Happenings

एसटी चालकाची गळफास घेऊन आत्महत्या

शेतीवर घेतलेले कर्ज न फिटल्याने तसेच मुलीच्या लग्नासाठी आर्थिक जुळवा-जुळव होत नसल्याने कर्जबाजारी झालेल्या एसटी महामंडळाच्या बसचालकाने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि.१२) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास जाधववाडी परिसरातील सुरेवाडी येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामसिंग धनसिंग डेडवाल (वय ५७, रा.सुरेवाडी, जाधववाडी) असे आत्महत्या केलेल्या बसचालकाचे नाव आहे. रामसिंग डेडवाल यांनी आपल्या शेतीवर बँकेकडून कर्ज घेतले होते. परंतु कर्ज न फिटल्याने तसेच मुलीच्या लग्नासाठी आर्थिक जुळवा-जुळव होत नसल्याने ते मानसिकदृष्ट्या खचले होते. बुधवारी सकाळी रामसिंग डेडवाल यांनी छताच्या पंख्याला ओढणीने बांधुन गळफास घेतला होता. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Articles

Close