Happenings
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये तुंबळ हाणामारी
महाविद्यालयामधील दोन विभागांच्या विद्यार्थ्यांच्या वादात बाहेरील राजकीय कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केल्याने तुंबळ हाणामारी झाली. यात तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी दुपारी चार वाजता शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात घडली. हल्लेखोर एका राजकीय पुढाऱ्याच्या कारमधून आले होते. स्वप्निल सोनवणे, अभिजित राऊत यांच्यासह त्यांचा मित्र जखमी झाला आहे. महाविद्यालयाच्या इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक शाखेच्या विद्यार्थ्यांमध्ये आपसात वाद झाले होते. मंगळवारी एका गटातील विद्यार्थ्याने वादाला मोठे स्वरूप देत बाहेरील मित्र व नातेवाइकांना महाविद्यालयात बोलावून घेतले. दुपारी चार वाजेच्या सुमारास पदमपुऱ्यातील काही तरुण कारमधून आले.
वाद वाढवून त्यांनी थेट स्वप्निल, अभिजित व त्यांच्या मित्रांवर लोखंडी रॉड, काठीने हल्ला चढवला. महाविद्यालयात तुंबळ हाणामारी झाल्याने तणाव निर्माण झाला. वेदांतनगर पोलिसांना घटनेची माहिती कळताच त्यांनी धाव घेतली. तोपर्यंत हल्लेखोर पळून गेले. पदमपुऱ्यातील त्या करणाऱ्या तरुणांच्या दादागिरीवरून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. पोलिसांनी विद्यार्थ्यांची समजूत काढून शांत केले. त्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने दिलेल्या पत्रानंतर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात आले.