politicalSpecial StoryToday's Special
कार्यालयीन वेळेत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, आमदार अंबादास दानवे यांच्या सूचना
जिल्ह्यातील जनतेच्या प्रश्नांसाठी दानवे यांची आरटीओ कार्यालयात बैठक
औरंगाबाद : आमदार अंबादास दानवे यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय बैठक घेतली. या बैठकीत लर्निंग लायसन ते कायमस्वरुपी लायसन मिळवतांना येणाऱ्या अडचणीबाबत सविस्तर चर्चा झाली. लवकरच करोडी येथील नवीन कार्यालयात स्थलांतर होणार असले तरी नवीन परवाना घेण्यासाठी येणारे मुले,मुली व महिलांना करोडी येथे ट्रायल घेण्यासाठी अडचणीचे ठरत असल्याने त्यांच्यासाठी शहरातच ट्रायल घेण्याची व्यवस्था असावी अशी सुचना अंबादास दानवे यांनी यावेळी दिली.
कार्यालयीन कामाच्या वेळी कर्मचारी कार्यालयात हजर राहत नसल्याच्या अनेक तक्रारी आल्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्याच्या सुचना आ. अंबादास दानवे यांनी दिली. ग्रामिण भागात आरटीओमार्फत कँप तालुक्याच्या ठिकाणी घेतले जातात परंतु बऱ्याच वेळेस तांत्रिक अडचणींमुळे ग्रामिण भागातील वाहनधारकांना परत बोलावले जाते. शक्यतो एका कामासाठी दोनदा कार्यालयात येण्याची वेळ वाहनधारकांवर येऊ नये अशा ही सुचना आ. अंबादास दानवे यांनी दिल्या.
यावेळी सहाय्यक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी जप्त केलेल्या वाहनांना जागा उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आणुन दिले व कार्यालयातील रिक्त जागांचा माहिती दिली. यावेळी आ.अंबादास दानवे यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्या फोनवर संपर्क साधुन त्यांच्याशी चर्चा केली. लवकरच याविषयी आढावा घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन परिवहनमंत्र्यांनी दिले आहे. या बैठकीत सहाय्यक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार, निलेश लोखंडे , तुषार बावस्कर, सवित भगत, माधुरी बाणाईत, चंद्रकांत साळुंखे, प्रविण काकडे, दौंड मनिष, संजय मनमथ आदी उपस्थित होते.