politicalSpecial StoryToday's Special
सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील सिंचन व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी सर्वोतोपरी मदत करणार
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची ग्वाही
औरंगाबाद : सिल्लोड – सोयगाव मतदारसंघातील सिंचन व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी सर्वेक्षणाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली आहे.बब यांचा यासाठी तळमळीने पाठपुरावा सुरू आहे असे स्पष्ट करीत सिल्लोड – सोयगाव मतदारसंघातील सिंचन व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी सर्वोतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी औरंगाबाद येथील आयोजित गौरव सोहळ्या प्रसंगी दिली.
मराठवाडा अभियंता मित्र मंडळाच्या वतीने जलसंपदा मंत्री जयंत पाटील, जलसंपदा विभागाचे सचिव अजय कोहिरकर तसेच तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक दिलीप तवार यांच्यासह जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. औरंगाबाद येथील एमजीएम परिसरातील रुख्मिनी सभागृहात हा सोहळा पार पडला.
याप्रसंगी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मनोगत व्यक्त करीत असतांना सिल्लोड – सोयगाव मतदार संघातील दुर्लक्षित व अत्यल्प सिंचन व्यवस्थेमुळे होत असलेल्या शेतकरी आत्महत्या तसेच नवीन व जुन्या सिंचन व्यवस्थेच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधले. जलसंपदा विभागाचे सचिव अजय कोहिरकर, तसेच तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक दिलीप तवार हे दोघे अधिकारी दोन दिवसानंतर सेवानिवृत्त होत आहे. अनेक वर्षानंतर या दोन अधिकाऱ्यांनी मराठवाड्यासह सिल्लोड – सोयगाव मतदारसंघाला न्याय देण्याचे काम केले. येणारे अधिकारी यांना सर्व परिस्थिती सांगायला वेळ जाईल त्यामुळे मंत्री जयंत पाटील यांनी तातडीने दोन दिवसात सिल्लोड – सोयगाव मतदार संघातील प्रलंबित प्रस्तावाला निकाली काढून मान्यता द्यावी अशी विनंती केली. यावर उत्तर देतांना मंत्री जयंत पाटील बोलत होते.
काळजी करू नका मी अजून मंत्री आहे : राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात दोन दिवसांपूर्वीच दोन तीन प्रस्तावाला मान्यता दिली. अजिंठा परिसरात निजाम कालीन सिंचन व्यवस्थेचे पुनर्जीवन करण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे. हा भाग तापी खोऱ्यात येतो. कार्यकारी अभियंता तवार यांच्याकडे हा प्रस्ताव सादर केलेला आहे. ते सेवा निवृत्त होत आहे. ते जरी सेवा निवृत्त झाले तरी काळजी करू नये मी अजून मंत्री आहे जो कोणी अधिकारी येईल ते सकारात्मक पणे काम करतील अशा शब्दांत मंत्री जयंत पाटील यांनी विश्वास व्यक्त केला.