Special Story

अंगणवाडी झाली महिलांची जीवाभावाची मैत्रीण, गरोदर आणि स्तनदा मातांचे हक्काचे ठिकाण

एकात्मिक बालविकास सेवा योजना आणि युनिसेफमुळे बदलले चित्र

अंगणवाडी म्हणले लहान मुलांची शाळा, सरकारने दिलेला खिचडीचा तांदूळ, माहितीपत्रके  गोळा करण्याचे, लसीकरणाची माहिती घेण्याचे ठिकाण, असा औरंगाबाद जिल्ह्यातील हर्सूल-सावंगी येथील ग्रामस्थांचा आजवरचा समज होता. पण येथील अंगणवाडी ताईंनी हा समज खोडून काढला आहे. येथे सातत्याने मोठ्या कल्पकतेने आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमातून ग्रामस्थांची अंगणवाडीविषयीची धारणा बदलली आहे. अंगणवाडी म्हणजे गरोदार आणि स्तनदा मातांचे हक्काचे ठिकाण. बाळाच्या आयुष्यातील पहिल्या १००० दिवसापर्यंतच्या वाढीचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन करणारी यंत्रणा. स्वस्थ आणि सुढ्ढढ समाज घडवण्याचे केंद्र, असा त्यांचा ठाम विश्वास झाला आहे.

राजामाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पाेषण मिशन, एकात्मिक बालविकास सेवा योजना (आयसीडीएस), आरोग्य खाते, ग्राम पंचायत हर्सूल- सावंगी आणि युनिसेफच्यावतीने ८ ते २२ मार्च २०१९ दरम्यान “पोषण आहार पंधरवाड्या’चे आयोजन करण्यात आले होते. शक्यतो  पोषण पंधरवाड्यात अंगणवाडीत ग्रामस्थांची रेलचेल असते. मात्र, याच्या ६ महिन्यानंतर येथे काय स्थिती  आहे, याचा आढावा घेण्यासाठी प्रतिनिधीने गावाला भेट दिली. औरंगाबाद शहरापासून १२ किलोमीटरवर असणारे हे गाव आता शहराचे एक उपनगर म्हणून विकसीत होत आहे. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी मार्गावरील या गावालगत बांधकाम व्यावसियाकांनी मोठ मोठाले गृहप्रकल्प उभारले आहेत. असे असले तरी गावाने अजूनही गावपण जपले आहे. मराठवाड्यातील कोणत्याही गावाप्रमाणे हर्सूल- सावंगीची रचना आहे. गावात सहा अंगणवाड्या आहेत. यातील मध्यभागी असणाऱ्या पहिल्या क्रमांकांच्या अंगणवाडीला अलीकडेच भेट दिली. यावेळी अंगणवाडीचे बदललेले सकारात्मक चित्र समोर आले.

सर्वांचे मिळते सहकार्य

पालक मेळावा आणि पोषण पंधरवाड्यामुळे बाळंतपणात काम करू नये, याची जाणिव सासरच्या मंडळींना झाली. यामुळे आता मला घरात आजीबात काम करू दिले जात नाही. आहाराची काळजी घेतली जाते. दररोज फळे खायला देतात. पती स्वत: अंगणवाडीत सोबत येतात. टीएचआरचे पाकीटे आणतात. यामुळे आता बाळंतपणाची भिती दूर झाली आहे.-वर्षा किशोर म्हस्के, गरोदर माता,  ७ वा महिना

आधी अंगणवाडीबाबत प्रबोधन

हर्सूल-सावंगी गावातील अंगणवाडीकडे ग्रामस्थ फार गांभीर्याने बघत नव्हते. येथे चिमुकले मुले यायचे. महिला खिचडीचा तांदूळ घेऊन जायच्या. अधून-मधून लसीकरणाची माहिती येथे समजायची. वयात येणाऱ्या मुलींना आयर्नच्या गोळ्या येथे मिळायच्या. पण अंगणवाडीचे काम यापलिकडचे आहे, हे अंगणवाडी कार्यकर्ता सुलोचना तुपे, कडूबाई अंभोरे, उज्वला घोडके, संगीता नाटकर, जयश्री बन्सवाल आणि स्वाती लेंभे यांनी गावाला पटवून दिले.

यासाठी त्यांनी ग्रामस्थांच्या गृहभेटी घेतल्या. अगदी गावासोबत मळे, तळे, क्रशर, चौका घाट, डोंगर दऱ्यात फिरून ग्रामस्थांची भेटी घेतल्या. गरोदर मातांना अंगणवाडीत नोंद करणे आवश्यक असल्याचे सांगीतले. बाळ गर्भात असतांनाचे २७० दिवस, पहिल्या वर्षाचे ३६५ आणि दुसऱ्या वर्षाचे ३६५ असे १००० दिवस बाळ आणि मातेच्या आहराची काळजी घेतली तर ते आयुष्यभर कुपोषणापासून मुक्त राहू शकते. यात अंगणवाडीची भूमिका महत्वाची असल्याचे पटवून दिले. यामुळे अंगणवाडीत ७-८ वर्षापासून महिलांची वर्दळ वाढली. गरोदर मुली बाळंतपणाबाबत गैरसमज, रूढी, परंपरा, समजूती याबाबत अंगणवाडी ताईंशी मोकळेपणाने बोलू लागल्या.

गैरसमज दूर झाले

आम्ही सुरूवातीला बाळाला बाटीने दूध पाजायचो. पण पोषण पंधरवाड्यात बाटलीमुळे होणारे नुकसान समजले. आता चमचा-वाटीने दूध पाजतो. आई आणि बाळाच्या पाेषणाची काळजी घेतो.-शमीम सैय्यद सत्तार, सासू

पालक मेळाव्याने लक्ष वेधले 

डिसेंबर २०१८ मध्ये गावात पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यात चित्रकला स्पर्धा, टाकाऊतून टिकाऊ वस्तू तयार करणे, बाहुली घर, जोड्या लावा, हलके फुलके खेळ, पोस्टर प्रदर्शन यातून गरोदर आणि स्तनदा मातेच्या आरोग्यासंबधीची माहिती देण्यात आली. गरोदर मातेची नोंदणी, आरोग्य तपासणी, ७ अन्नगट, व्हिटॉमीन सी, डी, लौह, आयोडीन, रूग्णालयातच बाळंतपण, वैयक्तिक स्वच्छता, जुलाब, वांत्यावरील उपाय, सहा महिने स्तनपान, बालकाशी संवाद साधणे, त्याच्याशी खेळणे, बाळाच्या वडिलांचाही सहभाग, मातेला आराम करू देणे याबाबींची उदाहरणासह माहिती देण्यात आली. जिल्हा परिषद शाळेत भरलेल्या या कार्यक्रमात शिक्षण खाते, आरोग्य खाते, ग्रामपंचायत, युनिसेफ आदीचा सहभाग होता.

आराम करायला सांगतात

पालक मेळाव्यात मातेसाठी आराम आणि पोषण आहाराचे महत्त्व सांगीतले होते. सासरची मंडळी याची पुरेपूर काळजी घेतात. जड उचलू देत नाही.-रूखसार सैय्यद सलमान,  सून

महिलांनी पती, सासूसोबत कार्यक्रमाला उपस्थिती लावली. तज्ञांशी शंकाचे समाधान करून घेतले. त्यांना आहार आणि कृती पुस्तिका देण्यात आली. शास्त्रीय पद्धतीने हात धुण्याचे प्रात्यक्षित दाखवण्यात आले. मुलांनी दाळींचा वापर करत चित्र काढले.  या कार्यक्रमाने बाळंतपणाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलल्याचे बीएस्सी झालेली गरोदर माता अंजली सागर म्हस्के हिने सांगीतले. आता आधीसारखी भिती वाटत नाही. काही वाटलेच तर थेट अंगणवाडीताईंना फोन करून विचारून घेते, असे अंजली म्हणाली. वर्षा किशोर म्हस्के हिनेही अशीच प्रतिक्रिया दिली.

प्रत्येक घरापर्यंत पोहचण्यात यशस्वी

सुढृढ समाजासाठी मातेचे सक्षमीकरण आवश्यक आहे. यासाठी गावात सातत्याने वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असतो. पाेषण आहारासंबधी जनजागृती करण्यासाठी आम्ही गावातल्या प्रत्येक घरापर्यंत पोहचलो. याचे सकारात्म परिणाम समोर येत आहेत.-मनीषा कदम, पर्यवेक्षिका, एकात्मिक बालविकास प्रकल्प

पोषण पंधरवाड्यातून केले प्रबोधन

डिसेंबरमध्ये झालेल्या पालक मेळाव्याचे गारूड अजूनही ग्रामस्थांच्या मनावर होते. त्यातच पोषण पंधरवाडा झाला. यासाठी अंगणवाडी कर्मचारी अधिक जोमाने कामाला लागले. महिनाभरापासून याच्या तयारीला वेग आला होता. पंधरवाड्यानिमीत्त दररोज एक एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ते पुढीलप्रमाणे-

  • सायकल रॅली-बेटी बचाओ, बेटी पढाओ, सही पोषण, देश रोेशन अशा घोषणा देत सुमारे ४५ मुले-मुली रॅलीत सहभागी झाले.
  • किशाेरवयीन मुलींची बैठक-सातवी ते नववीच्या ३५ मुलींची बैठक घेण्यात आली. त्यांना या वयात होणारे हॉर्मोन्सचे बदल, रक्ताक्षय, आरोग्याच्या चांगल्या सवयी, पोषण आहार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.  त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली.
  • शेतकऱ्यांची बैठक-पोषण आहाराची सुरूवात शेतातून होते. यासाठी शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यांना रासायनिक खतांचा वापर टाळणे, सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला, धान्य पिकवणे, परसबाग फुलवणे याचे महत्व पटवून दिले. यात २५ शेतकरी सहभागी झाली होती.
  • किशारेवयीन मुलांची बैठक-१५ ते १८ वयोगटातील २५ मुलांची बैठक घेऊन त्यांना पोषण, आहार, वयातील हॉर्माेन्सचे बदल, स्वच्छता, मुलींचा सन्मान आदी बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
  • माता बैठक-गावातील ८ गरोदर आणि स्तनदा मातांची बैठक घेण्यात आली. गरोदर मातांची ५ प्रकारच्या फळांनी आेटी भरण्यात आली.
  • सुपोषण दिवस-कमी वजनाच्या बालकांची माहिती घेतली. तर सुढृढ बालकांचा सत्कार करण्यात  आला. कमी वजनाची बालके जन्माला येऊ नये यासाठी उपाय सांगण्यात आले.
  • अर्धवार्षिक वाढदिवस- बाळाला सातवा महिना लागल्यावर बाहेरचा आहार सुरू करावा. यासाठी आईला अंगणवाडीत बोलावून घेण्यात आले. अंगणवाडीत सांगीतल्याप्रमाणे माता वागते का? तिला सासू, पतीचे सहकार्य मिळते का? हे जाणून घेण्यात आले.
  • पोषण आहाराची पद्धत-बाळाला सेरेलेक, फॅरेक्स देऊ नका, टिव्ही बघत बाळाला खाऊ घालू नका, आधी आपल्या तोंडाजवळ घास न्या, मग बाळाला खाऊ घाला याचे महत्त्व सांगीतले.
  • बाटली नव्हे नाग-दुधाची बाटली म्हणजे नाग आहे. बाटलीतून दूध आपोआप टपकते. बाळाला बाटलीने दूध पिण्याची सवय लागली तर ते मातेच्या स्तनातूनही आपोआप दूध येण्याची वाट बघते. दूध नाही आले तर बाळ उपाशी  राहते. मग आईचे दूधही आटते, हे समजावून सांगीतले.

 

सुढृढ पिढी, सुढृढ समाजासाठी आवश्यक

२०१२ च्या सर्वेक्षणानुसार केवळ ८ टक्के कुटूंबे दररोजच्या आहारात ७ अन्नगटांपैकी किमान ४ घेतात. यातून पोषण आहाराचे महत्त्व लक्षात येते. यामुळेच पोषण पंधरवाड्यात पोषक आहाराबाबत प्रबोधन करण्यात आले. गरोदर आणि स्तनदा मातांमध्ये खाण्यापिण्यासंबधीच्या धारणा, रूढी, परंपरा याबाबत जागृती करण्यात आली. यातूनच सुढृढ पिढी आणि सुढृढ समाजाची निर्मिती होऊ शकेल.-श्री.पांडुरंग सुदामे, राज्य सल्लागार (स्तनपान व शिशू पोषण), युनिसेफ

 

 

टीएचआरपासून स्वादिष्ट पदार्थांचे प्रात्यक्षिक

पोषण पंधरवाड्याचे खास आकर्षण ठरले ते टीएचआरपासून तयार केलेले पदार्थ. अंगणवाडीत स्तनदा माता आणि गरोदर मातांसाठी उपमा, शिरा आणि सुखडी तर बाळासाठी शिरा, शेवई, बाल आहार आणि उपमा असे एकूण ७ प्रकारचे पोषण आहाराचे पाकीटे मिळतात. आईची नोंदणी झाल्यापासून बाळ —- वयाचे होईपर्यंत ही पाकिटे दिली जातात. पण या आहाराबाबत ग्रामस्थ साशंक आहेत. अनेकांना याची चव आवडत नाही. यामुळे यापासून वेगवेगळे पदार्थ तयार करण्याचे प्रात्यक्षिके दाखवण्यात आले. उपमा, पालक पुरी, थालीपीठ, गोड पुरी, शंकरपाळे, मॅगी, गोड शिरा, बट्टी, चकली तयार करण्यात आला. सर्वांनाच हे पदार्थ पाहून तोंडाला पाणी सुटले. हर्सूल सांवगीचा पोषण पंधरवाडा ग्रामस्थांना पोषण आहाराचे महत्त्व सांगून गेला. त्यांना अंगणवाडीच्या अधिक जवळ घेऊन गेला.

पालक मेळाव्यातून माहिती मिळाली

पहिलेच बाळंतपण असल्याने खूप उत्सुकता आणि प्रचंड भिती वाटत होती. अंगणवाडीच्या पालक मेळाव्यात सहभाग नोंदवला होता. पोषण पंधरवाड्यातही आहराबाबत, सुरक्षित बाळंतपणाबाबत माहिती मिळाली. त्याचा फायदा झाला. गरज पडलीच तर अंगणवाडी ताईंना  भेटून शंकांचे समाधान करता येते. -अंजली सागर म्हस्के, गरोदर माता,  ८ वा महिना

Related Articles

Close