Features
आता हर्नियाची सर्जरी झाली सोपी; वेळीच निदान आवश्यक
डॉ. विजय बोरगांवकर, अध्यक्ष, हर्निया सोसायटी ऑफ इंडिया
आपण सर्वांनीच कधी ना कधी कोणाला हर्निया झाल्याचे, हर्नियाचे ऑपरेशन झाल्याचे ऐकले असेल. मात्र, हर्निया म्हणजे नेमके काय, हा आजार कशामुळे होतो, त्यावर उपचार काय, याबाबत आपल्याला फारशी माहिती नसते. अज्ञानामुळेच हा आजार वाढत जातो. आजघडीला अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांमुळे अवघड वाटणारा उपचार हा अतिशय सुलभ पद्धतीने केला जातो. औरंगाबादमध्ये १२ व १३ नोव्हेबर रोजी आयोजित ‘हर्निया सोसायटी ऑफ इंडिया’ च्या १५ व्या राष्ट्रीय परिषदेत अशाच विषयांवर मंथन होणार आहे, त्यानिमित्ताने…
तसे पाहता हर्निया हा खुप जुना रोग आहे. त्यावर उपायासाठी अनेक शतकांपासून शस्त्रक्रिया केल्या जातात. साधारणपणे लोकसंख्येच्या १५ ते २० टक्के लोकांमध्ये हर्निया आढळतो. या रोगाचे नेमके कारण अजूनही सांगता येत नाही. अगदी सोप्या शब्दात सांगायचे तर, सततचा खोकला, अधिक दाब देवून लघवी करणे किंवा शौचास गेल्यावर कळ आणणे तसेच अत्याधिक वजन उचलल्याने पोटावर वजन पडते. यामुळे पोटातील स्नायू कमकुवत होवून हर्निया होतो. हर्निया होतो, म्हणजे आपल्या शरीरातील नैसर्गिक किंवा अनैसर्गिक छिद्रांतून एखादा अवयव, स्नायू किंवा त्या अवयवाचा भाग बाहेर येतो. हर्निया स्त्री, पुरुष तसेच अगदी लहान बाळापासून वयोवृद्ध व्यक्तींना होऊ शकतो. मात्र, गेल्या काही वर्षात ३० ते ४० वयोगटातील लोकांना याचा सर्वाधिक त्रास होत असल्याचे निरीक्षण आहे. दमा, मधुमेह, थायराॅईड, स्थूलपणा, पूर्वी पोटावर शस्त्रक्रिया झालेल्यांना आणि गर्भवती असताना पोटावर जास्त दबाव पडलेल्यांना हर्नियाचा धोका वाढतो. लघवीला जाताना होणाऱ्या त्रासाकडेही दुर्लक्ष करू नये, कारण तसे होत असल्यास तात्काळ निदान आणि उपचार हे आवश्यक मानले जातात.
हर्नियातील सर्वात सामान्य लक्षण म्हणजे शरीरावर फुगा येणे, पोट दुखणे, छातीत दुखणे, उलट्या, चालताना किंवा बसताना त्रास होणे ही आहेत. प्रभावित भागात एक गाठ तयार होऊ लागते. उभे राहताना, वाकताना किंवा खोकताना हर्निया जाणवू लागतो. हर्निया आपोआप बरा होत नाही. त्यावर शस्त्रक्रिया आवश्यक ठरते. वेळीच उपचार न केल्यास तो जीवघेणाही ठरू शकतो. अचानक मोठ्या झालेल्या हर्नियामुळे त्यात अडकलेल्या आतड्याचे गँगरीनही होण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत उपचारासाठी गंभीर स्वरूपाची शस्त्रक्रिया करावी लागते.
शस्त्रक्रियेनंतर हर्निया बरा होतो. परंतु अनेकदा शस्त्रक्रिया होवूनही १५ ते २० टक्के लोकांमध्ये पुन्हा हर्नियाचा धोका उद्भवतो. तो वारंवार होवू नये यासाठी नवीन तंत्रज्ञान आले आहे. शरीरात नवीन प्रकारची जाळी (मेश) टाकल्याने स्नायुंची ताकद वाढते. यामुळे पुन्हा-पुन्हा हर्निया होण्याचा धोका टळतो. तसेच आता दुर्बिणीच्या सहाय्याने शस्त्रक्रिया केली जाते. यामुळे वेदना कमी होतात, व्रण लहान राहतात तसेच लवकर बरे होण्याचा कालावधी घटतो. लप्रोस्कोपीक शस्त्रक्रियेमुळेही रुग्ण लवकर बरा होतो. सर्वसामान्य रूणांना या शस्त्रक्रियांचा खर्च कमी करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात प्रयत्न सुरू आहेत. आता तर रोबोटिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने देखील सर्जरी केली जाते. त्याचे परिणाम चांगले येत आहेत. हर्नियापासून बचावासाठी शरीरावरील तणाव कमी करणे, धूम्रपान टाळणे, सततच्या खोकला येत असल्यास वेळीच उपचार घेणे, शरीराचे वजन आटोक्यात ठेवणे, बदलती जीवनशैली, फास्ट फुडचे अत्याधिक सेवन यामुळे स्थूलता वाढते. यामुळे फास्ट फूडचे सेवन टाळायला हवे. नियमित व्यायामाने स्नायूंची क्षमता वाढवून हर्नियाचा धोका टाळता येतो. हर्नियाच्या सुरुवातीच्या लक्षणांना ओळखणेही महत्त्वाचे आहे. सुरुवातीच्या काळातील तपासण्या करून आता हर्नियाचा प्रभाव कमी करणे शक्य आहे.