Breaking NewspoliticalToday's Special
घरे वाचविण्यासाठी लेबर कॉलनी येथील रहिवासी रस्त्यावर उतरले
विविध राजकीय पक्षाचा लेबर कॉलनीवासीयांना पाठींबा
औरंंगाबाद : विश्वासनगर-लेबर कॉलनी येथील घरावर सोमवारी (दि.८) बुलडोजर चालविण्याची जाहीर नोटीस जिल्हा प्रशासनाने ३१ ऑक्टोंबर रोजी लेबर कॉलनीवासीयांना दिली आहे. गेल्या आठ दिवसापासून लेबर कॉलनीतील घरांवर करण्यात येणाऱ्या कारवाईला स्थगिती मिळावी यासाठी लेबर कॉलनीतील नागरिकांनी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. परंतु जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने सोमवारी अखेर लेबर कॉलनी येथील नागरिक आपली घरे वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत.
दरम्यान, गेल्या आठ दिवसाच्या काळात विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी लेबर कॉलनीवासीयांची भेट घेवून त्यांना आपला पाठींबा जाहीर केला आहे. तसेच वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देखील विविध राजकीय पक्षाच्या प्रमूख पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. विश्वासनगर-लेबर कॉलनी येथील जवळपास ३३८ घरांवर येत्या ८ नोव्हेंबर रोजी बुलडोजर चालविण्याची जाहीर नोटीस जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या आदेशाने ३१ ऑक्टोबरच्या रात्री मनपा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने लावण्यात आली. जिल्हा प्रशासनाने लावलेल्या या नोटीसीमुळे लेबर कॉलनीवासीय हादरून गेले असून गेल्या आठ दिवसापासून येत्या सोमवारी काय होणार याचीच चर्चा सध्या लेबर कॉलनी परिसरात सुरू आहे.
लेबर कॉलनी येथील घरे जवळपास ६० ते ६५ वर्ष जूनी असून ती कधीही पडून जीवीत हानी होवू शकते असा दावा जिल्हाप्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. लेबर कॉलनी येथील आपली घरे वाचविण्यासाठी स्थानिक रहिवासी सोमवारी सकाळी सहा वाजेपासून रस्त्यावर उतरले आहेत.