मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद शहरासाठी १६८० कोटी रूपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर केली होती. त्याचे टेंडर निघाले. मात्र, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पाच डिसेंबर रोजी अध्यादेश काढून या योजनेला स्थगिती दिली. भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी शुक्रवारी राजीनामा दिला. महापालिकेत या तापलेल्या राजकारणावरून शिवसेनेसोबत युती भाजपने तोडली असून आता भाजप महापालिकेत विरोधी पक्षाची भूमिका बजावणार असल्याची माहिती शनिवारी (ता. १४) आमदार अतुल सावे व शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यंानी पत्रकार परिषदेत दिली.
शनिवारी किशनचंद तनवाणी, अतुल सावे यांनी जिल्हा कार्यालयात सर्व नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत महापौर नंदकुमार घोडेले यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा अशी मागणी नगरसेवकांनी केली. भाजपचे सर्व नगरसेवक व महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्याकडे आपले राजीनामे सुपूर्द केले असल्याचे सावे यांनी यावेळी सांगितले. हे राजीनामे पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात येतील व येत्या दोन दिवसात त्याविषयी बैठक होणार आहे. उपमहापौरंाचा राजीनामा सोमवारी ता. १६ रेाजी महापौरंाकडे देण्यात येणार आहे. तत्पूर्वी महापौर हे युतीच्या मतावर निवडून आले त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आम्ही करणार आहोत. असे किशनचंद तनवाणी यावेळी म्हणाले. तसेच महापालिकेत औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव मांडावा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ. यासह जिल्हा परिषदेतही ठरावा मांडावा अशी मागणी यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी केली. यावेळी माजी महापौर भगवान घडामोडे उपमहापौर विजय औताडे, गटनेते प्रमोद राठोड, राजू शिंदे, कचरू घोडके, व २३ नगरसेवक, ६ अपक्ष नगरसेवक उपस्थित होते.