Visit Our Website
Happenings

मुंबईच्या विद्यार्थ्यांनी साकारल्या कैलास लेणीच्या प्रतिकृती

वास्तूविशारद स्नेहा बक्षी, शिल्पकार बलराज माडिलगेकर यांनी केले मार्गदर्शन

वेरूळच्या लेणी कशा तयार झाल्या असतील? कुशल कलाकारांनी अखंड दगडातून कैलास लेणीतील एक एक खांब, शिल्पांची निर्मिती कशी झाली असेल? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आज मुंबईतील तब्बल ७५ विद्यार्थ्यांनी वेरूळ लेणीच्या प्रतिकृती साकारल्या. यातून त्यांना लेणीतील बारकावे लक्षात आले. तर केवळ पर्यटनाचा आनंद न घेता त्यांनी लेणीच्या निर्मितीची रहस्येही जाणून घेतली. औरंगाबादच्या वास्तूविशारद स्नेहा बक्षी आणि शिल्पकार बलराज माडिलगेकर यांनी एका कार्यशाळेत त्यांना याबाबत मार्गदर्शन केले.

मुंबईतील सोमय्या स्कूलच्या सोमय्या सेंटर फॉर एक्सपेरीमेंटल लर्निंगच्यावतीने दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांना वेरूळ, अजिंठा आणि औरंगाबाद शहरातील ऐतिहासीक स्थळांना भेट दिली जाते. यंदा उपक्रमाचे पाचवे वर्ष आहे. सेंटरचे ७५ विद्यार्थी या उपक्रमाअंतर्गत औरंगाबाद भेटीवर आले होते. पहिल्या दिवशी त्यांनी अजिंठा लेणी बघीतल्या. तर आज औरंगाबादेतील पर्यटन स्थळे आणि वेरूळच्या लेणी बघीतल्या. त्यांनतर एलोरा व्हिजीटर सेंटरमध्ये आयोजित एका कार्यशाळेत त्यांनी कैलास लेणी साकारली.

विजय स्तंभाच्या प्रतिकृती
सकाळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांसोबत लेणी बघीतल्या. विशेषत: लेणी क्रमांक १६ म्हणजेच कैलास लेणीतील बारकावे जाणून घेतले. यातील एक एक खांब, शिल्पे, त्यावरील नक्काशी, कलाकारी निरखून बघीतली. नंतर स्नेहा बक्षी आणि बलराज माडिलगेकर यांनी कार्यशाळेत त्यांना मार्गदर्शन केले. यासाठी त्यांनी शाडू मातीचे गोळे आणि प्रतिकृती तयार करण्याचे साहित्य सोबत आणले हाेते. ते विद्यार्थ्यांना वाटण्यात आले. स्नेहा आणि बलराज यांनी विजय स्तंभाची प्रतिकृती तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. नंतर मुलांनी टप्प्या-टप्प्याने स्तंभाची तसेच इतर प्रतिकृती साकारल्या. तब्बल ३ तास चाललेल्या कार्यशाळेत सुंदरलाल कुमावत, सतीश किर्तिकर, भारत शिंदे यांनी सहकार्य केले.

उपक्रमाचे पाचवे वर्ष
दररोज अनेक विद्यार्थी वेरूळ लेणी पहायला येतात. मात्र, त्यापैकी मोजकेच यातील बारकावे गांभीर्याने बघतात. लेणी बघून विसरून न जाता त्याच्या निर्मितीचे महत्व लक्षात यावे, त्या कायम स्मरणात रहाव्या यासाठी ५ वर्षापासून ही कार्यशाळा आयोजित करत आहोत. यातून विद्यार्थी आपल्या पुरातन वास्तूंच्या संवर्धनाबाबत अधिक जागरूक होतात.- स्नेहा बक्षी, वास्तूविशारद आणि कार्यशाळेच्या आयोजक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close