Features

पुस्तके साचली आहेत? रद्दीत टाकण्याऐवजी गरजूंना भेट द्या!

लॉस्ट अॅण्ड बाऊंडद्वारे पुस्तके भेट देण्याचा उपक्रम, आर्या आणि वेदांत कुलकर्णी यांचा पुढाकार

शाळा-कॉलेजचे वर्ष संपल्यावर पुस्तकांचे काय करायचे? रद्दीत विकले तर थोडे पैसे मिळतील, पण गरजूंपर्यंत पोहचविले तर पालकांवरील बोझा कमी होईल. कदाचित ही पुस्तके वाचून भविष्यातील अधिकारी, शास्त्रज्ञ तयार होतील. हीच संकल्पना घेवून दिल्लीतील इम्पॅक्ट एड इंडिया ही स्वंयसेवी संस्था “लॉस्ट अॅण्ड बाऊंड’ मोहिमेद्वारे जुनी पुस्तके गरजूंपर्यंत पोहचवत आहेत. राज्यात केवळ औरंगाबादमध्ये हा उपक्रम सुरू असून आर्या आणि वेदांत कुलकर्णी शहरभरातून पुस्तके गोळा करून गरजूंना शिक्षणासाठी मदत करत आहेत.

वर्ग बदलला की घराघरांमध्ये दरवर्षी विद्यार्थ्यांची पुस्तके, दप्तरे जमा होतात. पसारा कमी करण्यासाठी मग ते रद्दीत टाकण्याखेरीज पर्याय नसतो. मात्र, समाजातील एक वर्ग असाही आहे, ज्यांच्याकडे नवीन पुस्तके, दप्तरे घेण्यासाठी पैसे नाहीत. या दोन्ही वर्गांमध्ये सांगड घालून एका जबाबदार समाजाची निर्मिती करण्यासाठी “लॉस्ट अॅण्ड बाऊंड’ उपयोगी ठरत असल्याची माहिती उपक्रमाची सिटी लीड आर्या कुलकर्णी हिने दिली.

राज्यात एकमेव औरंगाबादमध्ये
दिल्ली एनसीआरमध्ये रिद्दीमा आणि अमन सिंग यांनी सुरू केलेला उपक्रम चंडीगढ, लखनऊ, ग्वालियर आणि हैदराबादमध्ये पोहचला. औरंगाबादमध्ये देवगिरी महाविद्यालयातून यंदा बारावी उत्तीर्ण झालेले आर्या आणि वेदांत कुलकर्णी यांना याविषयी माहिती मिळाली. आर्यानेे दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेज फॉर वुमेनमध्ये बीए इकॉनॉमीक्ससाठी तर वेदांतने नागपूरात एनआयआयटीमध्ये प्रवेश घेतला आहे. ऑनलाईन शिक्षण घेतांना त्यांनी उपक्रमासाठी पुढाकार घेतला. राज्यात “लॉस्ट अॅण्ड बाऊंड’ राबवणारे औरंगाबाद एकमेव शहर ठरले आहे.

पुस्तके द्या, गरजूंना मदत करा
पुस्तके रद्दीत न विकता गरजूंपर्यंत पोहचवली तर अनेक मुले शिकू शकतील. हा उपक्रम राबविण्यासाठी अजून स्वंयसेवकांची गरज आहे. यासाठी अधिकाधिक तरूणांनी सोबत यावे. मोठ्या प्रमाणात पुस्तके द्यावीत.- आर्या कुलकर्णी , सिटी लीड, लॉस्ट अॅण्ड बाऊंड

 

सोशल मिडीयावर आवाहन
आर्या आणि वेदांत यांनी नोव्हेंबरमध्ये फेसबुक, वॉट्सअॅप, इंन्स्टाग्रामच्या माध्यमातून तसेच मित्र, नातेवाईक, शेजारी यांना सुस्थितीतील पुस्तके आणि बॅग जमा करण्याचे आवाहन केले. बघता-बघता अभ्यासक्रमासह गोष्टी, कादंबऱ्या, स्पर्धा परीक्षांची पुस्तके जमली. ती सातारा परिसरातील भगवानबाबा बालिकाश्रमात भेट दिली. पुस्तके पाहून मुली भारावून गेल्या. भविष्यात मोठ्या प्रमाणात गरजूंपर्यंत पुस्तके पोहचविण्याचा मानस असल्याचे डोनेशन कॉर्डिनेटर वेदांत कुलकर्णी याने सांगीतले.

Related Articles

Close