Special Story

चिमुकल्या रुद्रच्या उपचाराला ५ कोटीचा खर्च, त्याच्यासाठी “हासिल ए महफिल’चे आयोजन

रुद्र भिसेला आहे एसएमए-२ आजार, आरती पाटणकर-आय्यंगर यांचे सादरीकरण, रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद मेट्रो, आस्था जनविकासचे आयोजन

चिमुकला रुद्र भिसे स्पायनल मस्क्युलर अॅट्रोफी टाईप-२ (एसएमए-२) या दुर्धर आजाराने त्रस्त आहे. त्याच्या उपचारासाठी ५ कोटी रूपये खर्च अपेक्षीत असून तो पेलण्याची भिसे कुटूंबियांची परिस्थिती नाही. रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद मेट्रो आणि आस्था जनविकास संस्थेने रुद्रच्या उपचाराचा वाटा उचलण्यासाठी रविवार, १९ डिसेंबर रोजी औरंगपुऱ्यातील सभु महाविद्यालयाच्या गोविंदभाई श्राॅफ सभागृहात सायं ६:३० वाजता आरती पाटणकर यांच्या गझलांचा कार्यक्रम “हासिल ए महफिल’ आयोजित केला आहे. विनामूल्य प्रवेश असणाऱ्या कार्यक्रमात जमलेली रक्कम रुद्रच्या उपचारासाठी सुपूर्द केली जाईल.

दहा वर्षाच्या रुद्र दयानंद भिसे यास जन्मत: एसएमए-२ आजार आहे. त्याच्या शरिरातील स्नायू कमकुवत होत आहेत. त्यास चालता येत नाही. जेवतांना, श्वास घेतांना त्रास होतोय. २०१३ मध्ये या आजारावर औषध नसल्याचे मुंबईतील वाडिया रूग्णालयातील डॉक्टरांनी सांगीतले होते. २०१९ मध्ये आशेचा किरण उगवला. आजारावर इंजेक्शन, तोंडावाटे घेण्याचे औषध उपलब्ध झाले. मात्र, उपचारासाठी लागणाऱ्या ५ कोटी रूपयांच्या खर्चाच्या रकमेमुळे भिसे कुटूंबियांच्या आशेवर पाणी फेरले गेले. खाजगी कंपनीत काम करणाऱ्या रुद्रच्या वडीलांना हा खर्च पेलवणारा नाही. शासनाकडूनही मदत मिळत नाहीय.

“हासिल ए महफिल’चे आयोजन
रुद्रच्या उपचाराचा खारीचा वाटा उचलण्यासाठी रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद मेट्रो आणि आस्था जनविकास संस्थेने लोकवर्गणी म्हणजेच क्राऊड फंडींग जमा करण्याचा निर्णय घेतला. यासाठी ख्यातनाम शास्त्रीय गायिका आरती पाटणकर-आय्यंगर यांच्या “हासिल ए महफिल’ या गझल आणि ठुमरीचा कार्यक्रम आयाेजित केला आहे. त्यांना गायनात कृतिका शेगावकर, धनंजय गोसावी, हार्माेनियमवर शांतीभूषण देशपांडे, तबल्यावर जगदीश व्यवहारे, कि-बोर्डववर राजेंद्र तायडे तर गिटारावर श्रीराज कुलकर्णी साथसंगत करतील. हसन सिद्धीकी निवेदन करतील.

रविवार, १९ डिसेंबर रोजी गोविंदभाई श्राॅफ सभागृहात सायं ६:३० वा. आयोजित कार्यक्रमाला रुद्र उपस्थित राहेल. कार्यक्रमाला विनामूल्य प्रवेश असेल. मात्र, रसिकांनी आपापल्यापरीने शक्य ती रक्कम रुद्रच्या उपचारासाठी जमा करण्याचे आवाहन रोटरीच्या अध्यक्षा रो.मोना भूमकर आणि आस्थाच्या अध्यक्षा डॉ.आरतीश्यामल जोशी यांनी केले आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करून कार्यक्रम होईल.

Related Articles

Close