Visit Our Website
Today's Special

कॉमेडीचे सम्राट दादा कोंडके यांचा आज वाढदिवस

आजच्या दिवशी लढल्या गेली स्वराज्याची पहिली लढाई : खळत: बैलसरची लढाई म्हणून इतिहासात नोंद

ऑगस्ट २०१८ दिनविशेष

वार : बुधवार

शके : १९४०

सुर्योदय : ०६.१६

सुर्यास्त : १९.१३

नक्षत्र : कृतिका

तिथी : कृ. दशमी

ऑगस्ट दिनविशेष.

कॉमेडीचे सम्राट दादा कोंडके यांचा आज वाढदिवस ८ ऑगस्ट १९३२ 

८ ऑगस्ट १९३२ ला जन्मलेल्या दादा कोंडकेंचे खरे नांव कृष्णा कोंडके होते. नायगाव – मुंबईच्या मिलमजूर कामगाराच्या घरात गोकुळाष्टमीला जन्मलेल्या ह्या “कृष्णा” ने नावाचे सार्थक मराठी चित्रपट सृष्टीच्या पडद्यावर दाखवून दिले. बँड पथकातून सुरुवात करून हळूहळू वगनाट्य, नाटके ह्यांनी सुरुवात केलेल्या दादांचे चित्रपट जीवन मेहनतीने साकारले गेले. नाटकांच्या निमित्ताने केलेल्या राज्यभराच्या दौर्‍यांनी दादांनी करीयरला सुरुवात केली.

दादांचे बालपण नायगावच्या – मराठी कामगार वस्तीतल्या चाळीत गेले. लहानपणापासून खोडसाळ  असलेल्या दादांनी ‘अपना बाजार’ येथे नोकरी केली. सोडावॉटर बाटल्या, दगड- विटांनी मारामारी केल्याचे दादांनी एका मुलाखतीत सांगितले आहे. एका वर्षातच त्यांच्या कुटुंबातल्या प्रमुख व्यक्तींशी ते काळाने दुरावले व तेव्हा पासून एकटे पडलेल्या दादा कोंडकेंनी जीवन हे खेळकर पणे घालवण्याचा निश्चय केला……. नायगाव परिसरात – “बँडवाले दादा” ह्या नावाने त्यांना लोकं ओळखू लागले. तेथेच त्यांना जीवाभावाचे मित्र मिळाले. सुपरस्टार झाल्यावरही दादा तेथे जात व जुन्या मित्र मंडळीत रमत.

कलेची सेवा बँड पथकाच्या मार्फत करणार्‍या दादांनी मग ‘सेवा दलात’ प्रवेश केला. तेथून सांस्कृतिक कार्यक्रम व नंतर नाटके असा त्यांचा प्रवास सुरू झाला. दादा कोंडके यांनी ’दादा कोंडके आणि पार्टी’’ नावाचे एक कला पथकही काढले. प्रख्यात लेखक वसंत सबनिसांशी ते ह्याच संदर्भातून जोडले गेले. स्वतःची नाटक कंपनी उघडून त्यांनी वसंत सबनिसांना नाटकासाठी लेखन करावयास विनंती केली. तोवर वसंत सबनिसांना त्यांच्या “खणखणपूरचा राजा” ह्या नाटकातल्या भूमिकेने प्रभावित केलेलेच होते. हसरे व खेळकर व्यक्तिमत्त्व लाभलेल्या दादा कोंडकेंसाठी सबनिसांनी मदतीचा हात पुढे केला. सबनिसांनी लिहिलेल्या “विच्छा माझी पुरी करा” ह्या नाटकाने दादांना सुपरस्टार रंगकर्मी बनवले…… १५०० च्या वर प्रयोग झालेल्या ह्या नाटकामुळे दादांना भालजींच्या चित्रपटात काम करण्याची संधी प्राप्त झाली. आशा भोसले ‘विच्छा…. ‘ चा मुंबईतला एकही प्रयोग सोडीत नसत. त्यांनीच दादांना भालजींकडे पाठवले. दादांचे शब्दोच्चार एके ५६ रायफल मधून सुटणार्‍या गोळ्यांसारखे सुसाट असायचे पण नेमक्या ठिकाणी पॉज घेतल्याने प्रेक्षक अख्खे थिएटर (मग ते नाटकाचे असो की सिनेमाचे) डोक्यावर घ्यायचे.

तांबडी मातीने दिला ब्रेक
१९६९ साली भालजी पेंढारकरांच्या “तांबडी माती” ह्या चित्रपटातून पदार्पण केलेल्या दादांनी मग मागे वळून बघितले नाही. तांबडी माती पाठोपाठ आलेल्या “सोंगाड्या -(१९७१)” ने दादांचे आयुष्य बदलून टाकले. ‘सोंगाड्या’ ही त्यांची प्रथम निर्मिती. वसंत सबनिसांनी लिहिलेल्या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन गोविंद कुळकर्णींनी केले होते. बॉक्स ऑफिस वर सुपर डुपर हिट ठरलेल्या ह्या चित्रपटा नंतर एकामागोमाग एक हिट चित्रपटांची लाईन लावून दिली. स्वत:च्या “कामाक्षी प्रॉडक्शन” ह्या चित्रपट निर्मिती कंपनीतर्फे १६ चित्रपट प्रकाशित करणाऱ्या दादांनी ४ हिंदी व १ गुजराती चित्रपट प्रकाशित केला. १९७२ – एकटा जीव सदाशिव, १९७३ – आंधळा मारतो डोळा, १९७५- पांडू हवालदार, १९७६ – तुमचं आमचं जमलं, १९७७ – राम राम गंगाराम, १९७८- बोटं लावीन तेथे गुदगुल्या, १९८०- ह्योच नवरा पाहिजे, १९८७ – आली अंगावर, १९८८- मुका घ्या मुका, १९९०-पळवा पळवी, १९९२- येऊ का घरात व १९९४- सासरचे धोतर हे चित्रपट त्यांच्या कामाक्षी प्रॉडक्शन ने प्रकाशित केले. १९८१ साली ‘गनिमी कावा’ त्यांनी दुसर्‍या (बहुदा भालजींच्याच) बॅनर खाली केला.

लागोपाठ ९ मराठी चित्रपटांच्या रौप्यमहोत्सवी आठवड्यांचे ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ त्यांनी केले.

हिंदीतून – तेरे मेरे बीच में (१९८४); अंधेरी रात में दिया तेरे हात में (१९८५), खोल दे मेरी जुबान (१९८६), आगे की सोच (१९८९) हे चित्रपट त्यांनी प्रकाशित केले. १९७७ साली पांडू हवालदार ह्या मराठी चित्रपटाच्या धर्तीवर “चंदू जमादार” हा गुजराती चित्रपट प्रका्शित केला……

जीवनाचा ‘टर्निंग पाँईंट’
सोंगाड्या चित्रपटात त्यांनी नाम्याची भूमिका केली व तीच त्यांच्या जीवनाचा ‘टर्निंग पाँईंट’ ठरला. नाम्या कलावतीच्या तमाशाला जातो व त्याला तमाशाची चटक लागते हे त्याच्या ‘आये’ ला आवडत नाही. ती त्याला घराबाहेर काढते व तो कलावतीच्या आश्रयाला जातो व तेथे तो तमाशात नावांरूपाला येतो असे हे कथानक आहे. ह्या भोळ्या ‘नाम्या’ ने दादांना एका रात्रीत यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले. पण उभ्या आयुष्यात त्याच ‘नाम्या’ सारखे दादा साधेपणाने वावरले. ताडदेवच्या कामाक्षीच्या कार्यालयात त्यांना भेटायला त्यांचे चाहते महाराष्ट्रातल्या कानाकोपर्‍यांतून यायचे व दादांनी त्यांना कधीच निराश परत जाऊ दिले नाही. चाहत्यांबरोबर फोटो सेशन हा त्यांचा वेगळा दैनिक कार्यक्रम असे…. चाहत्यांकडून स्वत:च्या चित्रपटातले संवाद, क्षण वगैरे ते त्यांच्यात समरसून ऐकून घेत…… कुणी त्यांना आपल्या मुला-बाळांच्या विवाहाचे निमंत्रण देण्यास येई तर कुणी दुकानांच्या उद्‌घाटनाचे…. पण ‘तांबडी माती’ हा पहिला चित्रपट केलेल्या ह्या साध्या भोळ्या नटसम्राटाने स्वत:चे पाय त्याच मातीवर घट्ट रोवून ठेवले होते! त्यांच्या सारखा खरोखरचा ‘डाउन टू अर्थ’ नट मिळणे असंभव !

असा आला शिवसेनेशी संपर्क
वादग्रस्त दादांच्या यशस्वी कारकिर्दीची सुरुवातही वादग्रस्तच असायला हवी असाच विधीसंकेत असावा….. कोहिनूर सिनेमाच्या मालकांनी दादांच्या (सोंगाड्याच्या) आगाऊ आरक्षणाला बगल देऊन देवानंदचा ‘तीन देवियाँ’ हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे ठरवले. दादांनी बाळासाहेब ठाकरेंना साकडे घातले…… मग काय विचारता; शिवसैनिकांनी कोहिनूर बाहेर “राडा” घातला! कोहिनूरच्या मालकांना सेनेचा दणका मिळताच ‘सोंगाड्या’ प्रदर्शित करावयाचे सोंग आणावे लागले…… पण सोंगाड्या सुपर डुपर हिट्ट ठरला व मरगळलेल्या मराठी चित्रपटसृष्टीत खळबळ माजली. १९७२ साली ‘एकटा जीव सदाशिव’ प्रदर्शित झाला. या चित्रपटाची हाईप इतकी झाली होती, की खुद्द राज कपूरने आपल्या पोराला लाँच करताना चित्रपटाची तारीख पुढे ढकलली आणि ‘बॉबी’ पाच महिने उशिरा प्रदर्शित झाला. असे म्हणतात की बॉबी प्रदर्शित करताना राज कपूरला सिनेमागृहांना ‘एकटा जीव सदाशिव’ उतरवण्याची विनंती करायला लागली होती. बॉबी गाजलाच, पण त्यामागोमाग आलेल्या ‘आंधळा मारतो डोळा’ने लाईम-लाईट पुन्हा दादा कोंडकेंवर आणला. १९७५ मध्ये पांडू हवालदारच्या रुपात दादा पुन्हा पडद्यावर आले. पांडू हवालदार मध्ये दादांनी ‘अशोक सराफ’ या उमद्या कलावंताला संधी दिली. यातूनच दादांची दूरदृष्टी दिसून येते. मुंबई पोलिसांचा हा हवालदार तिकीट्बारीवर MI6 च्या एजंटला भारी पडला. पांडू हवालदारमुळे मुंबईत MGM ला The Man With The Golden Gun लावायला सिनेमागृहे मिळेनात. कधी नव्हे ते जेम्स बाँडचा सिनेमा महाराष्ट्रात फ्लॉप गेला. त्याचबरोबर दादांचा आलेख मात्र चढत गेला.

दादांची अवघी कारकीर्द वादग्रस्त होती….. सेन्सॉर च्या दंडेलीपुढे नमते न घेण्याची प्रवृत्ती किंवा नियमाविरुद्ध जाण्याची खुमखुमी; त्यांची शिवसेनेशी बांधीलकी; त्यांचे प्रणय; त्यांचे व्यक्तिगत आयुष्य ते मृत्यूनंतर उठलेले वाद हे एका वादग्रस्त चरित्राचे पैलू असावेत. कायद्याने ते विवाहित होते व तेजस्विनी नावाची त्यांना कन्या होती. पण जनमानसांत ते अविवाहित म्हणून वावरले.

मार्च १४, १९९८ रोजी पहाटे ३. ३० ला रमा निवास ह्या दादरच्या निवासस्थानी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना बाजूच्याच सुश्रूषा नर्सिंग होम मध्ये हालवण्यात आले. आदल्याच दिवशी त्यांचे स्नेही डॉ. अनिल वाकणकरांनी त्यांना तपासले होते पण शेवटी त्यांचे सुश्रूषा हॉस्पिटलात प्राणोत्क्रमण झाले. त्यावेळी त्यांची मोठी बहीण लीलाबाई मोरे हयात होत्या. पुतण्या विजय कोंडकेंनी त्यांच्यावर अंतिम संस्कार केले…….


आजच्या दिवशीचा विशेष घटना

१६४८ : स्वराज्याची पहिली लढाई – पुणे सातारा मार्गावरील खळत-बैलसरच्या लढाईत आदिलशहाचा सरदार फत्तेहखानाच्या फौजेचा शिवाजीराजांनी सपशेल पराभव केला.

८ ऑगस्ट अंतराष्ट्रीय मांजर दिवस –

१९४२ : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर (ऑगस्ट क्रांति मैदान) झालेल्या अधिवेशनात ’चले जाव’ चा ठराव मंजुर केला. याप्रसंगी महात्मा गांधींनी ’करेंगे या मरेंगे’ हा संदेश दिला.

२००८ : चीनमधील बिंजिंग येथे येथे २९ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
२००० : महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा ’महाकवी कालिदास संस्कृत-साधना पुरस्कार’ पुण्याचे वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी यांना जाहीर
१९९८ : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) सात प्रयोगशाळा औद्योगिक क्षेत्रासाठी खुल्या झाल्या.
१९९४ : पुणे येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने फक्त महिलांसाठीच असलेले देशातील पहिले वास्तुशास्त्र महाविद्यालय (Dr. Bhanuben Nanavati College of Architecture for Women) सुरू केले.
१९८५ : भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे ’ध्रुव’ ही भारताची सहावी व आतापर्यंतची सर्वात मोठी फास्ट ब्रीडर संशोधनपर अणुभट्टी कार्यान्वित झाली.
१९७४ : वॉटरगेट प्रकरण – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी राजीनामा दिला.
१९६७ : इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाइन्स, सिंगापूर व थायलँड यांनी ASEAN ची स्थापना केली.
१९६३ : इंग्लंडमधे १५ जणांचा टोळीने रेल्वेवर दरोडा टाकुन २६ लाख पौन्ड पळवले.

आज यांचा जन्म दिवस
१९४० : दिलीप सरदेसाई – क्रिकेटपटू (मृत्यू: २ जुलै २००७)
१९३२ : दादा कोंडके – अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक (मृत्यू: १४ मार्च १९९८)
१९२६ : शंकर पाटील – साहित्यिक, चित्रपट कथालेखक, ग्रामीण कथालेखक, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि ’बालभारती’चे संपादक. त्यांचे ’चोरा मी वंदिले’, ’सागराचे पाणी’, ’सवाल’, ’बाजिंदा’ हे कथासंग्रह तसेच ’सरपंच’, ’इशारा’, ’घुंगरू’, ’कुलवंती’, ’बेईमान’, ’ललाट रेषा’, ’सुन माझी सावित्री’ या कादंबर्‍या हे गाजलेले साहित्य आहे. (मृत्यू: ३० जुलै १९९४)
१९२५ : डॉ. वि. ग. भिडे – शास्त्र व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु, केंद्र सरकारचे वैज्ञानिक सल्लागार (१९७३ – १९७५), पद्मश्री (मृत्यू: ? जून २००६)
१९१२ : बंगळुरू वेंकट तथा बी. व्ही. रमण – जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी (मृत्यू: २० डिसेंबर १९९८)
१९१२ : तुकाराम केरबा ऊर्फ टी. के. अण्णा वडणगेकर – कोल्हापूरची कलापरंपरा जपणारे चित्र व शिल्पकलेतील दिग्गज (मृत्यू: ३१ मार्च २००४)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close