Visit Our Website
Special Story

दुर्लक्षीत पण महत्वाची स्थळे- १ – पावसामुळे डोंगराने पांघरला हिरवा शालू, चला जोगेश्वरी लेणी बघायला

औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यात आहे देवीचे मंदीर, ६ लेणी, पण दुर्लक्षित

हिरवागार निसर्ग, त्यास साद घालणाऱ्या डोंगर रांगा, मन प्रसन्न करणारे जोगेश्वरी देवीचे मंदीर आणि मंदीरासमोरील डोंगरात असणाऱ्या ७ प्राचीन लेण्या. औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा गावाजवळचे हे वै•भव अजुनही जगासमोर पोहचलेले नाही. नाही म्हणायला राज्य पुरातत्व खात्याच्या दफ्तरी लेणींची नोंद आहे. पण सर्वसामान्य नागरीक, पर्यटक, इतिहासतज्ञ, अभ्यासक आणि संशोधकांच्या लेखी लेणी दुर्लक्षितच राहिल्या आहेत. त्यांचे संवर्धन व योग्य प्रसिद्धी झाली तर पर्यटनाचे आणखी एक ठिकाण जगासमोर येऊ शकेल. चला तर शहराजवळचे आणखी एक वैभव बघायला…

महाराष्ट्राची पर्यटन राजधानी, पर्यटन जिल्हा असे औरंगाबादचे वैशिष्ट आहे. एकिकडे वेरूळ, अजिंठ्यासारखी जागतिक वारसा स्थळे तर बिबी का मकबरा, पनचक्की, देवगिरी किल्ला शहरात पर्यटकांना आकर्षित करतात. मात्र, याच्या जोडीलाच अनेक पर्यटन स्थळे दुर्लक्षीत आहेत. माहिती अभावी ही स्थळे मोठी क्षमता असतांनाही दुर्लक्षीतच राहिली आहेत. MH20 न्यूजच्या या मालिकेत अशाच स्थळांची आपण माहिती घेऊ. उद्देश एकच आहे, या माध्यमातून तेथे पर्यटकांचा ओघ वाढावा, पर्यटक आले तर त्या ठिकाणांची निगा राखली जाईल, सरकार, पुरातत्व खात्याचे लक्ष जाईल, या स्थळांचे संवर्धन होईल आणि त्यातून स्थानिक नागरीकांना रोजगाराची संधी निर्माण होईल.

असे पोहचता येईल जोगेश्वरी लेणीला
औरंगाबाद-जळगाव मार्गावर ६० किलोमिटरवर सिल्लोड शहर आहे. येथुन चाळीसगाव घाटाच्या मार्गावर तब्बल ३० किमी अंतरावर घाटनांद्रा गाव वसलेले आहे. गावच्या उत्तरेकडे ६ किमीवर अजिंठ्याच्या डोंगररांगा असुन याच्या उताराच्या बाजुने दोन ठिकाणी लेणी कोरलेल्या आहेत. पहिल्या भागात दोन तर त्याच्या समोरील डोंगरात बारा खणांचा विहार आहे. पहिल्या भागातील मुख्य लेणी ऐतिहासीक दृष्ट्या महत्वाची आहे. निझाम सरकारच्या राजवटीत येथे नाक्याचे कार्यालय होते.

जोगेश्वरी मंदीर
जोगेश्वरीचे मंदीर असणारी लेणी दोन भागात विभागली आहे. लेणीच्या प्रवेशद्वारासमोर श्री. जोगेश्वरी देवीची रेखीव, सुंदर मूर्ती आहे. याच लेणीत त्रिमूर्ती, विष्णुचा वराह अवतार, नृवराह, महिषासुर मर्दिनी आदी देवी-देवतांच्या मूर्ती कोरल्या आहेत. या शिल्पांची प्रचंड झिज झाली आहे. लेणीत चार स्तंभ असून ते तरंगशिर्षाचे आहेत. लेणीच्या पायथ्याशी पाण्याचा विशाल कुंड असून येथे बारमाही पाणी असते. लेणी त्यावरच वसलेली आहे. कुंडाच्या वरच्या •भागात ब्राह्मी लिपीतील शिलालेख आहे. त्यावरून या हिंदू लेणी असल्याचे स्पष्ट होते.

सहा लेणीचे वैभव
मुख्य लेणीत जोगेश्वरीचे मंदीर आहे. तर याच्या समोरील डोंगरात सहा अपुर्ण लेणी कोरलेल्या आहेत. त्याला बारा खणांचा विहार म्हंटले जाते. यात कोणतेच शिल्प किंवा चित्रे नाहीत. तर केवळ रेखोटे मारलेले आहेत. त्या अत्यंत मजबुत असुन अनेक पिढ्या नंतरही त्या जशाच्या तशा आहेत. निझाम काळात या ठिकाणी घोडे बांधले जायचे, असे ज्येष्ठ नागरिक सांगतात. या लेण्या सातव्या ते अकराव्या शतकाच्या असाव्यात असे तज्ञ सांगतात.

बाहेरच्यांना महत्व, स्थानिकांचे दुर्लक्ष
हे मंदीर मुंबईच्या प्रसिद्ध जोगेश्वरी देवीचे हे उपपीठ असल्याचे •भाविक सांगतात. मात्र, तशी लेखी कोठे नोंद नाही. येथे पुणे, मुंबई, ठाणे आणि राज्यभरातुन भाविकांचा ओघ असतो. भाविकांनी दिलेल्या देणगीतुन मंदीरापर्यंत सिंमेटचा रस्ता तयार करण्यात आला आहे. बाहेरच्या भक्तांना मंदीराचे महत्व असतांना औरंगाबादकरांचे याकडे दुर्लक्ष आहे. मंदीराचा कारभर श्री. जोगेश्वरी देवी संस्थानमार्फत पाहिला जातो. या मंदीराचा पुरातन इतिहासही कोणालाच माहिती नाही.

संरक्षित वास्तु घोषीत
२००० साली राज्य पुरातत्व खात्याने या लेणीला संरक्षित वास्तुचा दर्जा दिला. मात्र, त्यानंतर पुरातत्व खात्याने लेण्यांच्या संवर्धनासाठी फार प्रयत्न केल्याचे दिसत नाही. खात्याच्या लेखी लेण्यांची माहिती केवळ तीन ओळीत लिहीलेली आहे. हा दर्जा मिळाल्याच्या १० वर्षांनंतर जुन २०११ मध्ये या येथे संरक्षित वास्तुची पाटी बसवली. यामुळे लेणीच कारभार पुरातन वास्तु व स्थळे संरक्षण कायदा १९६० अंतर्गत आला आहे. या कायद्यानुसार संरक्षित वास्तुचे संरक्षण आणि संवर्धन अ•भिप्रेत आहे. यानुसार वास्तुच्या परिसरात कच्चे वा पक्के बांधकाम करणे, त्यावर संस्थानचे किंवा अन्य कोणतेही नावं लिहीने, खोदकाम करणे, परिसरात स्वयंपाक करणे, ध्वनी प्रदूषण करणे एवढेच नव्हे तर वास्तुच्या सौंदर्यीकरणासही परवानगी देता येत नाही. परंतु येथे सर्वच नियमांना हरताळ फासलेली आहे. देवीच्या मंदीरातील खांबांना ट्रस्टने रंग दिला आहे. तर लेणीच्या प्रवेशद्वारावरील भालदाराची मूर्तीही रंगवलेली आहे. समोरील सहा लेणीत देवीचा नवस फेडण्यासाठी येणारे भाविक स्वयंपाक करतात. परंतु आपण करत आहोत ते कायद्याचे उल्लंघन असल्याची कोणतीच माहिती त्यांना नाही. त्यांना रोखणारेही कोणी नाही. यामुळे हे सर्रास सुरू आहे.

प्रसिद्धी व्हावी
जोगेश्वरी लेणी आणि परिसर पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरू शकते. मात्र, माहितीअभावी पर्यटक येथे येत नाहीत. या स्थळाचा विकास झाला तर औरंगाबाद आणि परिसरातील पर्यटकांना निसर्ग भ्रमंतीसाठी एक नविन ठिकाण निर्माण होईल. यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळासोबतच वििवध टूर ऑपरेटर्सनीही प्रयत्न करावेत.- श्रीराम जोशी, ग्रामस्थ

पुरातन खात्याने दिला होता प्रस्ताव
या स्थळाचा विकास करण्यासाठी राज्य पुरातत्व खात्याने २०१० मध्ये ६७ लाख रूपयांचा एक प्रस्ताव शासनाला सादर केला होता. यात लेणीचा एकुण परिसर आयडेंटीफाय करणे, त्याच्या भोवती संरक्षण भिंत बांधणे, महामार्गावर व लेणीच्या ठिकाणी माहिती देणारे फलक लावणे, पिण्याच्या पाण्याची सोय करणे, स्वच्छतागृह बांधणे, लेणीची माहिती पुस्तिका तयार करणे आदी कामे अपेक्षित होती. पण हा प्रस्ताव पुढे सरकलाच नाही. सात वर्षापूर्वी तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रमाअंतर्गत जोगेश्वरीला क दर्जा मिळाला. पण परिसराचा विकास करण्यासाठी हे प्रयत्नही अपुरे पडले.

यामुळे राहतात लेणी अपूर्ण
जागेश्वरी लेणी अपुर्ण प्रकारात मोडतात. डोंगराचा खडक ठिसुळ निघणे, तेथे पाणी लागणे, लेणी खोदण्यात खुप वर्षे लागतात. याकाळात रोगराई, पुर, भूूकंप यासारखे एखादे नैसर्गिक संकट येणे, लेणीच्या कामात समन्वय नसणे, लेणी तयार करणाऱ्या देणगीदारांचा मृत्यु होणे अशा कारणामुळे लेणी अपूर्ण राहतात. या बाबतीत नेमके काय झाले हे स्पष्ट नाही.

निसर्ग सहलीसाठी योग्य पर्याय
पावसामुळे अजिंठा डाेंगररांगा हिरव्यागार झाल्या आहेत. निसर्गाचे हे रूप डोळ्यात साठवण्यासाठी ही याेग्य वेळ आहे. वन डे ट्रिपचा विचार करत असाल तर जोगेश्वरी लेणी योग्य ऑप्शन ठरू शकतो. नागमोडी रस्ता ओलांडून गेल्यावर याच डोंगरात इंद्रगडी देवीही लागेल. तर चला, जोगेश्वरीला… पुढील आठवड्यात असेच एक दुर्लक्षीत पण महत्वाचे पर्यटन स्थळ बघूया…

मंदीराला धार्मिक महत्व
जोगेश्वरी मंदीरात दर्शनासाठी दूर-दूरहुन भाविक येतात. जाेगेश्वरी देवीचे मोठे धार्मिक महत्व आहे. दर पोर्णिमा, मंगळवार आणि नवरात्रात येथे मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यांना शक्य त्या सुविधा पुरवतो. मंदीर आणि लेणीचे नुकसान होणार नाही, याची आम्ही पुरेपुर काळजी घेत असतो. मंदीराची सविस्तर माहिती जगासमोर आली पाहिजे -सांडुआप्पा कोठाळे, श्री.जोगेश्वरी संस्थान

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close