Breaking News

शहर विकासाचे कामे डिसेंबर अखेर पर्यंत पूर्ण करा पालकमंत्री देसाई यांचे आदेश

सातारा देवळाइ येथे 382 कोटी रुपयाचे जलनिस्सारणाचे होणार काम

औरंगाबाद : शहर विकासाच्या हाती घेतलेल्या विविध विकास कामाचा आढावा घेऊन प्रगतीपथावर असलेली विकास कामे डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करा तसेच इतर प्रस्तावित कामाचा पाठपुरावा करून लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालक मंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेच्या विकास कामाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी .बी. नेमाने व शहर अभियंता एस.डी पानझडे यांनी विविध विकास कामाची माहिती दिली. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाच्या कामाची माहिती देताना शहर अभियंता पानझडे म्हणाले की, स्मृति उद्यानात 5558 झाडे लावण्यात येणार आहेत. आतापर्यंत 3300 झाडे लावण्यात आली आहेत. उर्वरित झाडे लावण्याचे काम डिसेंबर अखेर पूर्ण होईल. पुतळ्याचे काम ही प्रगतीपथावर असून वॉल कंपाऊंड चे काम नोव्हेंबर अखेर सुरू होईल असे त्यांनी सांगितले. क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे तसेच संत एकनाथ रंग मंदिराचे काम प्रगतीपथावर असून तेही डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. गरवारे स्टेडियमच्या विकासासंदर्भातील आराखडा तयार असून निधीसाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. अशी माहिती शहर अभियंता यांनी दिली.

सातारा देवळाइ येथे 382 कोटी रुपयाचे जलनिस्सारणाचे काम हाती घेण्यात आली असून एक टक्के प्रमाणे एमजीपीला 23 कोटी भरल्याशिवाय कामाला परवानगी मिळणार नसल्याचे सांगण्यात आले .यावेळी आमदार संजय शिरसाठ म्हणाले की यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा (एमजी पी)चे मुख्य अभियंता यांच्याशी बोलणे झाले असून एक टक्का रक्कम भरल्यानंतरच कामाला तांत्रिक मान्यता मिळणार असल्याने भरणे गरजेचे आहे. शहरातील मुख्य रस्त्यासाठी 317.22 कोटीचा डीपीआर तयार करण्यात आला होता. मात्र आता प्रत्येक आमदाराच्या मतदार संघातील रस्त्याच्या कामाची यादी आल्यानंतर निधीत वाढ होणार असल्याने त्याचाही डी पी आर आठवड्यात तयार करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पाणीपुरवठा योजना संदर्भात पालकमंत्र्यांनी जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता अजय सिंग यांना कामाची गती वाढवण्याचे निर्देश दिले. काही अडचणी येत असल्यास त्या तातडीने सोडवून घ्या, पाणी पुरवठा योजना कालावधीत पूर्ण करा, शहराला सध्या उपलब्ध असलेल्या पाणी पुरवठ्यात आणखीन वाढ करा, असेही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. शहरातील घनकचरा व्यवस्थापनाबाबत पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. यावेळी मा.शहर अभियंता यांनी 252 कोटीच्या रस्त्याचे कामे जवळपास पूर्ण झाले आहेत. या कामाचे 55.54 कोटी रुपये शासनाकडून येणे बाकी असून शासनाकडे मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

गुंठेवारीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 1258 प्रस्ताव प्राप्त झाले असून 610 प्रस्ताव मंजूर झाले आहेत. 12 कोटी 25 लाख रुपये महानगरपालिकेस मिळाले असल्याचे उपअभियता कोंबडे यांनी सांगितले. अधिकाधिक प्रस्ताव येण्यासाठी वार्ड निहाय शिबिरे आयोजित करून लोकांच्या गाठीभेटी घेऊन गुंठेवारी प्रस्ताव दाखल करण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येणार आहे. गुंठेवारी संदर्भात पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त करून गुंठेवारी चे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची निर्देश दिले. या बैठकीला मनपा अतिरिक्त आयुक्त बी .बी .नेमाने , रविंद्र निकम, शहर अभियंता एस डी पानझडे, घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख उपआयुक्त सौरभ जोशी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी पारस मंडलेचा, कार्यकारी अभियंता बी. डी. फड, डी. के .पंडित, के एम .फालक,कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा किरण धांडे, मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अजय सिंग आदी उपस्थित होते.

Related Articles

Close