सामाजिक संघटनांकडून प्रेरणा
बालविवाहाला विरोधाची प्रेरणा तिला गावातल्या अंगणवाडी आणि विविध सामाजिक संघटनांमुळे आली होती. मनिषा गावातल्या अंगणवाडीत किशोरवयीन मुलींच्या बैठकांना जायची. अंगणवाडी सेविका स्वाती घोरपडे आणि वंदना घोरपडे यांच्याकडून बालविवाह, पोषण आहार, कुपोषण, शारीरिक स्वच्छता याबाबत माहिती दिली जायची. ‘सॅक्रेड’ संस्थेचे क्षेत्र समन्वयक अनिल जाधवही गावात या कुप्रथेविरूद्ध प्रबोधन करत होते. माहितीपटातून बालविवाहाचे मुलगी आणि जन्मणाऱ्या बाळावर होणारे परिणाम सांगीतले जायचे. त्यावेळीच मनिषाने बालविवाह न करण्याचे ठरवले होते.

दोन बालविवाह रोखले
मनिषा आता राजूर येथे बारावीत शिकत आहे. कॉलेजमध्ये वर्गातल्या दोन मुलींचे विवाह होणार असल्याचे तीला समजले. मनिषाने जराही भिड न बाळगता मुलींच्या घरी जावून त्यांच्या आईचे प्रबोधन केले. तीन-चार भेटीनंतर मुलींच्या कुटूंबाने लग्न थांबवले. मनिषाला नंतरही अनेक स्थळे आली. पण उच्च शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहिल्याशिवाय लग्न न करण्याचा तिचा निर्धार आहे.

बसमुळेही शिक्षणात अडथळा
चांदेटेपली हे राजूर-भोकरदन महामार्गावर ३ कि.मी. आत आहे. थेट गावातून राजूरला बस नाही. मिळेल त्या वाहनाने कॉलेज गाठावे लागते. खर्च न पेलवल्याने तसेच सुरक्षिततेच्या कारणास्तव पालक मुलींना कॉलेजमधून काढून घेतात. मुलींचे शिक्षण अर्धवट राहते. यामुळे गावातून बस सुरू करण्यासाठी मागणी मनिषा आणि तिच्या मैत्रिणींनी लढा देत आहेत.

मुलीचे म्हणने पटले
घरातील परिस्थिती पाहून मुलगी शाळेत असतांनाच विवाह करण्याचे ठरवले. मात्र, तिने याचे दुष्परिणाम सांगीतले. ते आम्हाला पटले. आता तिला हवे तेवढे शिकू देणार आहे. मुलगी स्वत:च्या पायावर उभी राहिल्यावरच विवाहाचा विचार करू.- कमलाबाई घोरपडे, मनिषाची आई

Related Articles

Close