In Short
एनआरसी विरोधात एमआयएम २० डिसेंबर रोजी करणार राज्यव्यापी आंदोलन
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (एनआरसी) विरोधात ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन २० डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता राज्यभर आंदोलन करणार आहे. शहरातील विभागीय आयुक्त कार्यालयावर जिल्हास्तरीय आंदोलन करण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातून सर्व समाजाचे महिला पुरुष व लहान मुले सहभागी होणार आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व महिला व लहान मुलं करणार असल्याची माहिती एका पत्रकार परिषदेत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.
सर्वच समाजाच्या नागरिकांवर अन्याय कारक हा कायदा आहे. या कायद्याला सर्व समाजाच्या व्यक्तीने विरोध करावा तसेच . २० डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता हा मोर्चा आझाद चौक येथून सुरू होणार आहे. तो रोशन गेट, चंपा चौक मार्गे विभागीय आयुक्त कार्यालय येथे जाऊन विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे. यात विविध धर्म समाजाचे व्यक्ती व संघटना सामील होणार आहे. विविध सामाजिक संघटना, शैक्षणिक वैद्यकीय, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याशी संपर्क केला आहे. ते या आंदोलनात सामील होणार असल्याची माहिती इम्तियाज जलील यांनी दिली. हा विरोध केवळ पक्षाकडून नसून यात सर्व पक्षाच्या लोकशाहीवादी विचाराच्या व्यक्तींनी सामील व्हावे. हे आंदोलन झाल्यानंतर जानेवारीमध्ये असदोद्दीन ओवेसी यांच्या नेत्रृत्वाखाली मुंबईमध्ये मोठे आंदोलन करण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेस शेख अहेमद, डॉ. गफ्फार कादरी, अरूण बोर्डे, गंगाधर ढगे, मौलाना महेफुजउर रहेमान फारूकी यांची उपस्थिती होती.