Breaking News
पक्ष स्थापनेपासून माझी भूमिका बदलली नाही – राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केल्यापासून मी हिंदुत्वाची आणि मराठीची भूमिका घेतली आहे. आजपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत कधीच भूमिका बदलली नसल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे. आगामी मनपा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा विस्तार करण्याच्या उद्देशाने आपल्या तीन दिवसीय दौर्यानिमित्त शहरात दाखल झालेल्या राज ठाकरे यांनी शुक्रवारी (दि.१४) पत्रकारांशी मनमोकळी अनौपचारीक चर्चा केली.
मशिदीवरील भोंग्यांचा आवाज हा मुद्दा मी पहिल्यांदाच मांडला होता. त्यामुळे आत्ताच मी हिंदुत्ववादी विचारावर आलो आहे असे म्हणणे चुकीचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. रजा अकादमीच्या विरोधात माझ्या पक्षाने मोर्चा काढला होता, त्यावेळी इतर पक्ष कोठे होते असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. आम्ही केलेल्या आंदोलनानंतरच बांग्लादेशींच्या रिक्षा जप्त करण्यात आल्या. मनसेच्या स्थापनेपासून मी मराठीचा मुद्दा हाती घेतला आहे. मात्र मराठी म्हणून अंगावर आला तर मराठी म्हणूनच उत्तर देईल आणि हिंदू धर्माला कोणी नख लावेल तर हिंदू म्हणून अंगावर जाईल. ही माझी पहील्यापासूनची भूमिका राहिली आहे. मी सोयीनुसार भूमिका बदलतो हा आरोप चुकीचा असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
खरेतर हिंदुत्वाचा मुद्दा जनसंघाचा होता. आता इतर पक्षांनीही मुद्दे पळवले. मात्र मी पक्ष स्थापनेपासून माझी भूमिका बदलली नाही. संभाजीनगर का निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्व संभाजीनगर हा मुद्दा उचलला का असे विचारले असता त्यांनी हिंदुत्व आणि विकास याची गल्लत करू नका. हिंदुत्व स्वीकारले म्हणून विकासर रखडतो असे होत नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.