Breaking News

खासदार इम्तयाज जलील-कदीर मौलाना यांच्यात मारहाण

कटकट गेट भागात तणावाचे वातावरण, तगडा पोलिस बंदोबस्त तैनात

औरंगाबाद : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील व मध्य मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार कदिर मौलाना यांच्यात कटकट गेट भागातील बुथजवळ हाणामारी झाल्याची घटना सायंकाळी पाचा वाजेदरम्यान घडली. या प्रकारामुळे कटकट गेट भागात तणावाचे वातावरण असून प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान कदिर मौलाना यांच्यावर कारवाई करा या मागणीसाठी इम्तियाज जलील यांच्यासह एमआयएमचे पाचशेहून अधिक समर्थक रस्त्यावर ठिय्या मारून बसले आहेत.
मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात शहरातील कटकटगेट भागात मतदानातील वादातून राष्ट्रवादीचे मध्यमधील उमेदवार कदीर मौलाना आाणि खासदार इम्तियाज जलील यांचे कपडे देखील फाटले होते. या प्रकरणामुळे राष्ट्रवादी व एमआयएमचे समर्थक समोरासमोर आल्याने मोठा तणाव निर्माण झाला. जोरदार घोषणाबाजी सुरू झाल्याने पोलिसांनी तात्काळ जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला.
पण जमाव संतप्त झाल्याने पोलिसांची अतिरीक्त कुमक कटकटगेट भागात बोलावण्यात आली. दरम्यान, इम्तियाज जलील यांना मारहाण झाल्याची माहिती कळताच एमआयएमचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने कटकटगेट भागात दाखल झाले. त्यामुळे वातावरण अधिकच तापले. कदीर मौलाना यांच्याविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या एमआयएम कार्यकर्त्यांना समजवण्याचा पोलिस प्रयत्न करत होते. पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. कदीर मौलाना यांच्यावर कारवाई करा या मागणीसाठी खा. इम्तियाज जलील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते इकरा शाळेजवळ रस्त्यावर ठाण मांडून बसले होते. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला . परंतु अजूनही या भागात कार्यकर्ते आक्रमक असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Related Articles

Close