Visit Our Website
Features

श्रावणी सोमवार विशेष – लहुगड नांद्रामध्ये रामेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी भक्तांची मांदीयाळी

-धार्मिक पर्यटनासह निसर्ग भ्रमंतीसाठी गर्दी

श्रावणातील सोमवारानिमीत्त रामेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी भक्तांचे स्वागत करण्याकरिता औरंगाबादजवळील लहुगड नांद्रा सज्ज झाले आहे. गर्दी आणि गोंगाटापासून काहीसे दूर अशा या ठिकाणी धार्मिक पर्यटनासोबतच मनसोक्त निसर्गभ्रमंतीही करता येते. नागमोडी आकारातील रस्ते आणि हिरवागार डोंगर एक दिवसाच्या ट्रिपसाठी साद घालत आहे.

जळगाव रोडवर चौका गावाहून सुमारे १७ किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य  लहुगड नांद्रा येथे रामेश्वर महादेवाचे प्राचीन मंंदीर आहे. चहूबाजूंनी डोंगर रांगामधील हे ठिकाण श्रावणात भाविकांच्या गर्दीने फुलून जाते. हे ठिकाण चार टप्प्यात बघता येते. पहिल्या टप्प्यात खाली मोठी यात्रा भरते. श्रावणात येथे दिवसभर भंडारे सुरू असतात. दुसऱ्या टप्प्यात महादेवाचे हेमांडपंथी मंदीर असून ते डोंगराच्या मधोमध कोरलेले आहे.श्रावणात सकाळपासून जप, अनुष्ठाण सुरू असते. बाहेर सभामंंडप आणि आत पिंड आहे. मंदीरात प्रवेश करण्यापूर्वी बाहेर गणपतीचे छोटे पण आकर्षक मंदीर आहे. मंदीराच्या खांबांवर आकर्षक नक्षी आहे.

भाविक रामेश्वर महादेवाचा रामायणाशी संंबधही जोडतात. एका आख्यायिकेप्रमाणे येथे सीतेचे वास्तव्य होते. रामायणातील लव-कुश यांचे हे जन्मस्थळ असल्याचे जाणकार सांगतात. तिसऱ्या टप्यात अपूर्ण लेण्या तर चौथ्या टप्पयात डोंगरमाथ्यावर पाण्याच्या टाक्या आहेत. आख्यायिकेमुळे यातील एका टाकीला सिता न्हानी असे नाव देण्यात आले आहे. या न्हाणीतून अजूनही पाळण्याचा अावाज येतो, असे भाविक सांगतात. रामेश्वर महादेव पावणारा असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. यामुळेच नवस फेडण्यासाठी येथे भाविक मोठ्या संख्येने भंडारे ठेवतात.

 भाविकांची गर्दी

श्रावणात तसेच महाशिवरात्रीला रामेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी रांगा लागतात. दुचाकी, कार, बैलगाड्या, ट्रॅक्टर आणि मिळेल ती वाहने करून भाविक दर्शनासाठी येतात. दिवसभर जप,अनुष्ठान अाणि इतर धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. दिवसभर भंडाऱ्यांचे आयोजन केले जाते. श्री. रामेश्वर महादेव संस्थानच्यावतीने भाविकांसाठी पाणी आणि इतर सुविधा पुरवण्याल्या जातात. यानिमीत्त मंदीर परिसरात मोठा बाजारही भरतो. माजी आमदार कल्याण काळे यांनी २००८ मध्ये तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रमाअंतर्गत भक्तनिवास बांधला आहे. तो श्रावणात भाविकांसाठी खुला असतो.

 कोकणाची आठवण

निसर्ग भ्रमंती, ऐतिहासीक आणि धार्मिक पर्यटनाची आवड असणाऱ्यांसाठी लहुगढ नांद्रा दिवसभराच्या छोटेखानी सहलीसाठी योग्य आहे. तसे हे रामेश्वर महादेवाचे ठिकाण. परंतू डोंगरात वसलेले असल्याने यास निसर्गाचे भरभरून वरदान लाभले आहे. चौक्याहून आत वळताच निसर्गाचे हे रूप डोळ्यात साठवता येते. उंच उंच डोंगरातील नागमोडी वळणे ओलांडत लहुगड नांद्र्यात पोहचता येते. अनेक ठिकाणचा रस्ता कोकणातील रस्त्याची आठवण करून देतो. तो खूप चांगला नसला तरी बरा आहे. सोमवार, महाशिवरात्र आणि श्रावण वगळता येथे फार गर्दी नसते.

अजून काय

लेणी महादेव मंदीराच्या डोंगरावर जाताच काही अपूर्ण लेणी लागतात. येथे भाविक भंडारे करतात. अशाच लेणी मंदीराच्या डोंगराच्या विरूद्ध बाजूला असणाऱ्या डोंगरातही आहेत. खडक चांगला नसल्याने त्या अपूर्ण राहिल्या असाव्यात असे तज्ञ सांगतात. डोंगरावरील खडकात छीद्रे दिसतात. ग्रामस्थ यास घोड्याच्या टापा असल्याचे सांगतात. उँचावर असल्याने हा व्हू पॉईंट बनतो.

पाण्याच्या टाक्या मंदीरावरील डोंगरात पाण्याच्या अनेक टाक्या दिसतात. या टाक्या जमिनीतून एकमेकांना जोडलेल्या आहेत. वर्षभर त्यात पाणी राहते.

अश्वस्तंभ– प्रभू रामाने अश्वमेघ यज्ञ करतांना एक अश्व सोडला होता. हा अश्व लव-कुशाने अडवून एका खांबाला बांधल्याचा रामायणात उल्लेख आहे. हे ठिकाण येथून सात किलोमीटरवर असलेल्या बाभळगावात असल्याचे ग्रामस्थ सांगतात. या स्तंभावर आता मंदीर बांधले आहे.

 भाविकांचे श्रद्धास्थान

लहूगडचे रामेश्वर महादेव हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. हे ठिकाण धार्मिक, ऐतिहासीक आणि पर्यटनदृष्ट्या महत्वाचे आहे. श्रावणात येथे भाविक मोठ्या प्रमाणात आले. त्यांची सोयीसाठी ट्रस्टने सुविधा पुरवल्या. भविष्यात येथे आणखी सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.बाबूराव कटारे, पदाधिकारी, श्री. रामेश्वर महादेव संस्थान

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close