Visit Our Website
Features

औरंगाबादच्या स्नेहा बक्षी यांची युनेस्कोच्या कार्यशाळेसाठी निवड

जगभरातून ८०, भारतातून ४ तर राज्यातून एकमेव आर्किटेक्ट औरंगाबादेतील, माती, बांबू स्थापत्याचा अभ्यास करणार, १५ दिवसांच्या कार्यशाळेसाठी युनेस्कोची शिष्युवृत्ती

औरंगाबादच्या तरूण आर्किटेक्ट स्नेहा बक्षी यांना युनेस्कोच्यावतीने जगभरातील आर्किटेक्टसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत सहभागी होण्याचा मान मिळाला आहे. अत्यंत कडक चाचण्या आणि अनुभवाच्या जोरावर स्नेहा यांना ही संधी मिळाली आहे. कार्यशाळेत जगभरातील ८० तर भारतातून ४ आर्किटेक्ट सहभागी होतील. यात महाराष्ट्रातून औरंगाबादच्या स्नेहा यांचा एकट्याचा समावेश आहे. १५ दिवसांच्या कार्यशाळेत स्नेहा भारतातील प्राचीन माती आणि बांबू स्थापत्यकला जगभरात पोहचवण्याचा प्रयत्न करतील.

औरंगाबादच्या स्रेहा सुंदर बक्षी यांचे शालेय शिक्षण शारदा मंदीर तर महाविद्यालयीन शिक्षण सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयातून झाले. मुंबईतील रचना संसद अ‍ॅकडमी फॉर आर्किटेक्चरमधून त्यांनी बीई आर्किटेक्चर केले. ५ वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर स्नेहा यांना आर्किटेक्चर फर्म, इंटिरीअर डेकोरेटर, बिल्डरकडे काम करता आले असते. स्वत:ची फर्म सुरू करता आली असते. पण मूळ वेरूळच्या असणाऱ्या स्रेहा यांना लहानपणापासून इथल्या लेण्या, कैलास मंदीर खुणावत होते. या वास्तू कोणी, कधी आणि कशा बांधल्या असतील याबाबत लहानपणापासून कुतूहूल होते. बीआर्कमधील हिस्ट्री आॅफ ओरिएंटेशन हा ऐतिहासीक वास्तूंच्या संवर्धनाची ओळख सांगणारा एक विषयही त्यांना वेड लावून गेला होता. इतिहास आणि पुरातत्वाच्या अावडीपायी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून लिबरल आर्ट्सची पद्वयूत्तर पदवीही घेतली.

या आवडीतूनच त्यांनी पुरातत्व संवर्धनाच्या क्षेत्रात काम करण्याचे निश्चीत केले. मुंबई आणि गोव्यात एका आर्किटेक्चर कंपनीत वर्षभर नोकरीही केली. पण मन नाही रमले. या नोकरीचा एक फायदा झाला. येथे ऐतिहासीक वास्तूंच्या संवर्धनाठी काम करणाऱ्या एका ग्रुपशी ओळख झाली. त्यातूनच पुरातत्वाशी संबधीत वेगवेगळ्या कामात सहभागी होता आले. स्रेहा गेल्या १० वर्षापासून वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर पुरातत्व संवर्धक (कन्झर्वेशन आर्किटेक्ट) म्हणून काम करत आहेत. या अनुभवाच्या जोरावरच काही वर्षांपूर्वी यूनेस्कोच्या एका प्रोजेक्टसाठी स्नेहा यांना फ्रान्समध्ये जाण्याची संधी आली होती. पण व्हीसा न मिळाल्याने संधी हुकली. दहा वर्षांनंतर आॅस्ट्रियातील कार्यशाळेसाठी निवड झाल्याने त्यांचे स्वप्न साकारले आहे.

यूनेस्कोच्या कार्यशाळेसाठी निवड
यूनेस्कोच्यावतीने बेस हॅबीटाटतर्फे १६ ते ३० जुलै २०१८ दरम्यान ऑस्ट्रिया येथील युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट अॅण्ड डिझाईन, लिंझ येथे “आर्किटेक्चर फाॅर डेव्हलपमेंट’ या विषयावर एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यात स्नेहा यांना सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. कार्यशाळेत त्या “अर्थन अॅण्ड बॉम्बू कन्स्ट्रक्शन फ्राॅम इंडिया’ या विषयावर मत मांडतील. पुरातत्वशास्त्रातील जगभरातील तज्ञ या प्राचीन स्थापत्यकलेचे आधुनिक संदर्भ शोधतील.

महाराष्ट्रातून स्नेहा एकट्या
१५ दिवसांच्या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कडक चाचण्या घेण्यात आल्या. स्थापत्य क्षेत्रातील कामाचा अनुभव, शिक्षण आणि प्रेझेंटेशनच्या गुणांकनातून स्नेहा यांची निवड झाली. जगभरातून ८० तर भारतातून ४ जण यात सहभागी झाले आहेत. यात महाराष्ट्रातून स्नेहा एकमेव आहेत. विशेष म्हणजे यासाठी त्यांना यूनेस्कोशी संलग्नित युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट अॅण्ड डिझाईन, लिंझच्या स्टुडिओ बेस हॅबीटाटतर्फे शिष्युवृत्ती मिळाली आहे. शुक्रवारी त्या मंंुबईहून ऑस्ट्रियासाठी रवाना झाल्या.

निवडीसाठी हे मुद्दे ठरले महत्वाचे
-२००९ मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागातर्फे वेरूळच्या लेणीच्या संवर्धनात स्नेहा सहभागी झाल्या. मे-जूनमध्ये कडक उन्हात त्यांनी दिड महिना हे काम केले.

-अजिंठा लेणीच्या १५ दिवसांच्या संवर्धनाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.

-मणिपाल यूनिव्हर्सीटी आॅफ टेक्नॉलॉजीतर्फे रायचूरजवळ एका गावात चंद्रालांबा मंदीरात उत्खननादरम्यान एक पुरातन बौद्ध स्तूप सापडले होते. त्यावरील ९० पॅनल्सवर जातक कथा साकारलेल्या होत्या. स्नेहाने अस्ताव्यस्त पडलेले हे पॅनल एकत्र करून त्यावरील जातक कथांचे एकत्रिककरण केले. या स्तुपाची प्रतिकृती साकारली. दिड वर्षे काम सुरू होते.

-जून २०१४ मध्ये उत्तराखंडमध्ये महाप्रलय आला होता. यानंतर इथली भौगोलिक रचना बदलली. अनेक पुरातन वास्तूंचे नुकसान झाले. या जलप्रलयानंतर उदभवलेल्या परिस्थितीची माहिती घेण्यासाठी युनेस्कोने पोस्ट डिझास्टर प्रोग्रॅम हाती घेतला होता. त्यासाठी स्रेहा यांची निवड झाली. रूद्रप्रयाग ते गुप्तकाशी असा त्यांचा प्रवास होता. अत्यंत विषम परिस्थितीत त्यांनी महिनाभर काम केले. कडाक्याची थंडी, मुसळधार पावसातही स्नेहा यांनी २०-२५ वास्तूंचा अभ्यास केला. भारत-चीन सीमेवरील माला या शेवटच्या गावापर्यंत जाता आले. हा अनुभव अविस्मरणीय होता असे स्रेहा सांगतात.

-२०१५ मध्ये वेरूळमध्ये कैलास लेणीवर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजन केले.

-स्नेहा शहराच्या पर्यावरण संवर्धनासाठीही काम करत आहेत. त्या शाडू मातीच्या गणपती मूर्ती आणि पर्यावरणपूरक मखर तयार करत आहेत. शहराच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रातही स्नेहा सक्रिय आहेत.

-२०१७ मध्ये कागझीपुरा येथे ७०० वर्षांचा इतिहास असणाऱ्या कागद फॅक्टरीला पुर्नजीवित करण्यासाठी उपक्रम राबवला.

-सद्या पुरातन वास्तूंच्या संवर्धनासाठी कार्य करत आहेत.

हा औरंगाबादचा सन्मान
गेल्या १० वर्षांपासून पुरातत्व संवर्धनाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. हे क्षेत्र चॅलेजिंग तर आहेच शिवाय यात खुप इनोव्हेशन्स आहेत. येथे कल्पकतेला खुप वाव आहे. आतापर्यंतच्या अनुभवातूनच युनेस्कोच्या कार्यशाळेत सहभागी होण्याची संधी मिळाली. खरंतर हा औरंगाबाद आणि मराठवाड्याचा सन्मान आहे. कार्यशाळेतून आपल्या देशातील प्राचीन माती आणि बांबू स्थापत्याची माहिती जगभरात पाेहचवता येईल. -स्रेहा बक्षी, पुरातन वास्तू संवर्धक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close