Features

बालविवाहात मराठवाडा अव्वल, राज्यातील १७ अतिधोकादायक जिल्ह्यांपैकी बीड, जालनासह ८ विभागातले

कमी वयातील विवाहामुळे जन्माला येतात अशक्त बाळ

बालविवाह कायद्याने गुन्हा असला तरी महाराष्ट्रासह देशभरात अजूनही २६.८ % मुलींचे विवाह १८ वर्षाखालील वयात होतात. पुरोगामी महाराष्ट्रही बालविवाहाच्या बाबतीत अव्वल स्थानावर असून राज्यात सर्वाधिक बालविवाह मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात होतात. यात बीड, जालना आणि औरंगाबाद जिल्हे आघाडीवर आहेत. बालविवाहामुळे जन्माला येणारे बाळही अशक्तच राहते.

बालविवाह प्रतिबंधक कायदा २००७ प्रमाणे विवाहासाठी मुलाचे वय २१ तर मुलीचे १८ वर्षे निर्धारीत करण्यात आले आहे. याखालील वयात केलेले विवाह बालविवाह आणि बेकायदेशीर ठरतात. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे. चौथ्या राष्ट्रीय कौटूंबिक आरोग्य सर्वेक्षणानुसार संपूर्ण जगात बालविवाहाच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. जगातील ४० % बालविवाह भारतात होतात. भारतातील २६.८ % मुलींचे विवाह वयाच्या १८ वर्षांपूर्वी होतात. बिहारमध्ये सर्वाधिक ६८ % तर हिमाचलप्रदेशमध्ये सर्वात कमी ९ % बालविवाह होत असल्याचे हा अहवाल सांगतो. महाराष्ट्रही याबाबतीत मागे नाही.

बालविवाह घटले, तरी परिस्थिती गंभीर
आरोग्य सर्वेक्षणानुसार राज्यात १९९८-९९ मध्ये ४७.४ मुलींचे विवाह १८ वर्षाखाली असतांना झाले. २००५-०६ मध्ये हे प्रमाण ३९.४ % होते. तर २०१५-१६ मध्ये त्यात आणखी घट होऊन हे प्रमाण २५.१ % एवढ्यावर आले. अर्थात २० वर्षात बालविवाहाचे प्रमाण तब्बल २२ टक्क्यांनी घटले. तरी परिस्थिती अजूनही गंभीर आहे.

महाराष्ट्रात बालविवाह
वर्ष                 १९९८-९९              २००५-०६            २०१५-१६
ग्रामीण             ६२.४                     ४८.९                ३१.५
शहरी              ३१.४                      २८.९                 १८.८
एकूण              ४७.४                     ३९.४                 २५.१

सर्वाधिक बालविवाह मराठवाड्यात
मुलांच्या आरोग्यासाठी कार्य करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांचा बाल आपत्ती निधी म्हणजेच युनिसेफने २०१९ मध्ये प्रकाशित केलेल्या अहवालानुसार राज्यातील ३५ पैकी सर्वाधिक बालविवाह होणाऱ्या १७ जिल्ह्यात मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांचा समावेश आहे. २० ते २४ वयोगटातील विवाहीत मुलींशी संवाद साधून ही आकडेवारी मिळवण्यात आली आहे. मराठवाड्यात एकूण विवाहाच्याा ५० % मुलींचे विवाह वयाच्या १८ वर्षाखाली होतात.

बीड, जालना, औरंगाबाद टॉपवर
युनिसेफच्या आकडेवारीनुसार राज्यात सर्वाधिक ५१.३ % बालविवाह बीड जिल्ह्यात होतात. त्यापाठोपाठ जालना- ४९.१ % आणि औरंगाबाद- ४६.२ % चा समावेश आहे. सर्वात कमी बालविवाह होणाऱ्या तीन जिल्ह्यात भंडारा- ४.५ %, गोंदिया – ५.७ % तर नागपूर- ७ % चा समावेश आहे.

बालमातांची संख्या वाढली
बालविवाहामुळे कमी वयात आई होण्याचे प्रमाणही वाढले आहे. शहरी भागातील ६ % तर ग्रामीण भागातील १०.४ % अशा एकूण ८.३ % मुली १५ ते १९ वर्षाच्या असतांना गर्भवती राहतात. २००५-०६ मध्ये हे प्रमाण १३.८ % होते. बालविवाहाचे धोकेही मोठे आहेत. सर्वाधिक बालविवाह होणाऱ्या १७ पैकी १३ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक खुरटलेली बाळे आहेत. कमी वजन, कमी वाढ झालेली ही बाळ अशक्त राहतात. बालविवाह झालेल्या माता तसेच बाळाच्या मृत्युची शक्यता अधिक असते. तर बाळंतपणावेळी गुंतागंूत वाढल्याने गर्भपात करण्याची वेळ येते. संसर्गाचा धोका वाढतो. रक्ताक्षयही होतो.

एक खाणारे तोेंड कमी
बालविवाहाचे मुख्य कारण गरीबी हेच आहे. मुलीचे लग्न झाले तर घरातले खाणारे एक तोंड कमी होते. तर लग्नानंतर सासरच्या मंडळींसाठी एक कमविणारा हात मिळतो. सामाजिक सुरक्षिततेचा अभावही याचे कारण आहे. विवाह लावला तर जबाबदारीतुन मुक्तता होते ही भावना असते. अंधश्रद्धा, शिक्षणाच्या अभावामुळेही बालविवाह होतात.

Related Articles

Close