Features

हर्सुल येथील हरसिद्धी देवीचे मंदिर ६०० वर्ष जूने

"हरसिध्दी' मंदिरावरूनच गावाचे नाव पडले "हर्सुल'

हर्सुल गावातील हरसिध्दी देवीचे ६०० वर्ष जुने मंदिर गाव व शहर परिसरात प्रसिध्द आहे. नवरात्रोत्सवानिमित्त हरसिध्दी मातेला पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा सुरू असतात. आज विजयादशमीला देखील भक्तांचा येवा सुरू असतो. संध्याकाळी सिमोलंघनाच्या निमित्ताने घटातील उगवलेले धान व आपट्याची पाने (सोने) घेऊन जवळच्या परिसरातील भक्त मंडळी आवर्जून येतात.
नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी मोठ्या महोत्सवाचे दरवर्षी आयोजन केले जाते . हर्सुल हे गावाचे नाव हरसिद्धी देवी वरुनच पडले असल्याचे गावकरी सांगतात. पंचक्रोशी आणि जिल्ह्यातील विविध गावातील भाविक दरवर्षी नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने दर्शनासाठी या ठिकाणी येतात. यावर्षी मंदिर ट्रस्टने आकर्षक आरास आणि धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
पाच एकरच्या परिसरात हे मंदिर आहे. ६०० वर्षापूर्वी विक्रमादित्य राजाने या मंदिराची स्थापना केली असल्याचे गावकरी सांगतात. देशातील शक्तीपीठापैकी हे एक मंदिर असल्याचेही सांगितले जाते. हरसिद्धी मातेचे प्रमुख मंदिर उज्जैन येथे आहे. ते मंदिर देखील विक्रमादित्यानेच बांधले आहे असा इतिहास आहे. हर्सुल येथील हरसिद्धी मातेच्या मंदीरात तीन पाण्याचे कुंड आहे. मुळ गाभारा हा दगडी आहे. याच परिसरात विठ्ठल, गणपती आणि महादेवाचे देखील मंदिर आहे. दर वर्षी या ठिकाणी मोठी यात्रा आणि कुस्त्यांच्या दंगली भरवण्याची पंरपरा आहे. ट्रस्टी जनार्धन औताडे, रावसाहेब औताडे, संजय हरणे, नारायण सुरे, महादेव बकले, भारत हरणे, नारायण भालेकर, उत्तम चव्हाण, साईनाथ औताडे यांच्या सह गावातील भाविक आणि प्रशासन या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतात.

देवी समोर नंदी

साधारणत: महादेवा समोर नंदी असल्याची प्रथा आहे. मात्र हरसिद्धी मातेच्या समोर नंदीची भलीमोठी प्रतिकृती पहाण्यास मिळते. यामागे देखील पुराणात कथा आहे. स्कंद पुराणात सांगितले आहे. कैलास पर्वतावर ज्यावेळी चंड प्रचंड नावाच्या दैत्याने बळजबरी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी नंदीने त्यांना रोखून धरले. मात्र युद्धात नंदी जमखी झाले. त्यावेळी भगवान शिवाने भगवती चंडीचे स्मरण केले. शिवाच्या आदेशाने देवीने चंड प्रचंड आसुराचा वध केला. त्यानंतर भगावन शिव प्रसन्न झाले तेव्हा पासून देवी शक्तीला हरसिद्धी असे म्हणू लागले अशी कथा आहे. या युद्धात नंदीने मोठी साथ दिली म्हणून हरसिद्धी मातेच्या समोर नंदी पहायला मिळतो.

Related Articles

Close