Features

‘आकार’ मुळे वाढली चिमुकल्याचे आरोग्य, आहार आणि शिक्षणाबाबत जागरूकता

एकात्मिक बाल विकास सेवा योजना, युनिसेफचा प्रकल्प

वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत मेंदूची ८५ टक्के वाढ होते. तर वयाच्या अडीच वर्षापर्यंत बालकाचा मेंदू मोठ्यांच्या मेंदूपेक्षा अडीचपट अधिक सक्रिय असतो. बालकाला खऱ्या अर्थाने भविष्यासाठी तयार करण्याचे हेच योग्य वय. ही बाब ओळखून महाराष्ट्र शासनाची एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि युनिसेफच्यावतीने ० ते ६ वयोगटातील चिमुकल्यांसाठी राज्यभरात ‘आकार’ प्रकल्प राबवला जात आहे. या अंतर्गत बालकांच्या शारीरिक विकासाबरोबरच मानसिक आणि बौद्धिक विकासाच्या हेतूने शास्त्रीय संशोधनातून खास अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. यामुळे एकिकडे मुलांची अंगणवाडीतील उपस्थिती वाढली आहे. तर पालकही त्यांचे शिक्षण, आहार आणि एकूणच संगोपनाबाबत अधिक जागरूक झाले आहेत.

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातल्या बालेवाडी येथील अंगणवाडी क्रमांक १०६  चिमुकल्यांसोबतच पालकांच्या गर्दीने फुलून गेले होते. एका खोलीतल्या या अंगणवाडीत अंगणवाडी ताईसोबतच ग्राममंगल संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक राजेश मुळे आणि त्यांचे सहकारी मुलांशी संवाद साधत होते. वर्गाच्या भिंतीलागत मुलांसाठी तयार केलेल्या खेळण्या, चित्र, पुस्तके यांचा खच पडला होता. लाल रंगाच्या बाहुली घरात जाण्यासाठी चिमुकल्यांची धडपड सुरू होती. अंगणवाडी ताईने मुलांकडून प्रार्थना म्हणून घेतली. त्यांतर लाल रंगात बोटे बुडवून मुलांनी चित्र काढली. ती ताईंना दाखवून शाबासकी मिळवली. तेवढ्यात खोलीत पालकांची  गर्दी सुरू झाली. त्यातील बहुतांशी हातावर पोट असणारे लोक असल्याचे नंतर समजल. बघता बघता पाय ठेवायलाही जागा नाही उरली. मग अंगणवाडी ताई आणि ग्राममंगलच्या स्वंयसेवकांचा पालकांशी संवाद सुरू झाला. मुले घरी अभ्यास करतात का?, तुम्ही त्यांच्याकडून धडे वाचून घेता का?, ते काय खातात, याकडे लक्ष देता का?, त्यांना पोषक आहार देता का? असे एकामागून एक प्रश्न येत होते. पालकांनी प्रत्येक प्रश्नाला सकारात्मक उत्तर दिले. यानंतर शाळा सुटली आणि सर्वजण घरी गेले. इमारतीच्या दुसऱ्या खोलीत चित्रे, खेळ, चार्ट मांडलेले होते. २८ वर्षांपासून सेवेत असणाऱ्या मदतनीस राजश्री बालावडकर येथे आलेल्या मुलांना याची माहिती देत होत्या. एकिकडे अंगणवाड्या ओसाड पडल्याचे  चित्र असतांना बालेवाडीतील या अंगणवाडीतील हे दृष्य सुखावह वाटले. त्याचे  कारण आहे येथे राबवला जाणारा ‘आकार’ प्रकल्प.

भविष्याला आकार देण्याचा प्रयत्न

काय आहे नेमका ‘आकार’? सामाजिक संशोधक मॅकर्थी यांनी केलेल्या अभ्यासानुसार मेंदूचा ८५ टक्के विकास हा वयाच्या ५ वर्षांपर्यंत होतो. तर वयाच्या अडीच वर्षापर्यंत बालकाचा मेंदू मोठ्यांच्या मेंदूपेक्षा अडीचपट अधिक सक्रिय असतो. मेंदूचा विकास हा बालकाच्या भावनिक, शारीरिक आणि सामाजिक क्षमतांच्या विकासातून होतो. त्यामुळे या क्षमतांची योग्य वाढ नाही झाली तर बालकाची वाढ खुंटते. ही बाब लक्षात घेऊन ० ते ६ वयोगटातील बालकांसाठी अर्ली चाईल्डहूड केअर अण्ड एज्युकेशन (ईसीसीई) कार्यक्रम आखण्यात आला आहे. प्री-स्कूल म्हणजे शाळापूर्व शिक्षण स्तरावर तो राबवला जातो. या वयात मुलांच्या क्षमतांचा विकास झाला  तर एक जबाबदार, सुढृढ नागरीक म्हणून त्याचा विकास होईल, याची खात्री वाढते. हे शिक्षण देण्यासाठीच ‘आकार’ ची निर्मिती झाली आहे.

आकारमध्ये नेमके काय?

भारत हा जागतिक बालहक्क संरक्षण परिषदेचा सदस्य आहे. यामुळे ६ वर्षाखालील बालकांना ईसीसीई देण्यासाठी भारत कटीबद्ध आहे. भारतीय राज्यघटनेच्या २००२ च्या सुधारणेनुसार बालकांचे संरक्षण आणि शिक्षण हा कायदा आहे. त्यानुसार अंगणवाडीच्या माध्यमातून ईसीसीई दिले जाते. एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार ऑक्टोबर २०१८ मध्ये महाराष्ट्रात १०,८७७३ अंगणवाड्या आहेत. यात ३०२४ पर्यवक्षेक तर २५३ बालविकास प्रकल्प  अधिकारी आहेत. युनिसेफने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद तसेच आयसीडीएससोबत शाळापूर्व शिक्षण म्हणजेच ईसीईचा अभ्यासक्रम तयार केला आहे. यासाठी राज्याचे धोरण तयार करण्याचे कामही युनिसेफने पार पाडले आहे. २०१२-१३ मध्ये जालना, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात आकारचा पथदर्शी प्रकल्प राबवण्यात आला. त्यात यश मिळाल्याने राज्याने २०१५ मध्ये राज्य सरकारने त्यास अंगणवाडीसाठी अधिकृत अभ्यासक्रम म्हणून मान्यता दिली. २०१६ मध्ये महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले.

चिमुकल्यांच्या सर्वांगीन विकासासाठी ‘आकार’

‘आकार’ हा क्षमता विकासावर आधारीत अभ्यासक्रम आहे. यासाठी राज्यातल्या ३६ जिल्ह्यातून ४५० पर्यंवेक्षकांना मास्टर ट्रेनर म्हणून प्रशिक्षण देण्यात आले. पुढे  हे मास्टर ट्रेनर आपापल्या जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जिल्हा, तालुका तसेच बीट पातळीवर २ दिवसांचे प्रशिक्षण देतात. आकारच्या अभ्यासक्रमात बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी त्याच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासावर आधारित विविध सृजनशील कृतीचा समावेश आहे. बालकांच्या शालेय पूर्व अनौपचारिक शिक्षणाचा पाया भक्कम करण्याच्या दृष्टीने या अभ्यासक्रमात भर देण्यात आला आहे.  बालकांच्या ३ ते ४ वर्षे, ४ ते ५ वर्षे आणि ५ ते ६ वर्षे वयोगटानुसार सोप्याकडून कठिणाकडे भाषापूर्व, गणितपूर्व, वाचनपूर्व अनुभवामधून बालकांची प्राथमिक शिक्षणक्रमासाठी पायाभूत तयारी करून घेतली जाते. या अंतर्गत चेतना व्यायाम, शारीरिक विकासाचे खेळ, स्पर्शपट्टी, गंधकुपी, श्रवणडब्या, दृकअनुभूती, प्रत्यक्ष चव याद्वारे पंच ज्ञानेद्रीयांचा अनुभवविकास, डोमीनोज, चित्रकोडी, शब्दकोडी, पाहुणा ओळखा, साम्यभेद कृती, क्रमवारी तुलना करणे, कुतूहल कोपरा यातून कल्पनाशक्ती व तार्किक विकास, खेळघर, मुक्तखेळ, गोलातील गप्पा, अभिनयगीते यातून भावनिक विकास, चिकटकाम, रंगकाम, ठसेकाम, मातीकाम, रंगसंगती, क्रीडास्पर्धा, वेशभूषा स्पर्धा अशा नाविन्यपूर्ण उपक्रमामधून बालकांच्या व्यक्तीमत्वाची  पायाभरणी अंगणवाड्यामधून सुरू झाली आहे.

पालक झाले जागरूक, मुलांना लागली गोडी

आकारचे फलीत काय? हा प्रश्न पडणे साहजीक आहे. फक्त प्रशिक्षण देऊन युनिसेफचे काम संपत नाही तर त्याचा आढावाही घेतला जातो. बालेवाडीच्या अंगणवाडीत असाचा आढावा  घेण्यासाठी पालकसभा भरली होती. या अंगणवाडीत ‘आकार’ राबवणाऱ्या ग्राममंगल संस्थेचे राजेश मुळे यांनी पालकांना मुलांच्या प्रगतीविषयी प्रश्न विचारले. त्यास उत्तर देण्यासाठी पालकांची चढाओढ सुरू होती. माझा मुलगा अभ्यास करत नाही, अशी तक्रार ज्योती जाधव या आईने केली. तर माझी मुलगी जेवत नाही. फक्त कुरकुरे खाते, असे विमल जाधव म्हणाल्या. त्यावर तुम्ही त्याचा अभ्यास घेतला आहे का? त्याला गोष्ट सांगीतली आहे का? अंगणवाडीत आज काय झाले, याची विचारणा केली आहे का?, अशी विचारणा केली.  मुलांच्या विकासासाठी अंगणवाडीएवढेच श्रम कुटूंबालाही घ्यावे लागतील, असे मुळे यांनी सांगीतले. यानंतर त्यांनी चित्रगोष्टी दाखवत मुलांना प्रश्न विचारले. मुलांनी त्यास उत्तरे दिली. राजेश मुळे म्हणाले, संवेदनशील पालकत्त्व हा ‘आकार’चा पाया आहे. मुले ही फक्त अंगणवाडी किंवा शाळेची जबाबदारी नसून त्यात कुटूंबाचाही हातभार असायला हवा, हे त्यांच्या लक्षात आले आहे. यामुळे पालक मुलांच्या विकासाबाबत जागरूक झाले आहेत. ते मुलांबाबत प्रश्न विचारतात. सर्व काम सोडून पालक सभेला उपस्थित राहतात. मुले पूर्वी फारतर ११ वाजेपर्यंत अंगणवाडीत असायचे. आहार घेऊन घरी निघून जायचे. आता  त्यांना शिक्षणाची गोडी लागली आहे. यामुळे ते १२:३० पर्यत येथे असतात. हे ‘आकार’चे यश असल्याचे मुळे म्हणाले.

योग्य वयात भविष्यासाठी ‘आकार’

बालकांचे ० ते ६ हे वय  त्यास भविष्याच्या दृष्टीने घडवण्यासाठी महत्त्वाचे वय  आहे. ज्याप्रमाणे चिखलाच्या गोळ्यास त्यामधील गुणधर्म ओळखून आका र दिला जातो, याच संकल्पनेतून एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागामार्फत अंगणवाडीतील बालकांचा शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास घडवून आणणारा ‘आकार’ हा शालेय पूर्व अभ्यासक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे. याचे यश उल्लेखणीय असून एक जबाबदार, संस्कारी, सुढृढ आणि संवेदनशील नागरीक घडवण्यासाठी हा उपक्रम उपयोगी ठरत आहे.-राजेश मुळे, प्रकल्प व्यवस्थापक, आकार, ग्राममंगल-युनिसेफचा उपक्रम

Related Articles

Close