जागतिक तापमानवाढ, हवामान बदल आणि त्यातून उदभवणाऱ्या पर्यावरणविषयक समस्या आता काही नवीन नाहीत. काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे वाटणारे हे विषय आता आपल्या घराचे दारही ठोठावत आहे. महापूर, गारपीट, अवकाळी पाऊस, दुष्काळ, उष्णतेची लाट, वणवे, इथपासून धुळीचे वादळाचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. त्यावर भरपूर चर्चा केली जाते. उपाययोजना शोधल्या जातात. मात्र, निसर्गचक्रातील बदलाचा मोठा परिणाम लहान मुलांवरही होतोय. पण हा वर्ग कायम दुर्लक्षित राहतो. नैसर्गिक संकटांमुळे शाळा अर्धवट सुटते. स्थलांतर करावे लागते. आजार बळावतात. पुरेसे अन्न मिळत नाही. कमी वयात कामावर जाण्याची वेळ येते. बालपन हरवते. बाळाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जन्मल्यानंतरचे पहिले १००० दिवस महत्त्वाचे असतात. मात्र, हवामान बदलामुळे ते ही आरोग्यदायी राहत नाहीत.
जागतिक हवामान बदलामुळे भारतातील २७ टक्के भूभागावर थेट परिणाम झाला आहे. या प्रदेशापैकी काही ठिकाणी तापमान वाढले असून त्याचबरोबर १९७१ ते २०१९ या कालावधीत पाऊस पडण्याच्या प्रमाणातही काही बदल झाल्याचा अहवाल हैदराबाद येथील सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर ड्रायलँड अॅग्रिकल्चर (सीआरआयडीए) या संस्थेने नुकताच प्रकाशित केला आहे. या परिस्थितीसाठी ९५ टक्के जबाबदारी मानवाची असल्याचा अहवाल २०१४ मध्ये स्टॉकहोम येथे भरलेल्या जागतिक हवामान बदल समितीने केला होता. सर्वच देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर शहरीकरण होत असून वाढती लोकसंख्या व औद्योगिकीकरणामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचा अमर्याद वापर वाढला आहे. त्यातच वाहनांच्या बेसुमार संख्येने होणाऱ्या वायुप्रदूषणाने पर्यावरणाच्या हानीत भरच टाकली आहे. त्यामुळे जागतिक तापमानवाढ होणे हा एक अटळ परिणाम होता. वातावरणात अस्तित्वात असलेले काही वायू, पाण्याची वाफ, कार्बन डायऑक्साइड, मिथेन वायू, क्लोरोफ्ल्युरोकार्बन, ट्रोपोस्पेरिक ओझोन आणि नायट्रस ऑक्साइड या वायूंच्या वाढत्या प्रमाणामुळे ग्रीन हाऊस परिणाम जाणवत आहेत.
बालहक्कावर गदा
हवामान बदलामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असतांना त्याचे दुष्पपरिणाम प्रत्येक सजीवावर होत आहे. लहान मुलेही यातून सुटलेले नाहीत. उलट हवामान बदलाचा त्यांना सर्वाधिक फटका बसत असल्याचे युनिसेफच्या “फॉर एव्हरी चाईल्ड, एव्हरी राईट – दि कन्वेन्शन अॉन दि राईट्स ऑफ चाईल्ड अॅट अ क्रॉसरोड्स’ या नोव्हंेबरमध्ये प्रकाशीत अहवालात नमूद करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्राने ३० नोव्हेंबर १९९८ मध्ये संयुक्त राष्ट्र बाल हक्क करार (UNCRC) जाहीर केला होता. भारतही या कराराचा सदस्य आहे. त्यास ३० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल युनिसेफने हा अहवाल प्रकाशित केला आहे.
हवामान बदलाला प्रतिसाद देणारे मुले हे प्रमुख घटक आहेत. मात्र, त्यांना भोगावा लागणारा त्रास कायम दुर्लक्षित राहताे. आजघडीला जगभरात ५०३ दशलक्ष मुले चक्रीवादळामुळे अतीशय धोकादायक ठरणाऱ्या किनारपट्ट्यांवर राहतात. या भागात पाण्याची पातळी वाढते. घरे पाण्याखाली जाातात. अशा संकटात सापडणाऱ्या मुलांची संख्या १० वर्षात सहापटीने वाढली आहे. २००९ ते २०१३ दरम्यान १,७५,००० मुलांना पुराच्या संकटातून सुरक्षित स्थळावर हलवण्यात आले होते. २०१४ ते २०१८ दरम्यान ही संख्या ७,६१,००० एवढी वाढली आहे. १६० दशलक्ष मुलांना भीषण दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. २०४० पर्यंत ४ पैकी १ मुलाला पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येईल. ही संकटे उभी असतांना त्यावर उपाययोजना मात्र होत नाहीत. चक्रीवादळाची आगावू माहिती देणाऱ्या यंत्रणा बसवल्या जात नाहीत. जेथे आहेत त्या सक्षमपणे कार्य करत नाहीत.
संंकटात अडकलेल्या मुलांचे स्थलांतर अशा ठिकाणी केले जाते जेथे त्यास मूलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागतो. नैसर्गिक संकटांमुळे मुलांना शाळा सोडावी लागते. यात मुलींचे प्रमाण ९० टक्के आहे. पालकांना मुलगी ओझे वाटू लागते. तिचा विवाह लावून दिला जातो. अनेक मुली देहविक्रीसाठी दलालांना विकल्या जातात. अनेकींना लैंगिक अत्याचाराला बळी पडावे लागते. मुली घरात राहिल्या तरी त्यांना कामावर जुंपले जाते. मुलांना आरोग्याच्या तक्रारीही उद्भवतात.
पूर, गारपीट, तपमान बदल, वातावरणातील आर्द्रता यामुळे डासांची वाढ होते. डेंग्यु, पिवळा ताप, मलेरियासारखे आजार बळावतात. गेल्या वर्षभरात ५ वर्षाखालील २६६,००० बालकांचा मलेरियामुळे मृत्यु झाला. मुलांना स्वच्छ पिण्याचे पाणी दुरापास्त होते. अशुद्ध पाणी आणि अस्वच्छतेमुळे जगात दररोज ८०० बालकांचा डायरियामुळे मृत्यु हाेतो.
३०० दशलक्ष मुलांना प्रदूषित वायूत श्वास घ्यावा लागतो. यात १७ दशलक्ष मुलांचे वय १ वर्षाखाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते ही मुले अशा ठिकाणी राहतात जेथे हवेतील सूक्ष्म धुलीकण पीएम २.५ प्रमाणाच्या सहापट अधिक आहेत. याचा परिणाम म्हणून श्वसनाच्या आजाराने दरवर्षी पाच वर्षाखालील ६००,००० बालकांचा मृत्यु हाेत असल्याचे युनिसेफच्या हवामान बदल, उर्जा आणि पर्यावरण विभागाचे वरिष्ठ सल्लागार गौतम नरसिंहा सांगतात.
१००० दिवस धोक्याचे
बाळाच्या जन्मानंतरचे पहिले १००० दिवस म्हणजेच बाळ दोन वर्षाचेे होईपर्यंतचा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो. बाळाच्या सुढृढ भावी आयुष्याची पायाभरणी या काळात होते. मात्र, हवामान बदलामंुळे निर्माण झालेल्या संकटांमुळे शेतीचे उत्पन्न घटते. यामुळे अन्न असुरक्षा निर्माण होते. अशा परिस्थितीत विवाह झालेल्या मातांचे आरोग्य बिघडते. गर्भवती असतांना पुरेसा आहार न मिळाल्याने जन्माला येणारे मूलही अशक्त, खुरटलेले, कुपोषित राहते. अशा बाळांचा जगण्याचा दर कमी असतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीप्रमाणे २०५० पर्यंत जगात ५ वर्षाखालील १० दशलक्ष बालके खुरटलेली असतील. बालवयात पुरेसे अन्न न मिळाल्याने त्याचे पुढील आयुष्यात परिणाम भोगावे लागतात. रोग प्रतिकारशक्ती घटलेली असल्याने आजार बळावतात आणि मुले त्यास बळी पडतात. बालकांची एकूण वाढ खुंटते. मेंदूही पूर्ण क्षमतेने काम करत नाही.
जागतिक स्तरावर प्रयत्न आवश्यक
शुद्ध आणि पुरेसे पाणी ही जगण्यासाठीची महत्त्वाची गरज आहे. मात्र, जगभरात पाण्याचे संकट सतावत आहे. यामुळेच तिसरे महायुद्ध पाण्यावरून होण्याचा इशारा अनेक तज्ञांनी दिला आहे. यावरून या संकटाची कल्पना येते. जगभरात आता कोठे हवामान बदलाचा मुलांवर होणाऱ्या परिणामांवर चर्चा सुरू झाली आहे. आतापर्यंतच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, यापुढे ते टाळण्यासाठी अन्न सुरक्षा, स्वच्छ पाणी आणि रोगराईपासून मुक्ततेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे.