Special Story

कुलूपबंद सलीम अली सरोवरात बहरली जैवविविधता

वनसंपदा जपल्याने साकारले सलीम अलींचे स्वप्न

मोठा खर्च करूनही न्यायालयीन खटल्यामुळे कुलूपबंद असलेल्या हडकोतील सलीम अली सरोवरात जैवविविधता बहराला आली आहे. जोरदार कोसळलेला पाऊस आणि नो मॅन झोनमुळे येथे १३२ प्रजातींचे पक्षी, ६४ पतंगे, ३२ फुलपाखरे आणि ७ प्रजातींचे साप मुक्तपणे बागडतायत. महानगरपालिकेने न्यायालयाच्या निर्देषांची अंमलबजावणी केली तर सरोवर खऱ्या अर्थाने ऑक्सीजन हब ठरेल, असा विश्वास तज्ञांना वाटतोय.

शहराच्या मध्यवस्तीत मोठी जैवविविधता असणारे सलीम अली सरोवर हे राज्यातील पानथळीचे सर्वात मोठे एकमेव सरोवर आहे. मनपाच्या ताब्यातील तलावाला ऐतिहासीकसोबतच पर्यावरणाच्यादृष्टीनेही महत्त्व आहे. मात्र, पालिकेनेच हे महत्त्व कमी करण्याचे २ प्रयत्न केले. नव्वदीत येथे बाग तयार करून नौकाविहार सुरू केला. तर २०१३ मध्ये जापानी गार्डन उभारण्याचा प्रयत्न झाला. यासाठी ३०७ झाडे कापण्याची तयारी झाली. मात्र, पर्यावरणप्रेमी डॉ.किशोर पाठक, पंकज शक्करवार, मिलींद गिरधारी, अरविंद पुजारी, राजेंद्र धोंगडे, अॅड.महेश भारस्वाडकर यांनी न्यायालयात याचिका दाखल करून येथील जैवविवधता जपण्याची मागणी केली. ती मान्य करत ९ वर्षापासून सरोवराच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आले. हा परिसर नो मॅन झोन झाला. माणसाचा हस्तक्षेप संपल्याने येथील जैवविविधता चांगलीच बहराला आली आहे.

देशी-परदेशी पक्षांचा आश्रय
सलीम अली सरोवरात ८३ देशी तर ३२ स्थलांरतीत पक्षी येतात. येथील झाडांवर ३३ पक्षी निवासाला येतात. येथे विविध प्रजातींची ३२ फुलपाखरे, ६४ पतंगे, ७ साप, १२ प्रजातींची वृक्षे, ८ वेली आणि शेकडो प्रजातींची किटके आढळतात. शहरातील नागरीकांसाठी १०२ उद्याने आहेत. एक उद्यान जैवविविधतेसाठी राखीव असावे, या एकमेव विचारावर सलीम अली सरोवरात ही वनसंपदा बहराला आली आहे. आजघडीला सरोवरात जांभळी पानकोंबडी, पानडूबी, वारकरी बदक, धनवर बदक, राखी सारंग, मोर बगळा, चातक, पावशा, थापट्या बदक, कमळपक्षी, नलीपक्षी, नीलकमल, वटवाघूळ, असे पक्षी आहेत. जापानी गार्डन झाले तर ही जैवविविधता संपुष्टात येईल, असे डाॅ.किशोर पाठक सांगतात.

कम्युनिटी गार्डनचा प्रस्तावही धूळखात
गेल्यावर्षी निवृत्त वन्यजीव संरक्षक एस.के.पटनायक आणि केंद्रिय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाचे निवृत्त सदस्य डॉ.बी.आर.शर्मा शहरात आले असता त्यांनी सरोवराला भेट दिली होती. यावेळी त्यांनी येथे कम्युनिटी गार्डन उभारण्याचा प्रस्ताव मांडला होता. याप्रकाराच्या उद्यानांचे कामकाज, देखरेख, नविन प्रकल्प, पर्यावरण संवर्धन याबाबतचे निर्णय स्थानिक नागरीकांच्या समितीमार्फत होते. वर्ष उलटले तरी याबाबत एक पाऊलही पुढे गेलेले नाही.

न्यायालयाच्या सूचनांकडे कानाडोळा
पर्यावरणप्रेमींच्या याचिकेवर सुनावनी करतांना २०१४ मध्ये न्यायालयाने सराेवराच्या मागील बाजूला कंुपन टाकणे, मासेमारी बंद करणे, ड्रेनेजचे पाणी सोडणे थांबवणे, अतीक्रमण काढून टाकणे अशा सूचना केल्या होत्या. जैवविविधता समिती आणि एक तटस्थ समिती स्थापन करण्याची सूचना करण्यात आली होती. प्रत्यक्षात त्यांचे पालन करण्यात आलेले नाही. पालिकेकने या सूचनांची अंमलबजावणी केली तर सरोवराचे रूप पालटेल.-डॉ.किशोर पाठक, याचिकाकर्ते, सलीम अली सरोवर बचाओ समिती

Related Articles

Close