Visit Our Website
Features

हेल्प रायडर्समुळे झाला रूग्णवाहिकेचा रस्ता सोपा, गर्दीत अडकल्याचे दिसताच रायडर्स करून देतात रस्ता मोकळा

तरूणांचे समाजकार्य, २० दिवसात ५०० हून अधिक सदस्य, पोलिसांचाही पाठींबा

शहर वाढते तशी रस्त्यावर वाहनांची गर्दीही वाढते. अनेकदा या गर्दीत रूग्णांना घेऊन जाणारी रूग्णवाहिका अडकते. यामुळे प्रसंगी रूग्णाचा मृत्युही होतो. मात्र, आता असे प्रकार निदान औरंगाबाद आणि पुण्यात तरी होणार नाहीत. आपण समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून शहरातील काही तरूणांनी “अम्ब्युलेन्स हेल्प रायडर्स ‘ ही आगळी वेगळी चळवळ सुरू केली आहे. रूग्णवाहिका अडकलेली तर याचे सदस्य लगेच त्यास रस्ता मोकळा करून देतात. रूग्णालयात पोहचेपर्यंत रूग्णवाहिकेसोबत राहतात. यासाठी त्यांच्या वाहनांना हेल्प रायडर्सचे स्टिकर लावून वेगळी ओळख देण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांनीही मोहिमेला पाठींबा दिलाय. प्रत्येक शहरात हा उपक्रम पोहचणे गरजेचे आहे.

काही दिवसांपूर्वी कोल्हापूरात एका गंभीर जखमी बालकाला घेऊन जाणारी रूग्णवाहिका गर्दीत अडकल्याने बालकाला प्राण गमवावा लागला होता. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त झाली. मात्र, अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी प्रशांत कनोजीया यांनी यावर उपाय शोधला. त्यांनी समविचारी तरूणांचा अॅम्ब्युलेन्स हेल्प रायडर हा वॉट्सअॅप समूह तयार केला. बघता बघता याचे पुण्यात हजाराच्यावर सदस्य झाले. त्यांच्या कामाचे कौतूक होऊ लागले. औरंगाबादेतील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा सचिव आणि सामाजिक कार्यात अग्रेसर संदीप कुलकर्णी यांनी असाच समूह शहरासाठी तयार केला. वॉट्सअॅप ग्रूपवर एक एक करत सदस्य जुळत गेले. १० दिवसातच दुसरा ग्रूप तयार करावा लागला. आजघडीला समूहाचे ५०० च्या वर सदस्य झाले आहेत. वाहतूक पोलिस आणि रूग्णवाहिका चालवणाऱ्यांनाही यात सहभागी करण्यात आले आहे. सदस्यांनी रूग्णांचे जीव वाचवण्याच्या कामाला सुरूवात केली आहे.

असे काम करतो हेल्प रायडर
हेल्प रायडर समूहाच्या सदस्यांना त्यांच्या वाहनांवर लावण्यासाठी खास स्टिकर देण्यात आले आहेत. या सदस्यांना रस्त्यात कोठेही रूग्णवाहिका गर्दीत अडकलेली दिसली तर ते लगेच त्यास वाट मोकळी करून देतात. यासाठी वाहतूक पोलिसांची मदत घेतात. रूग्णवाहिका गर्दीतून बाहेर पडल्यावर हेल्प रायडर पायलट व्हेईकल बनून ती दवाखान्यात पोहचेपर्यंत सोबत जातो. हा रायडर रूग्णवाहिकेसाठी पुढील रस्ता मोकळा करत जातो. अपघात झाल्यावर पहिला एक तास गोल्डन अवर म्हणून ओळखला जातो. या काळात रूग्णवाहिका पोहचली तर रूग्णाचा जीव वाचतो. मात्र, ती गर्दीत अडकली तर रूग्णवाहिका पोहचूनही फायदा होत नाही. अशा परिस्थितीत हेल्प रायडर्सची मदत महत्वाची ठरते.

पोलिसांचाही मिळाला पाठींबा
हेल्प रायडर्स औरंगाबाद समूहाचे औपचारीक उद्घाटन, पहिली बैठक आणि सदस्यांचा परिचय सोहळा नुकताच हॉटेल गिरिराज येथे झाला. यावेळी वाहतूक शाखेचे अधिकारी दीपक बिरारी, एम.एस. बकाल, भाजपचे शहर उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड उपस्थित होते. त्यांच्या हस्ते हेल्प रायडर्सच्या स्टिकरचे अनावरण करण्यात आले. सदस्यांना त्याचे वितरण करण्यात आले. नंतर सदस्यांनी वाहतूक शाखेचे एसीपी सी.डी.शेवगण यांची भेट घेऊन उपक्रमाची माहिती दिली. मोहिमेला वाहतूक शाखेने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

थोडी सूट देण्याची अपेक्षा
हेल्प रायडर्स कोणतेही मानधन न घेता, स्वत:चे पेट्रोल, वेळ खर्च करून सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून हे काम करत आहेत. मात्र, कधी कधी कायदा आड येतो. गरजेप्रसंगी रूग्णवाहिकेप्रमाणे हेल्प रायडरलाही वाहतूक सिग्लन तोडण्याची गरज भासते. त्यास पोलिसांनी विशेष अधिकारात परवानगी द्यावी, अशी समूहाची मागणी आहे. भविष्यात अपघातातील जखमींना मदत करण्यासाठी हेल्प रायडर्संना प्रथमोचाराचे प्रशिक्षण देण्याचा विचार सुरू आहे.

जीव वाचवण्यास सुरूवात
हेल्प रायडर्सच्या सदस्यांनी कामाला सुरूवात केली आहे. आज रविवारी वेरूळ, दौलताबादला पर्यटकांची गर्दी होती. यावेळी दौलताबादच्या घाटात चाळीसगावहून येणारी रूग्णवाहिका अडकली. विनोद व त्याच्या मित्राने त्यास मार्ग मोकळा करून दिला. औरंगाबाद पर्यंत रूग्णवाहिकेसोबत आले. निखील ताकवाले यास पैठण रोडहून येत असतांना दोन ट्रक आणि एका कंपनीच्या बसमध्ये एक रूग्णवाहिका अडकलेली दिसली. त्याने तात्काळ रूग्णवाहिकेला रस्ता करून दिला. गेल्या आठवड्यात संदीप कुलकर्णी यांनी संग्रामनगर उड्डानपुलाखालून जाणाऱ्या एका रूग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून दिला. तुषार नरवडे पाटील यांनी मिलकॉर्नरला गर्दीत अडकलेल्या रूग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली. विजय याने परभणीत एका रूग्णवाहिकेचा मार्ग सुकर केला. तर अनिकेत पुंड पानचक्कीच्या गेट जवळ होणाऱ्या वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

जीव महत्वाचा
औरंगाबादच्या वाहतूकीत अनेकदा रूग्णवाहिका अडकते. काही लोक त्यास रस्त्या मोकळा करून देण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र, यामुळे वादही होतात. आता हेल्प रायडर्स अधिकृतपणे अशा प्रसंगात मदत करणार आहे. त्यासाठी पोलिसांनी सहकार्याची तयारी दर्शवली आहे. कोणत्याही परिस्थितीत रूग्णाचा जीव महत्वाचा आहे. त्यासाठी आम्ही कामाला लागलो आहोत.-संदीप कुलकर्णी, संयोजक, हेल्प रायडर, औरंगाबाद

हे आहेत हेल्प रायडर्स
संदीप कुलकर्णी, आदित्य दहिवाल, बाळासाहेब गायकवाड, अनिकेत पुंड, रणजित साळुंके, अमोल कुलकर्णी, प्रा. प्रशांत अवसरमल, गिरीश कागदे, सतीश बनसोडे, अतुल जोशी, शिवा लिंगायत, डॉ. श्रीकांत धांडे, नितीन गुजराथी, संकेत पुंड, रुपेश देशपांडे, निखिल ताकवाले, मंजु खंडेलवाल, वर्षा सराफ, कविता दास, ज्योती भिलेगावकर, आशा जोशी, नीलिमा सावरगावकर, मंजुश्री जोशी, गौरव खिल्लारे, संदीप निकम, महेश मल्लेकर, प्रकाश काळे, कौस्तुभ भाले आदी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close