Features
राज्यातील २२ मतदारसंघात ब्राम्हण समाज “डिसीजन मेकर’
उमेदवार निवडूण आणण्याची किंवा पाडण्याची ताकद असल्याचा दावा
देशातील १९२ तर महाराष्ट्रातील २२ लोकसभा मतदारसंघात उमेदवाराचे भवितव्य ठरवण्यात ब्राम्हण समाज निर्णायक भूमिकेत असल्याचा दावा आखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने केला आहे. समाजाची ताकद लक्षात घेऊन प्रत्येक पक्षाने राज्यात ४८ पैकी किमान ५ मतदारसंघात ब्राम्हण उमेदवार देण्याची मागणी महासंघाने केली आहे. तर आर्थिक निकषांवर आरक्षणास समर्थन देणाऱ्या पक्षाला पाठींबा देणार असल्याचे महासंघाने निश्चित केले आहे.
लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर आखिल भारतीय ब्राम्हण महासंघ ताकद दाखवण्यासाठी मैदानात उतरला आहे. महासंघाच्या स्वयंसेवकांनी दिड महिन्यांपासून राज्यभरात घरोघरी जावून मतदारांचा कौल जाणून घेतला. यातून महासंघाला ब्राम्हणांच्या ताकदीचा अंदाज आला. २०१४ च्या लोकसभा निवडणूकीतही अशा प्रकारचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यातून राज्यातील ४८ पैकी किमान २२ मतदारसंघात ब्राम्हण समाज निर्णायक संख्येत असल्याचे स्पष्ट झाले. या ठिकाणी ब्राम्हण समाज एखाद्या उमेदवाराला विजयी करण्यात किंवा पाडण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतो, असा दावा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी दिव्य मराठीशी बोलतांना केला आहे.ं
पाच ब्राम्हण उमेदवार असावेत
२०१४ च्या निवडणूकीत महाराष्ट्रात गुरूदास कामत, नितीन गडकरी आणि पूनम महाजन हे ३ ब्राम्हण खासदार निवडून आले. २०१९ मध्ये ब्राम्हण समाजाचा एकूण प्रभाव आणि लोकसंख्या लक्षात घेता प्रत्येक राजकिय पक्षाने ४८ पैकी किमान ५ जागांवर ब्राम्हण उमेदवार द्यावेत. ही मागणी पूर्ण करणाऱ्या पक्षाला पाठींबा देणार असल्याचे गाेविंद कुलकर्णी यांनी सांगीतले. अजून पक्षाच्या याद्या जाहीर होणे बाकी आहे. त्यानंतर कोणत्या पक्षाला पाठींबा द्यायचा किंवा विरोध करायचा हे ठरवू, असे कुलकर्णी म्हणाले.
शत प्रतिशत मतदानासाठी प्रयत्न
ब्राम्हण समाज लोकशाहीच्या सर्वात मोठ्या यज्ञात सहभागी होत नसल्याची वारंवार टिका होते. यावर उपाय म्हणून महासंघ मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी पत्रके, सोशल मिडीया आणि प्रत्यक्ष भेटितून नागरीकांचे प्रबोधन करणार आहे. मतदानाच्या दिवशी ब्राम्हण मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी स्वयंसेवक घरोघरी जाणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत शतप्रतिशत मतदान करवून घेण्याचा निर्धार महासंघाने केला आहे. याच्या नियोजनासाठी प्रत्येक शहरात महासंघाच्या बैठका सुरू आहेत.
आर्थिक निकषांवर आरक्षणाला पाठींबा
ब्राम्हणांना आरक्षण नको. तर सर्वच प्रकारचे आरक्षण संपावे. आरक्षणाचे पूर्नमूल्यांकन करावे.सर्व समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना आरक्षण मिळावे, अशी महासंघाची भूमिका आहे. या भूमिकेला समर्थन देणाऱ्या कोणत्याही पक्षाच्या पाठीशी महासंघ ठामपणे उभा राहेल, असे कुलकर्णी म्हणाले.
येथे ब्राम्हण मतदार निर्णायक
राज्यातील २२ मतदारसंघात ब्राम्हण समाज निर्णायक भूमिकेत असल्याचा महासंघाचा दावा आहे. यात मुंबई-५, पुणे-४ यांच्यासह औरंगाबाद, जालना, परभणी, नागपूर, नाशिक या शहरांचा समावेश आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूकीीत महासंघाने ताकद दाखवून भाजपचे १३ उमेदवार पाडले होते, अशी माहितीही कुलकर्णी यांनी दिली.
महासंघाच्या या मागण्या
महासंघाच्या मागण्या मान्य करणाऱ्या उमेदवारांना पक्षाचा विचार न करता महासंघ पाठींबा देणार आहे. पण या मागण्यांचा घोषणापत्रात समावेश करावा, अशी अट घालण्यात आली आहे.
-ब्राम्हण समाजाला उठसूठ हिणवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची तरतूद
-आर्थिक निकषांवर आरक्षण
-ब्राम्हण समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ
ब्राम्हणांची ताकद दाखवणार
ब्राम्हण मतदारांना आतापर्यंत सर्वच राजकिय पक्षांनी गृहित धरले होते. यामुळेच स्वातंत्र्यांच्या ७० वर्षानंतरही ब्राम्हणांसाठी कोणतीच धोरणे नाहीत. २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत राज्यातील ४७ उमेदवारांना महासंघाने पाठींबा दिला होता. पैकी ३६ विजयी झाले होते. २०१९ मध्येही समाज एकजूटीने मतदान करून जास्तीत जास्त उमेदवार विजयी करून आपली ताकत दाखवून देतील. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करू.-गोविंद कुलकर्णी, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ, पुणे