Happenings

पुरूषांच्या तुलणेत स्त्रीयांची संख्या अजूनही कमीच

युनिसेफ, राष्ट्रीय कौटूंबिक आरोग्य सर्वेक्षणातील निष्कर्ष

महिला, बालकल्याण, कुटूंबनियोजन, पोषक आहार आणि आरोग्याच्या क्षेत्रात गेल्या १० वर्षाच्या तुलणेत महाराष्ट्रातील परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. निर्णय प्रक्रियेत महिलांचा समावेश वाढला आहे. महिला हिंसाचाराचे प्रमाण घटले आहे. राज्यातली व्यसानाधिनाही घटली आहे. मात्र, पुरूषांच्या तुलणेत स्त्रीयांची संख्या काही केल्या वाढायला तयार नाही. अनेक क्षेत्रात सुधारणेला वाव आहे.

केंद्रिय आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयातर्फे चौथे राष्ट्रीय कौंटूंबिक आरोग्य सर्वेक्षण-२०१६ करण्यात आले होते. मुंबईतील आंतरराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्थान या सर्वेक्षणासाठी नोडल एजन्सी म्हणून नियुक्त होती. तर युनिसेफ, बील अॅण्ड मिलींडा गेट्स फाऊंडेशन, मॅक आर्थर फाऊंडेशन, यूएस एड, यूके एड आणि नॅको संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हे सर्वेक्षण करण्यात आले. ग्रामीण आणि शहरी असा समतोल राखत हे सर्वेक्षण घेण्यात आले. महाराष्ट्राच्या बाबतीत याचे निष्कर्ष किमान काही क्षेत्रासाठी तरी दिलासादायक आहेत.

स्त्री-पुरूष असमानता कायम
व्यापक जनजागृती सुरू असतांनाही पुरूषांच्या तुलणेत स्त्रीयांची संख्या कमीच आहे. २००५ मध्ये एक हजारामागे स्त्रीयांची संख्या ९७२ होती. यंदा ही संख्या ९५२ वर घसरली आहे. ग्रामीण भागात हजार पुरूषांमागे ९६७ तर शहरात ९३५ एवढी आहे. लोकसंख्येच्या २५.१ टक्के महिलांचा विवाह वयाच्या १८ वर्षाखाली लागला. २००५ मध्ये हे प्रमाण ३९ टक्के होते. १६.७ टक्के पुरूषांनी २१ वर्षे वयाआधीच विवाह केला. २००५ मध्ये हे प्रमाण २०.७ टक्के होते. शहरी भागातील ६ तर ग्रामीण भागातील १०.४ अशा एकूण ८.३ टक्के मुली १५ ते १९ वर्षाच्या असतांनाच आई झाल्या. २००५ मध्ये हे प्रमाण १३.८ टक्के होते. २००५ मध्ये घरात वीज वापरणाऱ्यांची संख्याही ८३.५ टक्क्यांवरून ९२.५ वर पोहचली आहे.

व्यसनाधिनता घटली
१५ ते ४९ वयोगटातील ५.८ टक्के महिला गुटखा, तंबाकू, खर्रा अशा वेगवेगळ्या पद्धतीने तंबाकूचे सेवन करतात. ग्रामीण भागात तंबाकू खाणाऱ्या महिलांची संख्या अधिक ७.४ टक्के आहे. २००५ मध्ये ही संख्या १०.५ टक्के होती. तबांकू खाणाऱ्या पुरूषांची संख्या मोठी आहे. शहरी भागात ३३.९ तर ग्रामीणमध्ये ३९.३ टक्के असे ३६.५ टक्के पुरूष तंबाकूचे व्यसन करतात. २००५ मध्ये हे प्रमाण ४८.३ टक्के होते. मद्यप्राशन करणाऱ्या महिलांचे प्रमाण २००५ मध्ये ०.४ टक्के होते. ते यंदा अर्ध्यावर म्हणजेच ०.२ टक्क्यांवर आले आहे. मद्यप्राशन करणाऱ्या पुरूषांचे प्रमाण मात्र चिंताजनक आहे. २२.८ टक्के शहरी तर १८ टक्के ग्रामीण अशा २०.५ टक्के पुरूषांनी मद्यप्राशन करत असल्याचे सांगीतले. प्रत्यक्षात ही संख्या कितीतरी अधिक असावी, असे तज्ञांना वाटते. २००५ मध्ये २४ टक्के पुरूषांनीच मद्यप्राशन करत असल्याचे सांगीतले होते.

एड्सबाबत प्रबोधनाचा फायदा
एचआयव्ही-एड्सबाबत सुरू असलेल्या व्यापक जनजागृतीचा महिलांना फायदा झाल्याचे हे सर्वेक्षण सांगतंय. १५ ते ४९ वर्षे वयाच्या ३० टक्के महिलांनी एड्सबाबत संपूर्ण माहिती असल्याचे सांगीतले. २००५ मध्ये हे प्रमाण २९.५ टक्के होते. पुरूषांच्या बाबतीत मात्र हे प्रमाण घटलेय. २००५ मध्ये ५२.५ टक्के पुरूषांनी एड्सबाबत सर्वसमावेशक माहिती असल्याचे सांगीतले होते. यंदा हे प्रमाण ४४.४ टक्केच होते. सुरक्षीत साधनांचा वापर केला तर एड्स टाळता येऊ शकतो, असे ६७.९ टक्के महिलांना आणि ८६.२ टक्के पुरूषांना माहिती आहे. २००५ मध्ये हे प्रमाण अनुक्रमे ४६.९ आणि ८०.४ टक्के होते.

निर्णय प्रक्रियेत महिला
घरगूती निर्णयप्रकियेत महिलांना सहभागी करून घेण्याचे प्रमाण ग्रामीण आणि शहरी भागात ८९.३ टक्के झाले आहे. २००५ मध्ये हे प्रमाण ८४.९ टक्के होते. विवाहितेवर हिंसाचाराचे प्रमाण ३०.७ टक्क्यांवरून २१.४ टक्क्यांवर आले आहे. २.९ टक्के महिलांनी गर्भवती असतांना हिंसाचाराला सामोरे गेल्याचे सांगीतले. शहरातील ३५.२ तर ग्रामीण भागातील ३३.३ टक्के महिलांना संपत्तीत वाटा किंवा स्वत:च्या मालकीची संपत्ती अाहे. शहरी भागातील ५२ तर ग्रामीण भागातील ३८.७ अशा एकूण ४५.३ टक्के महिलांचे बँकेत खाते अाहे. २००५ मध्ये केवळ २०.३ टक्के महिलांचे बँकेत खाते होते. सरकारच्या जनधन योजनेमुळे खात्यांची संख्या वाढली आहे. तर शहरातील ६०.४ आणि ग्रामीण भागातील ३०.९ अशा एकूण ४५.६ टक्के महिलांकडे स्वत:चा मोबाईल फोन अाहे

Related Articles

Close