Breaking NewspoliticalToday's Special
केंद्र सरकारच्या निर्देशाची प्रतिक्षा नको, राज्यात कडक उपाय-योजना करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय
मुंबई : जगभरात कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन विषाणूची भीती वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील यंत्रणेला सतर्क राहण्याचे आणि कडक उपाय- योजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या नव्या विषाणूची घातकता लक्षात घेता परत लॉकडाऊनसारखा निर्णय राज्याला परवडणारा नाही. त्यामुळे लॉकडाऊन टाळायचे असेल तर प्रत्येकाला बंधने पाळावीच लागतील, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
राज्यात लॉकडाऊन लागू द्यायला नको असेल तर सर्वांना काही बंधने पाळावीच लागतील, असा इशाराच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. विमानतळावरुन येणाऱ्या प्रवाशांची चाचणी काटेकोरपणे कराण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यासाठी केंद्र सरकरच्या निर्णयाची वाट पाहण्याची आवश्यकता नसून कठोर पावले उचला, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
कोरोनाची दुसरी लाट ओसल्यानंतर तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त करण्यात आला होता. मात्र, लसीकरणाचे वाढते प्रमाण आणि निर्बंध यामुळे अजून तरी तिसऱ्या लाटेचा धोका नाही. मात्र, या नव्या ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुन्हा कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.