लवकरच औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ असे होणार आहे. यासाठीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याची घोषणा करतील, अशी माहिती शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद नामांतराचा मुद्दा हाती घेत शिवसेनेवर टीका केली. मात्र, हा शिवसेना प्रमुखांनी घोषणा केलेला मुद्दा आहे आणि शिवसेनाच तो पूर्ण करणार आहे. लवकरच औरंगाबादच्या नागरिकांना याची गोड बातमी मुख्यमंत्री देतील, असे खैरे म्हणाले. राज ठाकरे यांनी औरंगाबाद दौरा सुरू केला आहे. मात्र, येथे प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांनी दौरा आटोपता घेतला आहे. औरंगाबाद महानगर पालिकेच्या अनुषंगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे शहरात आले असले तरी आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी ते येणार नाहीत, असा टोला चंद्रकांत खैरे यांनी लगावला.