Visit Our Website
Happenings

कोर्ट म्हणाले, राज्यातील परिस्थिती गंभीर. दहा सप्टेंबर पर्यंत आयोगाच्या कामाचा अहवाल सादर करण्याचे दिले आदेश

मराठा आरक्षणाबाबत सुनावणी.

मराठा आरक्षणाबाबत आज मुंबई हायकोर्टात झालेल्या सुनावणी दरम्यान कोर्टाने सांगितले की, राज्यातील परिस्थिती गंभीर आहे, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लवकर काम पूर्ण करा. १० सेप्टेंबर  आयोगाच्या कामाचा अहवाल कोर्टात सादर करण्याचे सांगितले. मराठा आरक्षण प्रकरण न्यायप्रविष्ट असताना हिंसक आंदोलने थांबवा. तरुण आत्महत्या करीत आहेत याबाबत कोर्टाला काळजी वाटत आहे, प्रत्येकाचा जीव किमती आहे. हिंसक आंदोलने व आत्महत्या प्रकरण थांबवण्यासाठी याचिकाकर्त्यांनी समाजाला आवाहन करावं असं कोर्टाने सांगितलं. याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी राज्यभरातील आंदोलनांची बाब कोर्टाच्या नजरेस आणून दिली आहे तसंच आत्तापर्यंत सात तरूणांनी आत्महत्या केल्याची माहिती पाटील यांनी हायकोर्टाच्या निर्दशनास आणून दिली होती. त्यामुळे याचिकेवरील सुनावणी लवकरात लवकर घेण्याची विनंती करण्यात आली होती. यानंतर कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी १४ ऑगस्ट ऐवजी आज ०७ ऑगस्ट रोजी घेतली. मराठा आरक्षणाचा निर्णय नवीन शैक्षणिक वर्ष सुरू व्हायच्या आत घ्यावा जेणेकरून लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टात डिसेंबर २०१७ मध्ये विनोद पाटील यांच्या वतीने दाखल करण्यात आली होती. न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभू-देसाई यांच्या खंडपीठापुढे आज अॅड.लीना पाटील यांनी बाजू मांडली तर सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील रवी कदम यांनी बाजू मांडली.

 

पाच संस्था करणार अहवाल तयार

मराठा आरक्षणासाठी ५ संस्थांना काम देण्यात आले आहे. लवकरात लवकर काम करण्याचे आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिला आहे.  हा आयोग वेगवेगळ्या विभागांकडून माहिती घेत आहे.  राज्यभर जनसुनावणी घेतली जात आहे. अशी माहिती सरकारने याप्रसंगी कोर्टात दिली. तसंच अायोगाला २ लाख सूचना मिळाल्या आहेत तशी माहितीची नोंदणी आणि वर्गीकरण याचं काम सुरू आहे. या पॅनलचं काम संपून ते आयोगाला ५ सप्टेंबरपर्यंत अहवाल देतील. मागासवर्गीय आयोग स्वतंत्रपणे काम करत आहे, त्यांची भूमिका तेच सांगू शकतील.

चर्चेसाठी शासन तयार

रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय सह्याद्री वाहिनीवरुन थेट जनतेशी संवाद साधला.  मराठा आरक्षणाबाबत वैधानिक कारवाई नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण करणार, सर्वांचे हित जपूनच मेगाभरती करणार अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसंच लोकशाहीने अनेक मार्ग आंदोलनासाठी दिले आहेत. त्यात हिंसेला स्थान नाही. हिंसेमुळे आंदोलन, विचार, संघर्ष बदनाम होतो. कोवळी तरूणाई आत्महत्या करते, यामुळे मनाला अतिशय वेदना होतात त्यामुळे आत्महत्या करू नका चर्चेला या मी तुमच्यासाठी एक पाऊल मागे घ्यायला तयार आहे असं आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close