Happenings
बीडबायपास रोडवर ट्रक चालकाला भरदिवसा लुटले
लिफ्ट मागुन बळजबरीने ट्रक मध्ये घुसणाऱ्या चार जणांच्या टोळक्याने ट्रक चालकाला मारहाण करत लुटले. ही घटना शनिवारी (दि.४) दुपारी साडे तीन ते सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान देवळाई चौक ते बेस्ट्रप्राईज मॉल दरम्यान घडली. दिवसाढवळ्या ट्रक चालकाला लुटण्यात आल्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश गोपाळ लोमटे (वय २४, रा. दिवटी ता. तुळजापुर जि. उस्मानाबाद) असे मारहाण झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. मंगेश लोमटे व त्यांचा साथीदार हे उस्मानाबादहुन औरंगाबाद मार्गे अहमदाबाद कडे ट्रक क्रमांक एमएच २५ यू ९२०० घेवून जात होते. त्यांचा ट्रक देवळाई चौकात आला असता चार अनोळखी तरूणांनी त्यांना लिफ्ट मागितली. त्यावेळी ट्रकचालक लोमटे यांनी लिफ्ट देण्यास नकार दिला असतांनाही चौघे बळजबरीने ट्रकमध्ये शिरले.
चौघांनी ट्रकमधील लोखंडी सळईचा धाक दाखवून लोमटे व त्यांच्या साथीदाराकडून रोख ५ हजार रूपये, मोबाईल, एटीएम कार्ड घेऊन पोबारा केला. याप्रकरणी लोमटे यांनी सातारा पोलीस ठाणे गाठत लुटमारी करणाNयाविरूध्द तक्रार दिली. याप्रकरणी चार अनोळखी लुटारू विरूध्द सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ओगले करीत आहेत.
—————————— ————————-