Happenings

महाराष्ट्र बंदला औरंगाबाद शहरात संमिश्र प्रतिसाद

किरकोळ घटना वगळता बंद शांततेत

वंचित बहुजन आघाडी ने सीएए व एनआरसी विरोधात महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला शुक्रवारी (दि.२४) औरंगाबाद शहरात संमिश्र प्रतिसाद पहायला मिळाला. दरम्यान, सकाळच्या सत्रात आंदोलकांनी शहर वाहतुकीच्या एका बसवर दगडफेक करून बसच्या काचा फोडल्या, त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
केंद्र शासनाने लागू केलेल्या सीएए आणि एनआरसी विधेयकासह केंद्र शासनाच्या संविधान विरोधी धोरणाविरूध्द वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला संविधान बचाव आणि विविध आंबेडकरवादी संघटनांनी पाठींबा दिला होता. शुक्रवारी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये टीव्ही सेंटर, उस्मानपुरा, पिरबाजार, हर्सुल टी पॉईन्ट, एकतानगर, आंबेडकरनगर, किराडपुरा, रोशनगेट, सिटीचौक, शहागंज, टाऊनहॉल, सिडको-हडको, जवाहर कॉलनी, गारखेडा परिसरातील शिवशंकर कॉलनी, त्रिमुर्ती चौक, विष्णूनगर, शिवाजीनगर, मुवुंâदवाडी, संजयनगर, चिकलठाणा, वाळुज, पंढरपुर आदी भागात संमिश्र प्रतिसाद पहावयास मिळाला. शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या पैठणगेट, गुलमंडी, औरंगपुरा, निरालाबाजार, जालना रोड, सराफा मार्केट, नुतन कॉलनी आदी भागातील दुकाने आणि दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे सुरू होेते.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने पुकारलेला बंद यशस्वी व्हावा यासाठी वंचित आघाडीचे युवा प्रदेशाध्यक्ष अमित भुईगळ, जिल्हाध्यक्ष मनोज निनाळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अ‍ॅड. लता बामणे, वंदना नरवडे, विलास भिसे, एस.पी.मगरे, संदीप वंâठे, मेघानंद जाधव, किरण दगडे, पंडित तुपे, गौतम भिसे, राजू भिंगारदेव, सुनील भुईगळ, संतोष साबळे, पंडित हिवराळे आदी परिश्रम घेत होते.

सिटी बसवर दगडफेक
मनपाच्या स्मार्ट सिटी बसवर दगडफेक करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. औरंगपुरा येथून वाळूजकडे जाणारी बस पंचवटी चौकात येताच अज्ञात व्यक्तीने बसवर दगडफेक केली. या घटनेत बसची ड्रायव्हर साईडची काच फुटली. याप्रकरणी दगडफेक करणाऱ्याविरूध्द वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तगडा पोलिस बंदोबस्त
वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या बंदला कोणतेही हिंसक वळण लागू नये यासाठी शहरभर तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिस उपायुक्त-२, सहाय्यक आयुक्त-५, पोलिस निरीक्षक-३७, उपनिरीक्षक-५०, राज्य राखीव दलाची एक तुकडी, १ हजार २०० पोलिस कर्मचारी बंदोबस्त कामी तैनात करण्यात आले होते. तसेच शहरातील ७३ संवेदनशील ठिकाणी पोलिसांचे फिक्स पॉईन्ट लावण्यात आले होते अशी माहिती पोलिस सुत्रांनी दिली.

Related Articles

Close