Happenings
सोशल मिडीयाचा वापर ज्ञान, पैसे मिळवण्यासाठी करा
कोडींग व्हिजन्स इन्फोटेकचे वेदांत जागीरदार यांचे प्रतिपादन
दिवसातले ४-५ तास सोशल मिडीयावर वाया घालवण्यापेक्षा या माध्यमाचा ज्ञान आणि पैसा मिळवण्यासाठी वापर करा. स्पर्धेच्या युगात पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रॅक्टीकल ज्ञानाची गरज आहे. चाकाेरीबाहेरील विचार करणाऱ्या, कल्पक तरूणांना नोकरीच्या बाजारात मोठी मागणी आहे. यामुळे केवळ परीक्षेपुरता अभ्यास न करता भविष्याचा विचार करून शिक्षण घेण्याचे आवाहन कोडींग व्हिजन्स इन्फोटेक प्रा.लिमीटेडचे कार्यकारी संचालक वेदांत जागीरदार यांनी केले.
देवगिरी महाविद्यालयातील संगणकशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान विषयातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आज इन्स्पायरेशनल टॉक या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात जागीरदार बोलत होते. या प्रसंगी प्राचार्य डॉ. उल्हास शिऊरकर, उपप्राचार्य संजय कल्याणकर, कोडींग व्हिजन्सचे सहसंस्थापक आकाश पाथरकर यांची उपस्थिती होती.
वेदांत आणि त्यांचे चार मित्र आकाश पाथरकर, अतुल कापसे, सोनिक जाधव आणि सागर महेर यांनी वयाच्या १९ व्या वर्षी कोडींग व्हिजन्स ही आयटी कंपनी सुरु केली. अवघ्या ५ वर्षातच कंपनीचा व्याप वाढला असून आजघडीला ५ देशात याचे काम चालते. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, वेबसाईट डिझायनींग आदी क्षेत्रात कंपनी करते.
वेदांत म्हणालेे, सोशल मिडीयावर वेळ घालवणे वाईट नाही. पण हे टाईमपासचे माध्यम नसून ते सोशल नेटवर्किंगचे काम करते. या नेटवर्किंगचा वापर करून व्यवसायाची मोठी संधी उपलब्ध होऊ शकते. या माध्यमावर शिक्षण घ्या, पैसे कमवा, असा सल्ला त्यांनी दिला. नोकरीसाठी डिग्री नव्हे तर ऑऊट ऑफ बॉक्स विचार करणाऱ्यांची गरज आहे. संभाषण कौशल्य वाढवा, व्यक्तीमत्त्व विकास करा, चुणूकदार बना. परीक्षेपुरता नव्हे तर आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अभ्यास करा, मग यश तुमचेच आहे, असे जागीरदार यांनी सांगीतले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तरातून शंकांचे समाधान करून घेतले.